एक हजार चंद्र जोनारो आऊं पाक्को कच्छी माडू! एकवार जे मनमां ठान्यू तो पछी हुं कोईनूं मानूं नहीं. अशाच आशयाचा संवाद जेठालाल गडाचा आहे. श्री अधिकारी ब्रदर्सच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका तुफान वेगात सुरू आहे. त्यातल्या जेठालालच्या तोंडी अशाच आशयाचा संवाद आहे. हा संवाद आठविण्याचे कारण आहेत, हेमराजभाई शाह!
जेठालालच्या तोंडी जे कच्छमधील भचाऊ गावाचे नाव सतत असते त्या भचाऊ तालुक्यातील सामखियाळी गावातील विरमभाई शाह यांच्या कुटुंबात बरोबर ऐंशी वर्षांपूर्वी म्हणजेच २२ मार्च १९४१ रोजी हेमराज यांचा जन्म झाला. आपण कोणत्या धर्मात जन्माला यावे? कोणत्या जातीत जन्म घ्यावा? कोणत्या भाषेत आपल्याला अवतार घ्यावा लागेल? हे आपल्या हातात निश्चितच नाही. परंतु ज्या जातीय, ज्या भाषिक परिवारात, ज्या धर्मात आपण जन्माला आलो आहोत त्यासमवेत आपली बांधिलकी आपोआपच निर्माण होते. त्यामुळे हेमराज शाह यांनी आपली कच्छी गुजराती म्हणून असलेली ओळख जपली तर त्याबद्दल कुणाला आक्षेप घेण्याची गरज नाही.
हेमराज शाह यांच्या एकूणच जीवनचरित्राकडे कटाक्ष टाकला तर आपल्याला प्रादेशिक अस्मितेचा स्फूर्तिदाता असंच त्यांच्यासंदर्भात नमूद करावे लागेल. आज ते वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत असून ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना सहस्त्र चंद्रदर्शनाचा योग प्राप्त झाला. आता शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक आणि ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या अफलातून कार्यक्रमाचे प्रणेते हेमराज शाह यांना हे भाग्य लाभले आहे. एक हजार पूर्ण चंद्र म्हणजे एक हजार पौर्णिमा पाहण्याचे सद्भाग्य ज्यांना लाभते तो सहस्त्र चंद्रदर्शनाचा सोहळा करू शकतो.
या हेमराजभाईंच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याएवढा मोठा मी निश्चितच नाही, परंतु त्यांच्या जीवनचरित्राचा हा थोडक्यात घेतलेला हा धांडोळा. २२ मार्च १९४१ रोजी जन्मलेल्या हेमराजभाई यांना मातृत्व आणि पितृत्व यापासून सुमारे वर्षभरातच पारखे व्हावे लागले. मोठे भाऊ आणि बहिण यांनीच त्यांच्या आई-वडिलांच्या भूमिका पार पाडल्या. अर्थातच सामाजिक सेवेचे बाळकडू हेमराज यांना वडिलांकडूनच मिळाले. समाजसेवेचे असिधारा व्रत ते आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही तितक्याच किंबहुना तरुणांना लाजवतील अशा स्वयंस्फूर्तीने अविरत चालवीत आहेत.
कच्छच्या रणातील कणाकणाचा त्यांना सार्थ अभिमान आहे आणि कच्छसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. मोठ्या भावाचे बोट धरून मुंबईत आलेल्या हेमराजभाईंनी आपले प्राथमिक शिक्षण मुंबई महापालिकेच्या शाळेत घेतले. ग्रँट रोड येथील सेंट्रल स्कूल आणि नंतर माटुंग्याच्या बोर्डिंग स्कूलमधून शिक्षण घेताना आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्या त्या शाळांना नांवलौकिक मिळवून दिला. मुंबईतील मोठ्या प्रमाणावर कच्छी बांधवांचे जीवन पदपथावर/फुटपाथवर सुरू झाले असल्याचे दिसून येते. अशा तमाम गरीब मुलांसाठी हेमराजभाई यांनी नॉवेल्टी चित्रपटगृहात ‘संगम’ चित्रपटाचा खास शो आयोजित केला आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे उघडून दिली.

कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करणे ही तर हेमराजभाई यांच्या दृष्टीने फार किरकोळ बाब. वयाच्या पंचविशीपासून आज वयाच्या ऐंशीवर्षापर्यंत त्यांच्या कार्यक्रम आयोजन करण्यात कोणताही खंड पडलेला नाही. ऐन तारुण्यात कच्छचे भूमिपुत्र आणि ख्यातनाम संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी यांना सरस्वतीचंद्र चित्रपटाला संगीत दिल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून त्यांच्या सत्काराचे आयोजन हेमराजभाई यांनी केले.
हा पोरगा काय करणार? अशा विचाराने कल्याणजीभाईंनी हेमराज या युवकासमोर आव्हान उभं केलं. आम्ही सत्कार स्वीकारू पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला यायला हवे, अशी अट कल्याणजींनी टाकली. संकटे आणि आव्हाने हे आपले जणू सवंगडीच आहेत, अशा थाटात वावरणाऱ्या हेमराजभाई यांनी कल्याणजी यांचे हे आव्हान स्वीकारले आणि थेट वर्षा बंगला गाठला. मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. तेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आजच्यासारखे अडथळे नव्हते. अर्थात हेमराजभाई यांच्यासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ताटकळत बसावे लागत नाही. वसंतराव नाईक कार्यक्रमात येत असल्याचे पत्र हेमराज शाह यांनी कल्याणजींसमोर फडकवले.
आता हेमराज यांची ‘हीच ती वेळ’ होती. त्यांनी कल्याणजींसमोर कार्यक्रमाला स्वरसम्राज्ञी लतादीदी याव्यात अशी ‘फर्माईश’ बोलून दाखविली. झालं, दुग्धशर्करा योग जुळून यावा तसंच घडलं आणि कार्यक्रमाला लतादीदी तर आल्याच पण दिलीप कुमार हे अभिनय सम्राटसुद्धा हजर झाले आणि कार्यक्रमाला चार चाँद लागले. पंचवीशीतल्या हरहुन्नरी हेमराज यांच्याबरोबरची दोस्ती कल्याणजी आनंदजी यांनी आजपर्यंत बहारदार आणि दिलदार पद्धतीने टिकविली आहे.
पुस्तके लिहिणे, पुस्तके प्रकाशित करणे, वह्या प्रकाशित करणे ही कामे तर हेमराज यांच्यासाठी तर पर्वणीच म्हणावी लागेल. आधी शाळांसाठी लागणारी पाठ्यपुस्तके यांचे दुकान काढले. मग रेखा या आपल्या कन्येच्या नावाने ‘रेखा बुक मँन्युफँक्चरींग कंपनी हा वह्या-पुस्तके निर्मिती करणारा व्यवसाय सुरू केला. अनेक नेत्यांची जीवनचरित्रं त्यांनी प्रकाशित केली. मग त्यात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, राजीव गांधी, शरद पवार इत्यादी नेत्यांवरची हेमराज शाह यांची पुस्तके निश्चितच मार्गदर्शक ठरावीत अशीच आहेत.

कौटुंबिक संकटांचा सामना करतानाच कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता ‘रडायचं नाही, लढायचंच’ या न्यायाने त्यांनी आपली राजकारण, समाजकारण, पत्रकारिता ही कामे अखंडपणे सुरूच ठेवली आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या संदर्भात जोडणारा जबरदस्त पूल म्हणजे हेमराज शाह हेच ठरावेत. हितेंद्र देसाई, बाबुभाई पटेल, चिमणभाई पटेल, माधवसिंह सोळंकी, अमरसिंह चौधरी यांच्यापासून तर अगदी विजय रुपाणी यांच्यापर्यंत साऱ्याच मुख्यमंत्र्यांनी हेमराज यांच्या व्यासपीठावर येण्यासाठी कधी नाही म्हटले नाही.
महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमीच्या स्थापनेसाठी हेमराज शाह यांचाच आग्रह महत्त्वाचा ठरला. या अकादमीच्या माध्यमातून मराठी आणि गुजराती साहित्य दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागले. ज्याप्रमाणे गुजरातचे मुख्यमंत्री हेमराज यांनी महाराष्ट्रात आपल्या व्यासपीठावर आणले तद्वतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मग ते अगदी वसंतराव नाईक यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जर हेमराज यांच्या व्यासपीठावर आले नाहीत तरच नवल. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मान ठेवला आहे.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. परंतु मुंबईत अजूनही महाराष्ट्र भवन उभे राहू शकलेले नाही. पण अंधेरी येथील भरवस्तीत लिंक रोडवर हेमराज शाह यांनी सात मजली भव्य अशी ‘गुजरात भवन’ची इमारत उभी ‘करुन दाखविली’ आहे. हेमराज शाह यांच्या अमृतमहोत्सवात प्रारंभी शरद पवार उपस्थित होते तर या महोत्सवाचा उद्धव ठाकरे यांनी समारोप केला, हा एक योगायोग म्हणावा लागेल. कारण महाराष्ट्र विकास आघाडीच्या रुपाने आज शरद पवार व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. हेमराज शाह या एकाच व्यक्तिमत्वात एकापरीने महाविकास आघाडी अंतर्भूत आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
हेमराज आज शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक असून शिवसेना ही प्रादेशिक अस्मिता जपणारी संघटना आहे तर हेमराजसुद्धा प्रादेशिक अस्मिता सांभळणारे किंबहुना प्रादेशिक अस्मितेचे स्फूर्तीदाते आहेत. आजसुद्धा त्यांच्या सळसळत्या उत्साहाकडे पाहिले तर ते आपल्या आयुष्याचे शतक सहज पूर्ण करतील. या अफलातून व्यक्तिमत्वाला मानाचा भगवा प्रणाम!

