लवकरच भाकरी फिरवणार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याआधीच काँग्रेसने मात्र मुंबईत भाकरी फिरवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची तडकाफडकी उचलबांगडी करत त्यांच्या जागी काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांनी आज याबाबतचे पत्र जारी केले.
ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या प्रा. वर्षा गायकवाड चार वेळा राज्य विधानसभेवर निवडून आल्या आहेत. मुंबईतल्या धारावी मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात. 2019 ते 2022 म्हणजेच मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या शालेय शिक्षण मंत्री होत्या. 2004पासून सतत चार वेळा त्या निवडून आल्या आहेत. साधारण पाच वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. गणितात एम.एस्सी. झालेल्या प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी बीएडसुद्धा केले आहे.
सध्या अशोक उर्फ भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला फार काही साध्य करता येणार नाही, या निर्णयापर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आल्यानंतर भाई जगताप यांची आज तातडीने उचलबांगडी करण्यात आली. दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य तसेच एकदा ते विधानसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आले आहेत. सध्या ते राज्य विधान परिषदेवर कार्यरत आहेत. कामगार नेते म्हणूनही त्यांनी सार्वजनिक जीवनात बराच काळ गाजवला. आजही काँग्रेसप्रणित काही कामगार संघटनांचे ते प्रतिनिधित्व करतात.