Tuesday, September 17, 2024
HomeArchiveमुंबईकरांच्या आरोग्याची काळजी...

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतेय बृहन्मुंबई महापालिका

मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी देखील नियमितपणे घेत असते. ही काळजी घेण्यासाठी आणि मुंबईकरांचे आरोग्य सशक्त व सुदृढ राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासह सर्वसाधारण दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे इत्यादी नागरिकांच्या सेवेत अविरतपणे कार्यरत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कु-हाडे यांच्या मार्गदर्शनानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने अधिकाधिक दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा मुंबईकर नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य हे ‘सर्वांसाठी आरोग्य’ (Health for All) असे आहे. या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे नागरिकांना अविरतपणे देण्यात येणा-या आरोग्य व वैद्यकीय सुविधांचा घेतलेला आढावा –

बृहन्मुंबई महानगरपालिकेची पाच वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रूग्णालये

महानगरपालिका क्षेत्रात पाच वैद्यकीय महाविद्यालये व रूग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये परळ परिसरात असणारे राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम) व सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई सेंट्रल परिसरात असणारे बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, शीव परिसरात असणारे लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, जुहू-विलेपार्ले परिसरातील डॉ. रु. न. कूपर रुग्णालय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय दंत महाविद्यालय यांचा समावेश होतो.

या पाचही रुग्णालयांद्वारे मुंबईकर नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा-सुविधा नियमितपणे देण्यात येत आहेत. या सेवा-सुविधा देण्यासाठी पाचही रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी परिचारीका, कर्तव्य-तत्पर कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक यंत्रसामुग्री, अनुभवी तंत्रज्ञ हे मनुष्यबळ याठिकाणी कार्यरत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय संस्थांमधील एकूण खाटांची संख्या ही साधारणपणे १२ हजार ४६२ इतकी आहे.  

उपनगरांमधील नागरिकांच्या सेवेत १६ रूग्णालये

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व व पश्चिम उपनगरांमधील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा-सुविधा त्यांच्या निकटच्या परिसरात उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पूर्व उपनगरांमध्ये ८ आणि पश्चिम उपनगरांमध्ये देखील ८ उपनगरीय रुग्णालये बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मुंबईकरांच्या सेवेत अव्याहतपणे कार्यरत आहेत. या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण सुविधेसोबतच आंतररुग्ण सुविधादेखील उपलब्ध आहे. या १६ रुग्णालयांमध्ये तब्बल ३ हजार २४५ खाटा आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टर मंडळी, वैद्यकीय कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असून आवश्यक ती यंत्रसामुग्री देखील या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

विशेष रूग्णालये

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना त्यांच्या वैद्यकीय गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विषय समर्पित पाच विशेष रूग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये संसर्गजन्य रोगांची बाधा झालेल्या रुग्णांवर प्रभावी उपचार करता यावेत, यासाठी दक्षिण मुंबईतील चिंचपोकळी परिसरातील साने गुरुजी मार्गावर असणारे कस्तुरबा रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयाद्वारे विविध साथरोगांच्या काळात रुग्णांवर करण्यात आलेल्या प्रभावी उपचारांची आणि एकंदरीत वैद्यकीय कार्याची दखल वेळोवेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. याचप्रमाणे कुष्ठरोग बाधित रुग्णांवर उपचारासाठी वडाळा परिसरात असणारे ऍक्वर्थ कृष्ठरोग रूग्णालय, डोळ्यांच्या आजारांवरील उपचारासाठी मौलाना शौकत अली मार्गावर असणारे मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रूग्णालय; क्षयरोग (टीबी) बाधित रुग्णांना समर्पित पद्धतीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी कार्यरत असणारे शिवडी परिसरातील क्षयरोग रूग्णालय समुह अव्याहतपणे कार्यरत आहे. तर दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात असणा-या शेठ आत्मसिंग जेसासिंग बांकेबिहारी कान, नाक व घसा रूग्णालय हे विशेष रुग्णालय कान, नाक व घशाशी संबंधित आजारांची बाधा झालेल्या रुग्णांना समर्पित पद्धतीने उपचार देण्यासाठी कार्यरत आहे.

मुंबईकरांच्या सेवेसाठी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्रसूतिगृहे

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरजू रूग्णांना प्राथमिक वैद्यकीय सेवा त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर उपलब्ध व्हावी, यासाठी १५१ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यरत आहेत. या दवाखान्यांद्वारे वैद्यकीय सेवा-सुविधांबरोबरच वैद्यकीय चाचण्यांची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर १९० ठिकाणी सर्वसाधारण दवाखाने कार्यरत आहेत. या दवाखान्यांमध्ये ४ आयुर्वेदिक दवाखाने आणि युनानी पद्धतीच्या २ दवाखान्यांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त २१२ प्राथमिक आरोग्य केंद्रे (हेल्थ पोस्ट) देखील कार्यरत आहेत. याबाबत आवर्जून नोंद घ्यावी, अशी बाब म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण दवाखान्यांमध्ये विविध वैद्यकीय चाचण्यांची सुविधा नागरिकांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांच्या सहकार्याने केवळ ५० रूपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते.

कीटनाशक विभाग

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे राबविण्यात येतात. या उपाययोजना राबविण्यात सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारितील कीटकनाशक खात्याची महत्वाची भूमिका आहे. कीटकनाशक खात्याद्वारे शहरातील कीटक नियंत्रणाचे कार्य नियमितपणे केले जाते. या अंतर्गत हिवताप-डेंग्यू यासारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरणा-या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करणे, त्याचबरोबर उंदीर, माशा आणि झुरळ इत्यादी उपद्रवी कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य या विभागामार्फत केले जाते.

महत्त्वाची विविध स्तरिय कार्ये

मुंबईकरांचे आरोग्य सदृढ राहावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे योगा केंद्रे चालविली जातात. त्याचबरोबर नियमितपणे लसीकरण कार्यक्रम राबविणे, मधुमेह – रक्तदाब तपासणी शिबिरे आयोजित करणे, सुटीच्या दिवशी वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित करणे, महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य व वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कार्यरत असणा-या स्वतंत्र पथकाद्वारे नियमितपणे तपासणी मोहिमांचे आयोजन करणे यासारखी विविधस्तरिय कार्येदेखील बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येतात. तसेच आरोग्य व वैद्यकीय बाबींच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी माहिती, शिक्षण व संपर्क हा उप विभाग कार्यरत असून, आरोग्य खात्यातील कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण उप विभाग देखील कार्यरत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे अंधेरी पश्चिम परिसरात व्यसनमुक्ती केंद्र कार्यरत आहे. या केंद्रात व्यसनाधीन व्यक्तिंना व्यसनमुक्त करण्याचे कार्य करण्यात येते. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून त्या रुग्णालयातील गरजू रुग्णांना विनाशुल्क उपलब्ध करुन देण्यात येतात. महानगरपालिका क्षेत्रातील जन्म, मृत्यू आणि विवाहांची नोंदणी करण्याचे नियोजन व व्यवस्थापन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे केली जाते. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी स्मशानभूमी आणि दफनभूमी यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेतल्यास जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या सेवेत अविरतपणे कार्यरत असते, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content