Homeहेल्थ इज वेल्थअवयवदान क्षेत्रातील तिघांना...

अवयवदान क्षेत्रातील तिघांना यंदाचा ‘दोस्त दिंडी’ पुरस्कार!

गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीच्या वारीत आपल्या अवयवदान आणि आरोग्य दिंडीसह सामील होणाऱ्या दोस्त मुंबई, या संघटनेने या वर्षापासून अवयवदान आरोग्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘दोस्त दिंडी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे. या वर्षाच्या या पुरस्कारासाठी डॉ. वत्सला त्रिवेदी, डॉ. प्रवीण शिंगारे आणि डॉ. अरूणकुमार भगत यांची निवड झाली आहे. येत्या १० जूनला नवी मुंबईतील कामोठे येथील आगरी समाज सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या अवयवदान दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

या प्रस्थान व सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीएसटीचे उपायुक्त डॉ. विजय डांगे, मंत्रालयातील महसूल विभागाचे उपसचिव डॉ. सत्यनारायण बजाज तर ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार विजेत्यांचा परिचय

डॉ. वत्सला त्रिवेदी- ज्येष्ठ शल्यचिकित्सक व अवयव प्रत्य़ारोपण तज्ञ्ज डॉ. वत्सला त्रिवेदी यांनी महाराष्ट्रातील मेंदूमृत रूग्णातील मूत्रपिंडाचे (किडनी) पहिले यशस्वी प्रत्यारोपण २७ मार्च १९९७ रोजी करून इतिहास घडविला. याशिवाय अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील महत्त्वाच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीची (झेडटीसीसी) पायाभरणी संस्थापक सचिव या नात्याने केली.

डॉ. प्रवीण शिंगारे- आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण व प्रशासन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून डॉ. प्रवीण शिंगारे ओळखले जातात. अवयवदान कायद्याचे प्रगाढ पंडित असल्याने या विषयावर त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक क्लिष्ट कायदेशीर प्रक्रिया सुलभ करून आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रूग्ण तसेच तज्ञ्ज डॉक्टरांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी आजवर केले आहे. त्यामुळे हजारो गरजू रूग्णांचे अवयव प्रत्यारोपण यशस्वी होऊन त्यांना जीवनदान लाभले.

डॉ. अरुणकुमार भगत- पनवेल महापालिकेचे आरोग्य सभापती, लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी म्हणून कार्य करताना डॉ. अरुणकुमार भगत यांनी आपल्या पदांचा प्रभावी वापर करून अवयवदानाबद्दल जाणीव जागृती वाढविण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे. भगत कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांच्या आईंच्या जन्मदिनी अवयवदानाचा संकल्प करून समाजासाठी एक नवा आदर्श ठेवला.

प्रस्थान सोहळा १० जूनला

धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशियो-हेल्थ ट्रॉन्सफॉर्मेशन (दोस्त), या संस्थेचे संस्थापक आणि अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. कैलाश जवादे दरवर्षी आषाढी वारीत अवयवदान दिंडी घेऊन सहभागी होतात. या दिंडीत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, त्यांच्यावर विविध उपचार, औषधेवाटप केले जाते. तसेच पथनाट्य, भारूड, लोकगीते या माध्यमातून सर्वसामान्यांच्या भाषेत अवयवदानाबद्दल जाणीव, जागृती केली जाते. या दिंडीचा प्रस्थान सोहळा कामोठे सेक्टर १५मधील आगरी समाज सभागृहात सकाळी १० वाजता रंगणार आहे. या वेळेस वारीत सामील विद्यार्थी पथनाट्ये, भारूड आणि नृत्य सादर करणार आहेत.

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content