Friday, July 12, 2024
Homeकल्चर +झगमगत्या प्रकाशात 18व्या...

झगमगत्या प्रकाशात 18व्या ‘मिफ्फ’चा समारोप

झगमगत्या प्रकाशात माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (मिफ्फ) काल मुंबईत समारोप झाला. कधीही न झोपणारे हे शहर अनोख्या कथा सादरीकरण आणि सर्जनशीलतेच्या प्रतिध्वनींनी दुमदुमले. मुंबईत झालेल्या या नेत्रदीपक समारोप सोहळ्याला  महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेते शेखर सुमन, दिग्दर्शक शाजी एन. करुण आणि सुब्बिया नल्लामुथू आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार निष्ठा जैन दिग्दर्शित ‘द गोल्डन थ्रेड’ या भारतीय माहितीपटाला प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र आणि रोख 10 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘द गोल्डन थ्रेड’ हा समारोपाचा चित्रपट म्हणूनही प्रदर्शित करण्यात आला.

वेरा पिरोगोवा दिग्दर्शित ‘सावर  मिल्क’ या एस्टोनियन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय काल्पनिक लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार प्रदान करण्यात आला. आई आणि मुलामधील गुंतागुंतीचे क्लिष्ट बंध उलगडून दाखवताना अपेक्षा आणि निराशेची कथा यात मांडली आहे. या लघुपटाला प्रशस्तीपत्र आणि रोख 5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला.

टोमेक पोपाकुल आणि कासुमी ओझेकी दिग्दर्शित ‘झीमा’, या पोलिश चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपटाचा रौप्य शंख पुरस्कार, प्रमाणपत्र आणि 5 लाख रुपये रोख मिळाले. मॅट वॉल्डेक दिग्दर्शित ‘लव्हली जॅक्सन’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कार मिळाला. ज्युरी सदस्य, चित्रपटाची अध्यत्मक बाजू आणि चित्तवेधक कथा सांगण्यासाठी वापरलेल्या सृजनशील तंत्राने प्रभावित झाले. प्रमोद पाटी मोस्ट इनोव्हेटिव्ह/प्रायोगिक चित्रपटाचा पुरस्कार ‘द ओल्ड यंग क्रो’ या जपानी चित्रपटाला देण्यात आला. त्याचे दिग्दर्शन लियाम लोपिन्टो यांनी केले आहे. मानचिन्ह आणि रु. 1 लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपटाचा रौप्य शंख पुरस्कार निर्मल दंडरियाल दिग्दर्शित ‘6-A आकाश गंगा’ या चित्रपटाला मिळाला. दिग्गज संगीतकार अन्नपूर्णा देवी यांचा जीवनप्रवास उलगडून प्रेक्षकांवर छाप पडणाऱ्या या चित्रपटाला 5 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार मिळाला. बरखा प्रशांत नाईक दिग्दर्शित ‘सॉल्ट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा (30 मिनिटांपर्यंत) रौप्य शंख पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा चित्रपट अत्यंत कलात्मकतेने रचलेल्या पिता-पुत्राच्या कथेतून दोन पिढ्यांचा लैंगिकतेबद्दलचा समज उलगडतो. 3 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गौरव पाटी दिग्दर्शित ‘निर्जरा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन चित्रपटाचा रौप्य शंख पुरस्कार मिळाला. हा चित्रपट, गंगेच्या घाटावर शोकाकुल वातावरणात सुरु असलेल्या विधीदरम्यान दोन भाऊ कसे एकत्र येतात त्याची कथा सांगतो. 3 लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्थलान्तर आणि हवामानबदल या तातडीच्या विषयांकडे लक्ष पुरवल्याबद्दल जॉशी बेनेडिक्ट दिग्दर्शित ‘अ कोकोनट ट्री’ला राष्ट्रीय स्पर्धा विभागात परीक्षकांकडून विशेष उल्लेखनीय चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला.

मिफ्फ 2024चा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा दादासाहेब फाळके चित्रनगरी’ पुरस्कार ‘टूवर्डस हॅपी ऍलीज’ या चित्रपटासाठी दिग्दर्शिका श्रीमोयी सिंग यांना प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समीक्षक परीक्षकांचा FIPRESCI हा पुरस्कारही मिळाला. सन्मानचिह्न आणि एक लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मिफ्फमध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठीचा आयडीपीए पुरस्कार एल्वाचिसा संगमा आणि दीपंकर दास यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘चांचीसोआ (अपेक्षा)’ या गारो चित्रपटाला मिळाला. सन्मानचिह्न आणि एक लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘अमृतकाळातील भारत’ या विषयावर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा पुरस्कार ‘लाईफ इन लूम’ या लघुपटाला मिळाला. एडमंड रॅन्सन यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात भारतातील विणकर समुदायासमोरील सामाजिक-आर्थिक आणि हवामानविषयक आह्वानांचा धांडोळा घेण्यात आला आहे. सन्मानचिह्न, प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचे पारितोषिक अनुक्रमे निरज गेरा यांना, त्यांच्या ‘द गोल्डन थ्रेड’ तर अभिजित सरकार यांना त्यांच्या ‘धारा का टेम’ साठी देण्यात आले. सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार विघ्नेश कुमुलाई यांना ‘करपरा’साठी तर इरिन धर मलिक यांना ‘फ्रॉम द शॅडोज’ या चित्रपटाकरिता देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी म्हणजे सिनेछायाचित्रणासाठीचा पुरस्कार बबिन दुलाल यांना ‘धोरपाटन: नो विंटर हॉलिडेज’साठी तर सूरज ठाकूर यांना ‘एंटँगल्ड’ या चित्रपटांच्या उत्कृष्ट तांत्रिक हाताळणीसाठी देण्यात आले. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपये रोख असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे.

पंकज कपूर, अक्षय ओबेरॉय, शीबा चढ्ढा, अनुप सोनी, तनुज गर्ग, विवेक वासवानी अशा चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून या समारोप सोहळ्याची शान वाढवली. बहुरंगी, चैतन्यमयी आणि वेधक-वेचक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी या सोहळ्याची रंगत वाढली. या सोहळ्यात महोत्सवाच्या तांत्रिक समितीचा आणि चित्रपटक्षेत्रातील काही प्रख्यात व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि महोत्सव संचालक  पृथुल कुमार यांनी आभारप्रदर्शन  केले.

मिफ्फच्या या 18व्या आवृत्तीत 59 देशांतील 61 भाषांमधील 314 चित्रपट मोठ्या दिमाखाने प्रदर्शित झाले. याशिवाय 8 जागतिक प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 18 आशिया प्रीमियर आणि 21 भारतीय प्रीमियर यांची उत्कृष्ट गुंफणदेखील अनुभवायला मिळाली.

मिफ्फ महोत्सवातील काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे डॉक्युमेंटरी फिल्म बझार. एक अतिशय अभिनव उपक्रम ज्या माध्यमातून चित्रपटनिर्मात्यांना खरेदीदार, पुरस्कर्ते आणि सहयोगी घटकांशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाने 10 देशांमधील सुमारे 200 प्रकल्पांना आकर्षित केले. 27 भाषांमधील वैविध्यपूर्ण कल्पना आणि संधींचे स्फूर्तिदायक आदानप्रदान झाले.

महोत्सवातील उपस्थितांना अल्फोन्स रॉय, नेमिल शाह, शाजी एन. करुण, ऑड्रिअस स्टोनीस, संतोष सिवन आणि सुब्बिया नल्लामुथू यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांच्या  मास्टर क्लासेसची पर्वणी लाभली. या सत्राच्या माध्यमातून उदयोन्मुख चित्रपटनिर्मात्यांना चित्रपट निर्मितीच्या कलेतील मोलाची दृष्टी लाभली. मिफ्फ 2024मधील पॅनेल चर्चेत माहितीपट, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन फिल्म निर्मितीशी संबंधित समकालीन आणि नाविन्यपूर्ण विषयांवर विचारमंथन झाले. याशिवाय प्रतिनिधींना चित्रपट निर्मिती, जाहिरात आणि वितरणाचे नवीन पैलू उमगले आणि या उद्योगाच्या विकसित होत असलेल्या परिदृश्याबद्दलची त्यांची समज अधिक उंचीवर गेली. याशिवाय वरिष्ठ वॉर्नर ब्रदर ॲनिमेटरद्वारे एक विशेष ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स पाइपलाइन कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत अत्याधुनिक तंत्रांच्या गहन संशोधनाने सहभागी सदस्यांना मंत्रमुग्ध केले.

भारतीय माहितीपट निर्माते संघटनेने आयोजित केलेल्या खुल्या मंचामुळे माहितीपटांना निधी पुरवठा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ओ टी टी मंच, आणि समाज माध्यमांच्या युगातील चित्रपट निर्मिती यांसारख्या विषयांवर समावेशक आणि विचारप्रवर्तक चर्चा झाली. या मंचाने आजच्या काळात या क्षेत्रासमोर असलेली आव्हाने आणि संधी याविषयावर आपली मते सामायिक करण्यासाठी व्यावसायिकांना एक गतिशील जागा प्रदान केली.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!