हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११व्या जयंतीनिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने काल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८०पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्था ही मुंबई महापालिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांची संस्था आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गुणगौरव सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांचा समावेश असतो. दिनांक १ जुलै

रोजी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या मुख्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पालिका सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनील राठोड, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी केसुला बंजारा सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष धर्मा राठोड, उपाध्यक्ष डॉ. व्यंकटेश राठोड, खजिनदार विजय जाधव, विभागीय कामगार व कल्याण अधिकारी दिलीप राठोड, अविनाश राठोड, विशाल राठोड, मिनाक्षी राठोड, सरला राठोड, देविदास चव्हाण, विशाल जाधव, वसंत राठोड, डी. डी. नाईक, अमोल राठोड, निरंजन मुढे, गोकुळ राठोड यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी तसेच केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.