भारतातील दर 5 पैकी 1 मुलगी मासिक पाळीविषयक शिक्षण व उत्पादनांच्या अभावामुळे शाळा सोडते. आई ही मुलीची पहिली शिक्षिका असते. पण 10पैकी 7 मातांना मासिक पाळीचे विज्ञान पूर्णपणे माहीत नसते आणि त्यांना ही बाब ‘घाणेरडी किंवा अशुद्ध’ वाटते, अशी आकडेवारी अभ्यासातून दिसून आली आहे.
व्हिस्परतर्फे गेल्या 30 वर्षांपासून मासिक पाळीविषयी शिक्षणाला चालना दिली जात आहे, पॅड्सचे विनाशुल्क वितरण केले जात आहे आणि मासिक पाळीशी संबंधित गैरसमज व कलंकाची भावना दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतातील 10 कोटी मुली व मातांना व्हिस्परतर्फे शिक्षण देण्यात आले आहे तसेच पॅड्स पुरवण्यात आले आहेत.

मासिक पाळीविषयक शिक्षण व वैयक्तिक स्वच्छता व्यवस्थापनाच्या मुद्दयावर आणखी जागरूकता निर्माण करण्यासाठी पी अँड जी व्हिस्पर आणि युनेस्को एकत्र आले आहेत. स्त्रियांना, विशेषत: शाळेत जाणाऱ्या मुलींना हे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये युनेस्को इंडियाने व्हिस्परसह विकसित केलेल्या पाच अध्यापन-अध्ययन प्रारूपांची ओळख करून देण्यात आली. ही प्रारूपे म्हणजे मासिक पाळीदरम्यानचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता ह्यांचे व्यवस्थापन करण्याची साधने आहेत. अध्यापक, तरुण मुली, विकलांग व्यक्ती ह्यांच्यासाठी ही प्रारूपे विकसित करण्यात आली आहेत. यात लिंग व पोषणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

#KeepGirlsInSchool या उपक्रमाखाली ‘स्पॉटलाइट रेड’ हे शीर्षक देऊन सुरू करण्यात आलेले हे अभियान अध्यापन-अध्ययन प्रारूपे देऊ करते. या प्रारूपांमध्ये विद्यार्थी, अध्यापक व समुदायातील नेत्यांसाठी सर्वसमावेशक संसाधने व धोरणे आहेत. मासिक पाळीच्या व्यवस्थापनाबद्दलचे समज व कौशल्ये सुधारणे हे यामागील उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सामाजिक प्रभावाबद्दलही जागरूकता निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे. वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीतून येणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलींना सक्षम करणे हेही या प्रारूपांचे उद्दिष्ट आहे. ह्यांमध्ये विकलांगतांसह जगणाऱ्या मुलींचाही समावेश होते. त्यांनाही मासिक पाळी तसेच पौगंडावस्थेविषयीचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवाय, शाळा, राज्य व राष्ट्र या स्तरांवर उपाय करून अधिक सहाय्यकारी वातावरण निर्माण करण्याचा या अभियानाचा प्रयत्न असेल, जेणेकरून, पौगंडावस्थेतील मुलींना या कारणावरून शाळा सोडावी लागणार नाही.

पी अँड जी व्हिस्पर आणि युनेस्को इंडिया ह्यांनी #KeepGirlsinSchool या उपक्रमाखाली मासिक पाळीतील आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता व्यवस्थापनावर एक राष्ट्रीय सर्वेक्षणही सुरू केले आहे व तफावत विश्लेषण (गॅप अॅनालिसिस) अहवालही आणला आहे. शहरी भागातील गरीब घरांमधील पौगंडावस्थेतील 50 टक्के मुलींना (वयोगट 15 ते 19) मासिक पाळीच्या व्यवस्थापनासाठी निकोप पद्धती उपलब्ध नसतात.
मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठातील (एसएनडीटीडब्ल्यूयू) विशेष शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता भान या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर बडे अच्छे लगते है 2 या दूरदर्शन मालिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री दिशा परमार ह्या विशेष आतिथी होत्या. युनेस्को इंडियाच्या सीनियर जेंडर स्पेशालिस्ट डॉ. हुमा मसूद आणि व्हिस्पर पी अँड जीच्या कम्युनिकेशन हेड कृती देसाई ह्यांच्यासारखे अनेक प्रतिष्ठित पाहुणे समारंभाला उपस्थित होते.

अभिनेत्री दिशा परमार ह्यांनी व्हिस्परच्या ‘कीप गर्ल्स इन स्कूल’ अभियानाला पाठिंबा जाहीर केला तसेच त्यांना चिंता वाटणाऱ्या एका वास्तवावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, व्हिस्पर आणि युनेस्कोच्या स्पॉटलाइट रेड या नवीन अभियानाच्या माध्यमातून त्यांच्या कीप गर्ल्स इन स्कूल चळवळीला पाठिंबा देता येत आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. आपण मासिक पाळीबद्दल अखेरीस खुलेपणाने, कोणतेही अवघडलेपण किंवा लाज न बाळगता बोलू लागलो आहोत, ह्याचा मला आनंद वाटतो. हेच योग्य आहे, कारण, पीरियड्स कोई बिमारी नही… शरमिंदा होने की चीज नही… पीरियड्स तो एक स्ट्राँग, हेल्दी वुमन बनने की निशानी है… (मासिक पाळी म्हणजे आजार नाही… लाज वाटण्याजोगी बाब नाही… मासिक पाळी ही एक सशक्त, निरोगी स्त्री झाल्याची खूण आहे). मी मातृत्वाच्या प्रवासासाठी निघालेली असताना, मासिक पाळी हा कलंक समजला जात नाही अशा वातावरणात माझे मूल वाढावे, असे कोणत्याही आईप्रमाणे मलाही वाटत आहे. येत्या काही वर्षांत, मासिक पाळीदरम्यानचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता या विषयाला आवश्यक ते महत्त्व दिले जाऊ लागेल, अशी खात्री मला वाटते.

युनेस्कोच्या नवी दिल्लीतील बहुविभागीय प्रादेशिक कार्यालयातील लिंगविषयक तज्ज्ञ (जेंडर स्पेशालिस्ट) डॉ. हुमा मसूद म्हणाल्या की,स्पॉटलाइट रेड हे युनेस्को व पी अँड जी व्हिस्परच्या #KeepGirlsinSchool उपक्रमाखालील अभियान म्हणजे शालेय विद्यार्थिनींमधील मासिक पाळीविषयक आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेचा मुद्दा तातडीने हाताळण्याचा एक दृष्टिकोन आहे. दरवर्षी 23 दशलक्ष मुली केवळ योग्य सुविधा व माहितीच्या अभावी शाळा सोडत असल्यामुळे आपण प्रत्येक शिक्षकाला तसेच मासिक पाळी येणाऱ्या मुलीला सक्षम करण्यासाठी शिक्षण व युक्तिवाद, हे दोन्ही करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमादरम्यान, युनेस्कोने एक सर्वसमावेशक सर्वेक्षण व तूट विश्लेषण अहवाल सादर केला. त्यासोबतच लघुपटांची एक मालिकाही दाखवण्यात आली. त्यात मासिक पाळीदरम्यानचे आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेच्या व्यवस्थापनाची वेगवेगळी अंगे प्रभावीपणे दाखवण्यात आली होती. भारतातील सात राज्यांमधील, या महत्त्वाच्या विषयावरील आवश्यक माहितीशी निगडित धारणा व वैविध्यपूर्ण अनुभवांवर, या लघुपटांद्वारे प्रकाश टाकण्यात आला. मासिक पाळीबद्दलची कलंकाची भावना नाहीशी करण्यासाठी तसेच बंधने तोडण्यासाठी एक सशक्त असे ‘प्राइड पीरियड अँथेम’ (मासिक पाळी अभिमानगीत) प्रस्तूत करण्यात आले आणि त्यायोगे मासिक पाळी येणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी एका आश्वासक व समावेशक भविष्याच्या जोपासनेची ग्वाही देण्यात आली.

