HomeArchiveहद्दपार झालेली शिट्टी...

हद्दपार झालेली शिट्टी कोणाची वाजवणार?

Details
हद्दपार झालेली शिट्टी कोणाची वाजवणार?

    27-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
atulm2001@gmail.com
9 ते 10 महिन्यांपूर्वी झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत एकमेकांची औकात काढून आरोप प्रत्यारोप करणाऱ्या शिवसेना भाजप यांनी आता सोयीस्कर युती करून मतदारांची शिट्टी वाजवली असून प्रत्यक्षातसुद्धा येथील कट्टर विरोधक असलेल्या बहुजन विकास आघाडीलासुद्धा त्यांचे आजपर्यंत लोकप्रिय झालेल्या शिट्टी या निवडणूक चिन्हापासून रोखण्यात यश मिळवले आहे. आता बविआला रिक्षा हे चिन्ह मिळाले असले तरी मतदार प्रत्यक्षात कोणाची शिट्टी वाजवणार हे गुलदस्त्यात आहे.

आरोप आणि व्यक्तिगत निंदानालस्ती यामुळे गाजलेल्या पोटनिवडणुकीत ही जागा भाजपने जिंकली होती. मात्र, त्यानंतर भाजपने त्यावरील हक्क सोडला. एवढेच नव्हे तर राजेंद्र गावित यांच्या हातातील कमळ काढून घेत त्यावर शिवबंधन बांधण्याचीसुद्धा परवानगी दिली. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला दिलेले वचन सोयीस्कर विसरून शिवसेनेने गावितांच्या उमेदवारीवर मोहोर उमटवली. युतीच्या चर्चेत शिवसेनेने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली असली तरी निवडणुकांमधला विजय पदरात पाडून घेणे तेवढे सोपे नाही, याची कल्पना शिवसेना नेत्यांना आहे. युतीला नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी काँग्रेस आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाने बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) हाती सोपविली आहे. शिवसेनेसाठी हा विजय प्रतिष्ठेचा आहे तर, हक्काचे शिट्टी हे निवडणूक चिन्ह हिसकावून घेतल्याने चवताळलेली बविआ शिवसेनेचा पराभव करण्यासाठी तयार झाली आहे.

वसई, विरार, नालासोपारा आणि बोईसर परिसरात आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या बविआने २००९मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविली. त्यात बळीराम जाधव यांनी भाजपच्या चिंतामण वनगा यांच्या पराभव केला होता. २००९मध्ये मोदी लाटेत वनगांनी जाधवांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र बविआने सहापैकी तीन मतदारसंघात विजय नोंदविला. तर, दोन ठिकाणी भाजप आणि एक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर मे, २०१८मध्ये पालघरसाठी पोटनिवडणूक झाली. भाजपचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास वनगा यांचे शिवसेनेने केलेले ‘अपहरण’, त्यानंतर काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांच्या गळ्यात भाजपने टाकलेली उमेदवारी, प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर अत्यंत खालच्या शब्दांमध्ये चढविलेले हल्ले, दोन्ही पक्षांनी साम, दाम, दंड, भेदाचा केलेला सर्रास वापर अशा अनेक कारणांमुळे ही निवडणूक गाजली. या निवडणुकीत भाजपकडून झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळेच युतीच्या वाटाघाटी करताना शिवसेनेने पालघर मतदारसंघ आपल्याकडे घेत स्वतःच्याच जखमेवर फुंकर मारण्यात यश मिळवले.

पोटनिवडणुकीत जिंकलेले भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली. आठ महिन्यांच्या कार्यकाळासाठी झालेल्या या पोटनिवडणुकीत बविआने आपली पूर्ण ताकद पणाला लावली नव्हती. यंदा मात्र, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच, या इर्षेने ते मैदानात उतरले आहेत.

बविआ आणि शिट्टी हे समीकरण वसई, विरार, नालासोपारा, बोईसर या पट्ट्यात दृढ झाले आहे. मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मोठ्या शिताफीने खेळी करत शिट्टी हे निवडणूक चिन्ह बविआकडून हिसकावण्यात यश मिळविले आहे. बहुजन महापार्टीच्या उमेदवाराला शिट्टी या निवडणूक चिन्हावर उभे करण्याचेही शिवसेनेचे मनसुबे होते. मात्र, आयोगाने शिट्टी हे चिन्ह कोणालाही दिले नसून बविआला रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. महापार्टीला शिट्टी हे चिन्ह मिळाले असते तर बविआच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता. तसे, न झाल्याने बविआला दिलासा मिळाला असला तरी रिक्षा हे चिन्ह आपल्या मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. वसई-विरार महापालिकेसह तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये बविआचे निर्विवाद वर्चस्व आहे तर पालघर, तलासरी, विक्रमगड या भागातील कम्युनिस्टांची ताकद आणि उर्वरित मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जनता दल यांची असेल.

शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर येथील जबाबदारी सोपविली आहे. ठाणे आणि कल्याण मतदारसंघातली निवडणूक शिवसेनेसाठी तुलनेने सोपी असल्याने शिंदे यांच्यासह ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज पालघर मोहिमेवर दिसत आहे. शिट्टी हिसकावल्यामुळे संतापलेली बविआ शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. पाहूया हद्दपार झालेली शिट्टी कोणाची वाजणार?”
 

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content