Details
hegdekiran17@gmail.com
“महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३६३२ आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे ही सरळ सेवा भरतीने करण्यात यावी, यात १९८१पासून कार्यरत असलेल्या ९२२ बदली कामगारांना कायम करून तसेच अनुकंपा, वारसाहक्क याबाबतीत प्रलंबित प्रकरणांना न्याय देऊन ही भरती होणे अपेक्षित असताना बाह्यस्तोत्राद्वारे (आऊटसोर्सिंग) ठेकेदारी पद्धतीने चतुर्थश्रेणी कामगारांची पदे भरण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक आहे, याबाबत शासनाला सल्ला देणाऱ्यांनाही योग्य ज्ञान नाही, अशी टीका राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी केली असून संघटनेने या भरतीला कडाडून विरोध केला आहे.”
“कोरोना संकटाच्या काळात जिवावर उदार होऊन वाहनांची व्यवस्था नसतानाही, पुरेशी आरोग्यविषयक सुरक्षा नसतानाही चतुर्थश्रेणी कर्मचारी दिवसरात्र कामावर उपस्थित होते. अनेकजण तर कामाच्याच ठिकाणी सोय नसतानाही कसाबसा जीव मुठीत ठेवून वास्तव्य करत होते. असे असतानाही त्यांना कायमस्वरूपी सेवा न देऊन शासन एकप्रकारे कंत्राटी पद्धतीने नवी भरती करून त्यांच्यावर अन्याय करत आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना उद्धवस्त करत आहे, असेही पठाण यांनी म्हटले आहे.”
“याचबरोबर ११ मे २०२० यादिवशी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासमवेत झालेल्या सकारात्मक चर्चेत संघटनेला आश्वासित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तसे न झाल्यामुळे बदली कामगार, वारसाहक्क, अनुकंपा या यादीतील उमेदवारांचे आयुष्य उद्धवस्त होणार आहे. हा आमचा विश्वासघात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.”
“शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १०२० – प्र. क्र. २१ – २०२० वैसेवा -१ दिनांक ११ जून २०२० या अन्वये हा निर्णय वैद्यकीय सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील गट डमधील १०० टक्के पदे म्हणजे ३६३२ जणांना कंत्राटी पद्धतीने भरती करून घेतले जाणार आहे. यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इतर गटातील भरती सरळसेवा पद्धतीने होणार आहे. मग गट ड कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतच दुजाभाव का, हीच भरती कंत्राटी पद्धतीने करण्यामागे कुणाचे हितसंबंध आहेत का, असा सवालही निर्माण झाला आहे.”
“आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विभागात आरोग्यविषयक कर्मचाऱ्यांची पदं सरळ सेवांनी भरती करण्याचे परिपत्रक आहे तर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या विभागात ठेकेदारी पद्धतीने भरती करण्याचे निर्णय आहेत. हा काय गोंधळ आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दोन्ही ठिकाणी काम करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी हे एक प्रकारचीच आरोग्य सेवा देणार आहेत. मग हा दुजाभाव कशाला? हा काय प्रकार आहे, असेही बोलले जात आहे.”
“राज्यातील रूग्णालयांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने रूग्णसेवापुरविण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असून कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गावर कामाचा ताणवाढत आहे. त्यासाठी सर्व रूग्णालयांमधील चतुर्थश्रेणीची रिक्त पदे भरण्याबाबत व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहे. त्यामुळे हा अध्यादेश तत्काळ स्थगित करून पुन्हा नव्याने आदेश निर्गमित व्हावेत, अशी मागणी भाऊसाहेब पठाण यांनी केली आहे.”

