Details
मोदी विजयाचे रहस्य!
27-May-2019
| 1
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
kharevinay196509@gmail.com
न भूतो न भविष्यती असा अभूतपूर्व, अनाकलनीय विजय मिळवत सत्तेच्या घोड्यावर मांड ठोकण्यात नरेंद्र मोदी यशस्वी झालेत. मधल्या काळात लाट, प्रभाव ओसरला असं म्हणणारे चांगलेच अचंबित झाले. काहींच्या तोंडात गेलेली बोटं निघायलाच तयार नाहीत म्हणे! यशाचं नि अपयशाचं हे कोडकौतुक पुढील काही काळ चालूच राहणार. यशाला अनेक बाप असतात नि अपयशाचा धनी त्याचा तोच असतो अशा अर्थाची एक म्हण आहे सहज आठवली. पण मोदी यशाची अनेक कारणं आहेत. वेगवेळ्या स्तरातून होणारी टीका, विरोधी पक्षाचे जोरदार हल्ले, विविध घटकांकडून येणारे तिखट प्रश्न या सर्वांवर मात करीत आपले ‘लक्ष्य’ विचलित न होऊ देता पुन्हा दुसऱ्यांदा भाजपचं सरकार आणून स्वतःला सत्तेत बसवणं सोपं काम निश्चितच नव्हतं.
अगदी २०१४ च्या निवडणुकीतही मोदी पायाला भिंगरी लावून फिरले. कारण भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले नि आता स्वतःचा कारभार चांगला होता, आपणच या पदाचे दावेदार कसे हे सिद्ध करायचे होते. त्यामुळे आताही ते भिंगरी लावल्यागत झपाटून ठिकठिकाणी सभा घेत फिरले. सगळी यंत्रणा असली तरी त्या माणसाचे स्वतःचे असे कष्ट असतातच की! त्यासाठी आरोग्याची उधार उसनवारी कोणाकडून होत नसते. मेहनत जिद्द ही यशाची पायरी आहे हा संदेश नकळतपणे त्यांनी देशाला दिलाय.
असो, आपला मुद्दा वेगळा, विषय वेगळा तरी काही प्रमाणात याचा भाग होऊ शकतो. २०१४ ला बदल हवा म्हणून लोक मोदींमागे उभे राहिले. त्याला लाट संबोधलं गेलं. पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या काही निर्णयावर सडकून टीका झाली. त्याचे वाईट परिणाम जनतेला भोगावे लागले उदा. नोटबंदी. जीएसटी खरं तर काँग्रेसचे अपत्य. तरीही हा आपण आणलेला जीएसटी नाही सांगत दणकून रान उठवले गेले. यानंतर पुरस्कार वापसी, कन्हैया कुमार प्रकरण, रोहित वेमुला प्रकरण, उ. प्र.तील गोरखपूर गोमांस प्रकरण, जेएनयु प्रकरण, स्मृती इराणी बनावट पदवी, उरी हल्ला देशाचं वातावरण बिघडत असल्यानं देश सोडवा लागेल, या कथित नामवंतांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद अशा अनेक मुद्द्यांना तोंड द्यावे लागले. हे कमी म्हणून न सापडलेला भ्रष्टाचार मुद्दा, राफेल प्रकरण यावर तीव्र खडाजंगी की कोर्टमॅटर सुरू झालं. न्यायालयाने काही नाही सांगूनही मुद्दा फिरत राहिला. लोकप्रियता कमी झाली म्हणत काही पाहण्यानी मोदी पुन्हा सत्तेत येतील असं सांगितलं. अखेर मोदी जादू दिसलीच, त्यात आज विरोधी पक्ष पुरता वाहून गेला गठबंधन वगैरे उड्या मारूनही!
या सरकारच्या अनेक योजनांना लोकांनी पसंतीची पावती दिली. दूरच्या ग्रामीण भागात उज्ज्वला-स्वच्छ भारत योजना याचा चांगला प्रभाव पडलेला दिसतो. धूरमुक्त चुलीने स्वयंपाकाचा गॅस घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. यात अजून मोठा पल्ला गाठायचाय. शौचालय ही महिलांची मोठी समस्या सोडविण्याचा प्रयोग अर्थसहाय्य देऊन पूर्ण केली जातेय. छोट्या ग्रामीण योजनांना गावात वित्तीय मदतीसाठी मुद्रा योजना आणली. त्यात त्रुटी असल्याने सुधारणा होणे अपेक्षित आहे. जनधन यातून लोक सरकारशी जोडले गेले.
मजबूत विदेश नीती- याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसला. पाकिस्तान, चीन, अमेरिका, इस्रायल, रशिया, आखाती देश, अफगाणिस्तान, यासह इतर अनेक देशांशी वरच्या पातळीवर संबंध जोडले गेले. याचा फायदा मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करणे असो की हवाई दल वैमानिक अभिनंदन वर्धमान याची सहीसलामत वापसी, पाकिस्तानवर दबाव यासाठी झाला. भूतान मुद्द्यावर चीनला नमणे भाग पडले. भारतीयांची धमक जगाला कळून चूकली. देशात झालेल्या २०१४ च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्ष कमकुवत अवस्थेत पुढे आला. काँग्रेस त्यातून सावरलेली नाही हे आताही दिसून आलं. असा कोणताच दमदार मुद्दा विरोधक देशापुढे आणू नाही शकले. नोटबंदी, राफेल, जीएसटी यावर सरकरला घेरण्याचा जरूर प्रयत्न झाला, पण संसद बंद पाडण्यापुढे काही झालं नाही.
यावेळच्या प्रचारात आणखी एक मुद्दा वापरला गेला तो म्हणजे राष्ट्रवाद! पाकिस्तानचा उल्लेख अनेकदा आला. जो राष्ट्रवादकडे इशारा करीत होता. उरी-बालकोट स्ट्राईकचा खुबीने उपयोग केला गेला. नव्हे ती काळाची गरज होती. इतर कोणत्याही सरकार पक्षानं तेच केलं असतं. यावर विरोधकांनी आवाज केला पण त्याला जोर लावण्यात अपयश आलं. आमचेही सर्जिकल स्ट्राईक झाले सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, पण इतक्या काळ लपवले का नि सैन्याने त्याला दिलेला नकार याने जनता अजूनच बिथरली असावी खोटारडे म्हणून. हिंदुत्त्वाचा मुद्दा जोरदारपणे वापरला गेला. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, योगी, प्रज्ञा सिंह ठाकूर आदींनी यात भूमिका बजावली. त्याचा फायदा पक्षाला झालाच. अनेकदा आचारसंहिता भंग मर्यादेबाहेर वक्तव्य झाली, नोटिसा बजावल्या. पण सभांमधून वेगवेगळ्या पध्दतीने मुद्दा मांडला गेला. पाकिस्तानला सिंधूचे पाणी देणे असो व अन्य काही, राष्ट्र हा संदेश देण्यात भाजप सरकार यशस्वी झालं.
भ्रष्टाचार हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न झाला. पण त्यात अनेक बाबीवर काँग्रेसच्या घशात दात घालण्याचे काम सरकारने केले ते त्यांच्याच काळात हा करार झाल्याचे सांगत. किमतींच्या मुद्द्यावर कोर्टात जाऊनही म्हणावे तसे यश नाही आलं. रिलायन्स, हिंदुस्थान एरोनॉटिक यांना पुढे करून प्रश्न चिघळवण्याचा प्रकार झाला. कोणत्याही निवडणुकीत सामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो तो महागाईचा. यावर सरकार नेहमी लक्ष देऊन असल्याने म्हणावं तसं रान कोणाला उठवणं शक्य झालं नाही. पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढ यावर आंदोलनं केली, पण त्यात दम नव्हता. जागतिक बाजाराची माहिती देत जनतेला विश्वासात घेतलं गेलं.
एकूणच वेळोवेळी भाजपच्या ‘थिंक टॅंक’नं बारकाईनं केलेला अभ्यास नि त्यावरून आखलेली रणनीती, उमेदवार निवड, बूथ व्यवस्थापन, प्रचारयंत्रणा, केलेल्या कामांच्या सरकारी जाहिराती, परदेशस्थ भारतीयांची आस्था, संघ स्वयंसेवकांची फौज, माध्यमांचा खुबी नि चलाखीने वापर, अशा अनेक गोष्टी या विजयात सहभागी आहेत.तुम्हाला काय वाटतं?”

