HomeArchiveमोदींना पर्याय कोण?

मोदींना पर्याय कोण?

Details
मोदींना पर्याय कोण?

    16-Dec-2018

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
jayant.s.karanjavkar@gmail.com

मुंबईत गारवा वाढतोय आणि छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, ज्याची संभावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पप्पू म्हणून केली होती. तो पप्पू आता पास झाला आहे. त्यामुळे भाजपाचे नेते व कार्यकर्ते गारठलेत. साम, दाम, दंड, शस्त्र असतानाही काँग्रेससमोर भाजपाने माना टाकल्यात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपा सरकार नोटाबंदी, जीएसटी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई व बेरोजगार प्रश्नांची दखल न घेता अंबानी, अदानी यासारख्या उद्योगपतींना गोंजारत बसल्याने देशात असंतोष निर्माण झाला. त्याशिवाय नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांची मग्रुरी व उन्मादाला लोकांनी दिलेला पराभावाचा झटका हे कारण म्हणता येईल. आणीबाणीत विरोधकांचा छळ केल्यानंतर भारतीय जनतेने इंदिरा गांधींना सत्तेवरून खाली उतरविले. त्यानंतर जनता पक्षाने सुडाच्या भावनेने के. के. शाह कमिशनमार्फत इंदिरा गांधींना बदनाम आणि छळण्याचा एककलमी कार्यक्रम चालू ठेवला होता. तोच प्रयोग मोदी-शाह या दुक्कलीने नेहरू-गांधी कुटुंबावर चालू ठेवला. मात्र लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना प्राधान्य न देता आरोपावर आरोप करत लोकांचे लक्ष दुसऱ्या ठिकाणी वळविण्याचा एकमेव कार्यक्रम केला आणि मतदारांनी भाजपाला त्याची जागा दाखवली.

एप्रिल २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा करिष्मा चालणार का, हा अडचणीचा प्रश्न भाजपा आणि संघासमोर आहे. नागपूर जरी आर. आर. एस.चं केंद्र असले तरी मध्य प्रदेश ही संघाची खरी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेच्या रणांगणावरच भाजपाचे पानिपत झाल्याने संघाच्या नागपूर कार्यालयात मोदींना स्टार प्रचारक ठेवायचं की नाही याची खलबते सूरू असल्याची सध्या चर्चा असल्याचे समजते. उद्योगपती रतन टाटा यांनी नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विकासपुरूष म्हणून गौरव केला होता. त्यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. “राजतीलक की करो तयारी, अब आएंगे गडकरी” अशा घोषणा, बॅनर्स दिसत आहेत. महाराष्ट्राला पंतप्रधानपद नेहमी हुलकावणी देत आलं आहे. नितीन गडकरी पंतप्रधान होणार असतील तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला काही संधी आहे. परंतु गडकरी व फडणवीस यांच्या विळ्या-भोपळ्याच्या नात्याचं काय होणार, हाही गहन प्रश्न भाजपासमोर असेल. यात शिवसेना मात्र सर्व आयुधे तयार करून उभी आहे. जात्यातलं सुपात आलं आहे… राजकारणात हे चालायचंच !

मुंबई महापालिकेचा स्तुत्य उपक्रम

मुंबई महानगरपालिकेने १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना महापालिका रूग्णालयात मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला, त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. वैद्यकीय उपचार ही सर्वानाच भेडसवणारी समस्या आहे. महिन्याच्या उत्पन्नात सर्वसामान्य जनतेला मुलांचे आजार आणि खासगी रूग्णालयातील औषधोपचार न परवडणारी असल्याने कुटुंबाचा ताळमेळ कोलमडतो. पालिका रूग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीही आहेत. याचा लाभ मुलांना होईलच पण अनेक कुटूंब सावरली जातील. शिवसेना स्थापन झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई व राज्यात शिवसेनेच्या रूग्णवाहिका सुरू केल्या होत्या. या सामाजिक कार्यातून सेना घराघरात पोहोचली. महापालिका रूग्णालयात १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत वैद्यकीय उपचाराचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. कोणता पक्ष करतो यापेक्षा ही सेवा उपलब्ध होतेय हेच महत्त्वाचे आहे. १९९५ च्या शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये शिधावाटप दुकानांत तांदूळ, गहू, साखर, गोडे तेल, रॉकेल यांचे एकच दर पाच वर्षे कायम ठेवले होते. तसे राज्य सरकारने केले असते तर फडणवीसांना सर्वांनी आशिर्वाद दिले असते.

अदानीचा अडाणी व्यवहार

मुंबईत अदानी इलेक्टरीसिटी मुंबई लि. कंपनीने उपनगरातील वीजग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने बिले आकारली. त्याची चौकशी चालू आहे. मात्र वाढीव बिलाची आकारणी करताना अदानी कंपनीने मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कृत्य केले. विज बिले गुजराथी भाषेत देण्यात आली आणि शिवसेनेने अदानीला दणका देत यापुढे असले प्रकार घडल्यास सेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा दणका दिला. मोदी सरकार आल्यापासून गुजराथी-मराठी वाद अधूनमधून होत असतो. कधी जैन सोसायटीमध्ये मराठी मांसाहारीना विरोध, उच्चभ्रू सोसायटीत मराठी माणसांना फ्लॅट देण्यास विरोध असे प्रकार घडत असतात. गुजराथी भाषिक अदानीला गुजराथी अस्मितेचे झटके येतात. ते त्यांनी त्यांच्या गुजरातमध्ये दाखवावेत, अन्यथा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे दिवसाची आठवण करून द्यावी लागेल अशी चर्चा मराठी माणसे करू लागली आहेत!

मुंबईत आदिवासींना म्हाडाची घरे…

मुंबईत आदिवासी राहतात, यावर आपला विश्वास बसत नाही ना? मुंबईतील बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये सुमारे दोन हजार आदिवासी राहतात. मुंबई म्हाडाचे सभापती मधू चव्हाण यांनी या आदिवासींना पक्की घरे देण्याचा हा धाडसी निर्णय घेतला. ९० एकर जागेवर ३०० चौरस फुटांचे एकमजली घरे बांधून ते देणार आहेत. अत्याधुनिक घरे बांधून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नाबद्दल मधू चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे याच नॅशनल पार्कमध्ये २४ हजार ९५९ झोपडीधारक आहेत. त्यांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

मुंबईचे फुफ्फुस ‘आरे जंगल’

मुंबईच्या एकमेव आरे कॉलॉनीतील जंगलात आग लावून जंगल नष्ट करण्यात येत आहे. दर दोन वर्षांनी आगीचे प्रकार घडत असतात. मुंबईतली मिठी नदी, आरे येथील जंगल, माहीम, वांद्रे येथील मॅनग्रोव्ह मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परंतु. बाहेरून आलेल्या बिल्डरांना त्याचं काही घेणे-देणे नाही. सरकारमधील मंडळीही त्यांना साथ देताना दिसतात. अशावेळी मुंबईचा मक्ता घेतलेली शिवसेना चवताळून का उठत नाही? आरे कॉलनीत मेट्रोसाठी स्टेशन उभं करणार म्हणून सेना विरोध करते. मग, दरवर्षी आरे जंगलात आगी लावणारे कोण, याचा पाठपुरावा का केला जात नाही? काही तरी गडबड आहे.

गोपीनाथ मुंडेंचा विसर…

भाजपाला ओबीसी चेहरा मिळवून देणारे गोपीनाथ मुंडे यांची १२ डिसेंबरला जयंती होती. परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान येथे विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आणि गोपीनाथ मुंडे विस्मरणात गेले. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे खरे भाजपा-शिवसेना युतीचे शिल्पकार…. देशात दोन खासदार असताना युतीच्या माध्यमातून भाजपा देशभर पसरला. पण, त्याच शिवसेनेला गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राज्यातील फडणवीस सरकारने अपमानित केले. गोपीनाथ मुंडेंचं काय घेऊन बसलात? नैतिकतेचे गुणगान करणारा भाजपाचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, हे काय माहीत नाही का? बघूया. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान विधानसभा निवडणुकीतून नवीन विचारमंथन घडतंय का?”
 

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content