HomeArchiveमहामानवास महावंदना!

महामानवास महावंदना!

Details
महामानवास महावंदना!

    15-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी
devendrabhujbal4760@gmail.com
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कालच १२८ वी जयंती झाली. त्यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून. भारतीय राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, मानववंशशास्त्र अभ्यासक, द्रष्टे विचारवंत, थोर समाजसुधारक, पुरोगामी कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक, शिक्षणतज्ञ, संपादक, कठोर तत्त्वप्रिय नेते असे बाबासाहेबांचे प्रखर व्यक्तिमत्व होते.

बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे रामजी आंबेडकर म्हणून ओळखले जात. ते सैन्यात मेजर-सुबेदार म्हणून सेवा करीत. त्यामुळे त्यांच्या भारतात विविध ठिकाणी बदल्या होत. सेवेबरोबरच ते समाजकार्यही करीत. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे हे होय. कोकण विभागाचा माहिती उपसंचालक असताना संपादक मित्र राजेंद्र घरत, सामाजिक कार्यकर्ते व वकील मित्र योगेश मोरे यांच्यासमवेत आंबावडे येथील स्मारक पाहण्याची संधी मिळाली होती. मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेबांच्या वडिलांची नेमणूक असताना १४ एप्रिल १८९२ रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला. आता या महूचे नामकरण “डॉ. आंबेडकर नगर” असे करण्यात आले आहे.

सातारा येथील शासकीय विद्यालयात त्यांनी १९०० साली नोव्हेंबरमध्ये प्रवेश घेतला. १९०८सालच्या जानेवारी महिन्यात ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. पर्शियन आणि इंग्रजी घेऊन १९१३मध्ये ते बी.ए. झाले. सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन १९१३च्या जुलै महिन्यात ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी दाखल झाले. अर्थशास्त्र हा प्रधान विषय घेऊन ते १९१५मध्ये एम.ए. झाले. याशिवाय डि.लीट, डीएससी, बॅरिस्टर ऍट लॉ असे ते उच्च विद्याविभूषित होते. ”दि कास्ट इन इंडिया” हा त्यांचा पहिला शोधनिबंध १९१६ मध्ये प्रकाशित झाला. इंग्लंडमधील लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पोलिटिकल सायन्स या संस्थेत ते जून १९१६ मध्ये दाखल झाले. आता ही संस्था लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्स या नावाने जगभर प्रख्यात आहे. बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात १९१७ साली पीएचडीपर संशोधन पूर्ण केले. “स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमिडिज” हा त्यांचा ग्रंथ १९१७ मध्ये प्रकाशित झाला.

मुंबईच्या सिडेनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते १९१८च्या नोव्हेंबर महिन्यात रूजू झाले. त्यांनी १९२०च्या जानेवारीत ”मूकनायक” वृत्तपत्र सुरू केले. पुढे लंडन विद्यापीठाची अर्थशास्त्रातील एमएससी पदवी मिळवली. ”दि प्रॉब्लेम ऑफ रूपी” या त्यांच्या शोधप्रबंधाला १९२३च्या मार्चमध्ये अर्थशास्त्रातील डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी मिळाली.

तत्कालीन मुंबई शासनात विधान परिषद सदस्य (एम.एल.सी) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सामाजिक समतेच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरलेला महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह १९२६च्या मार्च महिन्यात बाबासाहेबांनी घडवून आणला. १९२७च्या एप्रिलमध्ये त्यांनी “बहिष्कृत भारत” वृत्तपत्र सुरू केले. मुंबईच्या सरकारी विधि महाविद्यालयात १९२८ मध्ये ते प्राध्यापक झाले. १९३० साली त्यांनी “जनता” पत्र सुरू केले. मानवमुक्तीच्या शांततामय संघर्षात गाजलेला काळाराम मंदिर सत्याग्रह १९३० ते ३५ या कालावधीत केला. ब्रिटीश सरकारने १९३०-३२ या दरम्यान आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. १९३२च्या सप्टेंबरमध्ये त्यांनी पुणे करार केला. प्राध्यापक असलेल्या सरकारी विधि महाविद्यालयाचे ते १९३५ मध्ये प्राचार्य झाले.

अथक प्रयत्न करूनही जातव्यवस्था जात नाही हे पाहून त्यांनी १९३५च्या ऑक्टोबर महिन्यात येवला येथे झालेल्या जाहीर सभेत हिंदू धर्मत्यागाची घोषणा केली. पुढे जवळपास २० वर्षांनी त्यांनी प्रत्यक्ष धर्म परिवर्तन केले. १९३६ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. शिक्षण ही मूठभर माणसांची मक्तेदारी राहू नये म्हणून त्यांनी १९४५ साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे विविध ठिकाणी विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. या संस्थेने शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणूनच आम्ही घडलो, असे ऋण लाखो विद्यार्थी व्यक्त करतात.

”हू वेअर शुद्राज” हा त्यांचा गाजलेला ग्रंथ १९४६ मध्ये प्रकाशित झाला. १९४७च्या ऑगस्ट महिन्यात ते घटना समितीचे अध्यक्ष झाले. १५ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री झाले. बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९रोजी भारतीय संविधान सादर केले. हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारले. तेव्हापासून आपण दरवर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. १९५०च्या जूनमध्ये बाबासाहेबबांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून कोलंबिया विद्यापीठाने आपल्या या विद्यार्थ्यांस १९५२ मध्ये एलएलडी पदवीने गौरविले. बाबासाहेबांनी १९५५ मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. त्याचवर्षी “प्रबुद्ध भारत” वृत्तपत्र सुरू केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी लाखो अनुयायांसोबत नागपूर येथे बौद्धधर्म स्वीकारला. नेपाळमधील काठमांडू येथे नोव्हेंबर १९५६ मध्ये झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेला ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. ६ डिसेंम्बर १९५६ रोजी दिल्ली येथे या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले. विश्व एका महान विश्वनायकास मुकले.

भारत सरकारच्या “भारतरत्न” या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना १९९० मध्ये गौरविण्यात आले. बाबासाहेबांवर आतापर्यंत १२ चित्रपट, अनेक माहितीपट, ६ दूरचित्रवाणी मालिका, नाटकं निर्माण झाली आहेत. भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्मिती सहायक म्हणून काम करत असताना निर्माते सुधीर पाटणकर यांच्यासमवेत मला “ज्ञानपुंज डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हा टीव्हीपट राष्ट्रीय प्रसारणासाठी हिंदीतून आणि मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित करण्यासाठी मराठीतून करण्याची संधी मिळाली होती. त्याकाळी दूरदर्शन ही एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी असल्याने ६ डिसेंम्बर १९८९ रोजी प्रसारित झालेल्या या पटास प्रचंड प्रतिसाद लाभला होता. राष्ट्रीय प्रसारणात “प्राईम टाईम” असणाऱ्या रात्री ९ वाजता तो प्रसारित करण्यात आला होता. नंतर या अभिमानास्पद आठवणींवर आधारित लेखही मी लिहिला होता. बाबासाहेब आपल्यातून शरीररूपाने गेले असले तरी काळ जसा पुढे जात आहे, तसतसे त्यांचे “स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” असे एक ना अनेक तेजस्वी विचार, तत्त्वे जगाला अधिकाधिक प्रकाशमान करत आहेत.

दरवर्षी मुंबईत १४ एप्रिल या जयंतीदिनी, ६ डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी आणि नागपूर येथे धम्म परिवर्तनदिनी लाखोंच्या संख्येने उसळणारा जनसागर या लोकोत्तर महापुरूषाची महती गात असतो. त्यांच्या विचारांचे अनुकरणच आपल्याला व या विश्वाला पुढे नेणारे आहे. या महामानवास मनःपूर्वक मानवंदना.”
 

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content