HomeArchiveमंदिर ते बौद्ध...

मंदिर ते बौद्ध विहार

Details
मंदिर ते बौद्ध विहार

    05-Dec-2018

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी,  मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान

vinodsalvi1@gmail.com

भीमजयंती, बुद्ध जयंती, महापरिनिर्वाण दिन, वर्षावास, पौर्णिमा या दिवशी विहारात वंदना, त्रिसरण, पंचशीलेचे सामूहिक पठण होऊ लागले. मेणबत्ती, उदबत्ती, हार-फुले हा जुनाच पॅर्टन आमचं नवयान रूपात आजही जोरात सुरू राहिला. पण, कार्यकारणभावाला महत्त्व देणारे तथागत बुद्ध व मूर्तीपूजा, व्यक्तिपूजा नाकारणार्‍या बाबासाहेबांचे विचार खरोखर या वस्ती, चाळ, देशात रूजवण्याचे काम आपण केले का? जात सोडून सर्वांना आपलसं करणारे काम किती झालं? याचा उहापोह करणे हीच नव्या पिढीच्या रोखठोक मतानुसार काळाची गरज बनली आहे.

महामानव, बोधिसत्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबरला ६२ वा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्यानंतर इतका कालखंड लोटल्यानंतर दुसरी- तिसरी पिढी माणसाला जवळ करणार्‍या बौद्ध धम्माकडे एका वेगळ्याच दृष्टीने, आशेने पाहू लागली आहे. मूर्तीचा नव्हे तर जगात सर्वदूर पसरलेल्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भावी पिढी भारावून गेली आहे. बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी ‘दी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’या जगभरातील बौद्धांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी जागतिक स्तरावर काम करणार्‍या संस्थेच्या कार्यक्रमाला नुकतीच हजेरी लावून खळबळ उडवून दिली. त्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून वर्षानुवर्षे गाफिल राहिलेल्या भारतातील कोट्यवधी बौद्धांना अस्वस्थ करत आहे.

जागतिक पातळीवर जगातील बौद्धांच्या उत्कर्षासाठी काम करणारी ‘दी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’ ही संस्था वरकरणी भारतीय बौद्धांच्या ताब्यात आहे, असे कुणाला वाटत असेल तर तो मोठा भ्रम आहे. या संस्थेमार्फत भारतातील बौद्धांना मिळणारा निधी इथली कट्टरतावाद्यांची ब्राम्हणी व्यवस्थाच अलगद हडप करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना भारतातील बौद्धांच्या नावाने बनावट विंग स्थापून हा सर्व निधी भारतातील ब्राम्हणी व्यवस्था मजबूत करण्यासाठी व तिच्या शैक्षणिक, सामाजिक, उत्कर्षासाठी वापरत आहे, हा आंबेडकर यांचा गंभीर आरोप भारतीय बौद्धांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. आता तरी जागे होऊया, बेकी सोडून एकीने वागूया, हेच सांगतो आहे. डब्लूएफबीची 1950 साली पहिली परिषद व त्यानंतर 1954 आणि 1956 च्या तीन परिषदांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर सुमारे 29 वर्षांनंतर आपण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे या परिषदेला हजेरी लावल्याचा दावा राजरत्न यांनी एका खासगी वाहिनी दिलेल्या मुलाखतीत केला आहे. भारतातील काही बौद्ध भिक्खु आणि स्वतःला बौद्ध म्हणवून घेणारे स्वाभिमान गमावलले लोक हाताशी धरून बौद्धांना जागतिक स्तरावर शिक्षण, सामाजिक उत्कर्षासाठी मिळणार्‍या निधीवर खुलेआम डल्ला मारण्याचे काम ही मंडळी करत आहेत.

इतकेच नाहीतर बोधगयासारख्या बौद्धांच्या अनेक प्रेरणास्थळांवरही ब्राम्हणवाद पोसणार्‍यांनी कब्जा मिळविला आहे. बौद्ध धम्मात कुठेही कर्मकांड, पिंडदानाला थारा नसला तरी मानवतेचा आचरणशुद्ध धम्माला मोठी बाधा पोहोचवण्याचे काम खुलेआम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत बुद्धमय करण्याची शपथ इथला प्रत्येक जण घेत असला तर सामाजिक, धार्मिक, राजकीय फाटाफुटीमुळे विखुरलेला व विविध जाती-पातींत स्वतःची विभागणी करणारा बहुजन समाज हा कुटील डाव उलटवण्यासाठी कधी तरी सज्ज होईल का? मंदिरांची विहारे झाली असली तरी जगाने स्वीकारलेला व त्यातून आपली प्रगती साधलेला बौद्ध धम्म आज भारताच्या प्रत्येक कानाकोपर्‍यांपर्यंत का नाही पोहोचू शकला, याचा विचार स्वतःला आचारा-विचाराने बौद्ध सांगणार्‍या प्रत्येकाने केला नाही तर इतिहास आणि येणार्‍या पिढ्या आपल्याला माफ करतील का? ही चळवळ, लढा नव्या उमेदीने उभारण्याची गरज बौद्धमय भारताचे स्वप्न साकारण्यासाठी निर्माण झाली आहे.

भारत हे बुद्ध धम्माचे मूळ उगमस्थान असले तरी आशिया खंडासह संपूर्ण जगभरात बुद्ध विचारांचा पाया रोवला गेला. जात-पात-धर्म-पंथाला काडीचीही किमत न देता बुद्धांचा विज्ञानवाद स्वीकारून श्रीलंका, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, थायलंड आदी राष्ट्रांनी प्रगती आणि विकासाची कास कदापि सोडली नाही. पण, ज्या भारताने जगाला बुद्ध धम्म दिला तो इथे फारसा रूजलाच नाही किंबहुना कट्टरवाद, कर्मठतेचे ओव्हरडोस पाजून आचरणातला बुद्ध भारतीयांना कळूच दिला गेला नाही. या व्यवस्थेविरोधात रक्ताचा एक थेंब न सांडता महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित, शोषित, पीडित, बहिष्कृत वर्गाला 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या बुद्धपथावर कसे चालायचे, हे आपल्या अनुयायांच्या मनावर बिंबवण्याआधीच 6 डिसेंबर 1956 रोजी अवघ्या दीड महिन्यात बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बौद्धजन पंचायत समिती ही धम्मकार्याचा गाडा यशस्वीपणे हाकेल, अशी अपेक्षा होती. पण, त्यांनी जनतेला हाताशी धरून धम्मकार्य किती गतिमान केले, हा संशोधनाचा विषय. मंदिराच्या जागेवर विहारे उभी राहिली. या विहारांत तथागत बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्ती आणि प्रतिमा गावोगाव, शहराशहरांत विराजमान झाल्या. भीमजयंती, बुद्ध जयंती, महापरिनिर्वाण दिन, वर्षावास, पौर्णिमा हा दिवस विहारात वंदना, त्रिसरण, पंचशीलेचे सामूहिक पठण होऊ लागले. मेणबत्ती, उदबत्ती, हार-फुले हा जुनाच पॅर्टन आमचं ‘नवयान’ रूपात आजही जोरात सुरू राहिला. पण, कार्यकारणभावाला महत्त्व देणारे तथागत बुद्ध व मूर्तीपूजा, व्यक्तिपूजा नाकारणार्‍या बाबासाहेबांचे विचार खरोखर या वस्ती, चाळ, देशात रूजवण्याचे काम आपण केले का? जात सोडून सर्वांना आपलसं करणारे काम किती झालं? याचा उहापोह करणे हीच नव्या पिढीच्या रोखठोक मतानुसार काळाची गरज बनली आहे.

आपल्या संपूर्ण जीवनात विद्येला आणि शुद्ध आचरणाला महत्त्व देणार्‍या बाबासाहेबांना देव्हार्‍यात बसवणारे आपण त्यांच्या विचारांचे खरोखरीच पाईक आहोत का? हा मंदिर ते विहार सुरू असलेला भारतीय बौद्ध धम्माचा प्रवास मोठ्या प्रमाणात सकारात्मक दिशेनेही पावले टाकत आहे. बुद्धाचा विज्ञानवाद आणि बाबासाहेबांच्या विचारांवर अंमल करून भारतातील असंख्य बौद्धांनी कमालीची प्रगती साधली आहे. पण, हे प्रमाण किती? शिकला-सवरलेला जगाची प्रगती उघड्या डोळ्यांनी पाहणारा तरीही हात जोडण्याची व नवस फेडण्याची सोपी परंपरा जोपासणारे आपल्यातील किती? 1956 ते 2018 हा 62 वर्षांचा मोठा कालखंड भारतात पुनर्जिवित झालेल्या बौद्ध धम्माचा आहे. पण, माझ्यासाठी विहार हेच अभ्यास, विचार, चेतना, स्फूर्ती जागवणारे केंद्र बनले का? इतर धर्मियांनी बौद्ध धम्माकडे आकृष्ट व्हावे, असा कोणता आदर्श मी बौद्ध म्हणून माझ्या जीवनशैलीतून इतरांपुढे उभा केला? त्याहीउपर सर्वसामान्यांना समजेल-उमजेल, रूचेल अशा प्रमाण भाषेत बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञान झिरपून ते लोकापर्यंत का पोहोचू शकले नाही? बाबासाहेबांच्या विचारांवर जिवापाड प्रेम करणार्‍यांनी सत्याचा शोध घेणे थांबवले का? बुद्ध वंदना आणि गाथेच मराठी किंवा त्या-त्या प्रमाण भाषेत अर्थबोध होत नसल्याने तेही डोक्यावरून जाणारे मंत्रोच्चार या पारंपरिक, अनुकरणीय साच्याला छेद दिला पाहिजे का? मंगल परिणय, नामकरण सोहळा, पुण्यस्मरण बौद्ध म्हणून इतरांनाही कळू शकेल व आपलंस करेल असा मंदिरातून खरोखर बुद्धांच्या विहाराकडे नेणारा मार्ग तो प्रत्येक भारतीयालाही हवाहवासा वाटेल ना?”
 

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content