Details
प्रवरा परिसराची बंडखोरीची पंरपरा चौथ्या पिढीतही सुरू!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
प्रवरा नदीच्या पाण्यातच बंडखोरी वाहत असावी. कारण त्या नदीच्या खोऱ्यातील विखे पाटील घराण्याने सातत्याने प्रवाहाच्या विरूद्ध पोहण्याचे, नव्या वाटा शोधण्याचे आणि राजकारणाला नवे पैलू पाडण्याचे काम केले आहे. या घराण्याचे मूळ पुरूष, पद्मश्री या नावाने साऱ्या राज्यात प्रख्यात झालेले, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे असेच बंडखोर व क्रांतीकारी विचार घेऊन गेल्या शतकाच्या मध्यावर कामाला लागले होते. परिसरातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे हाच एक ध्यास!
ऊसापासून साखर तयार करण्याचा कारखाना काढायचा आणि तोही सहकारी तत्त्वावर, हा विचार घेऊन ते पुढे निघाले होते. शेतीवर विचार करणारे अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी सहकारी तत्त्वावर साखर कारखाना निघू शकतो व तो नफ्यात चालवता येऊ शकतो हा सिद्धांत मांडला होता. पण त्याला मूर्त रूप देण्याचे काम पद्मश्रींनीच केले. त्यासाठी घरची भाजीभाकर घेऊन ते बाहेर पडत आणि गावागावात जाऊन सहकारी कारखान्यासाठी शेअर भांडवल गोळा करत असत. त्यांच्या निर्धारानेच 1950 मध्ये प्रवरानगर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ रोवली गेली आणि तीन वर्षांतच त्यांनी प्रत्यक्षात साखर विकायला सुरूवात केली. ही क्रांती होती.
त्यांच्या उदाहरणाने प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साखर कारखाने सुरू झाले. रावळगाव शुगरसारखे खाजगी साखर कारखाने आधीही निघाले होते. पण शेतकऱ्यांचा कारखाना, शेतकरी सभासदांसाठी चालवलेला व त्याचे नेतृत्त्वही करणारे सारे शेतकरीच असा प्रयोग विखे पाटलांनी प्रवरानगरच्या माळावर फुलवला व त्याचा दरवळ राज्यात सर्वत्र पोहोचला. शंकरराव मोहिते, वसंतदादा पाटील, कोरे, किसनवीर अशा नेत्यांनी आपापल्या क्षेत्रात सहकारी साखर कारखान्यांचे प्रयोग सुरू केले आणि ते सारे प्रयोग सुरूवातीच्या काळात काही दशकांमध्ये चांगलेच यशस्वी ठरले. सहकाराने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. प्रवरा परिसरात अनेक उद्योग, कारखान्याच्या भरवशावर सुरू झाले व फुलले.
हा संपूर्ण परिसरच कात टाकून उभा राहिला. हे सारे श्रेय होते प्रयोग करण्याच्या धाडसाचे, नवी दिशा शोधण्याच्या बंडखोर वृत्तीचे. पद्मश्रींचा तोच वारसा, एकनाथराव ऊर्फ बाळासाहेब विखे पाटील यांनी सत्तर-ऐशीनंतर पुढे नेला. बाळासाहेबांनी कारखान्याचा विस्तार केला. त्याला नवीन उद्योगांची जोड दिली. तोच वारसा कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे नेला. आता प्रवरा उद्योगसमुहात सुमारे शंभर व्यवसाय व संस्था आहेत. त्यातील बहुतेक साऱ्या सहकारी आहेत. त्यांनी खाजगी ट्रस्टमार्फत शैक्षणिक संस्था उभ्या केल्या व वाढवल्या. त्यात डीम्ड युनिवर्सिटीही आहेत. पुण्यापर्यंत या शैक्षणिक कामाचा विस्तार झालेला आहे.
प्रवरा परिसरात विखेंच्या तीन पिढ्या एकाच वेळी कार्यरत होत्या, तेव्हा विठ्ठलरावांचा उल्लेख पद्मश्री असाच व्हायचा, तर बाळासाहेबांचा उल्लेख खासदारसाहेब असा व्हायचा. तिसरे विखे राधाकृष्ण हे चेअरमन नावाने प्रख्यात राहिले. बाळासाहेबांनी एकूण आठ वेळा लोकसभेच्या निवडणुका अहमदनगरमधून जिंकल्या होत्या. नगर दक्षिण आणि कोपरगाव अशा तेव्हाच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधून ते वेळोवेळी विजयी झाले होते हे विशेष. त्यामुळे ते नेहमीसाठीच खासदार राहिले. ते शंकरराव चव्हाणांचे राजकीय सहप्रवासी होते आणि त्यामुळे ते नेहमीच यशंवतराव चव्हाण वा वसंतदादा आणि नंतर शरदराव पवार या राजकीय पंरपरेच्या विरोधातच उभे दिसले.
विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे इंदिरा गांधींच्या निधनानंतर ते महाराष्ट्रातील महत्त्वाचे खासदार असूनही राजीव गांधींच्या जवळ जाऊ शकले नाहीत. परिणामी राज्यातील नेतृत्त्व बदलाच्या अनेक वेळा येऊनही सक्षम हुषार व धोरणी बाळासाहेबांचे नाव राजीव गांधींनी मुख्यमंत्रीपदासाठी स्वीकारले नाही. महाराष्ट्राने संभाव्य मुख्यमंत्री म्हणून मात्र बाळासाहेबांकडे नेहमीच पाहिले होते. राजीव गांधींनी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना महत्त्व दिले होते. पवार व शंकररावांचे फार पटत नव्हतेच. चव्हाणांच्या मागे बाळासाहेब विखे पाटलांची बौद्धिक, आर्थिक व अन्य सारी शक्ती उभी असल्यामुळे सहाजिकच शरदरावांच्या दृष्टीने विखेंच्या नावावर कायमची फुलीच राहिली. आणीबाणीनंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली होती. त्यात विखे आणि शंकरराव चव्हाणांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस नावाचा एक पक्ष स्थापन केला होता. या मस्का काँग्रेसच्या नावावर शंकरराव पवारांच्या कडबोळे मंत्रिमंडळात अर्थमंत्री बनले.
विखे आणि पवारांची वाद व लढ्याची पंरपरा ही अशी जुनी आहे. त्या संघर्षाचे मूर्त प्रत्यंतर 1990-91 मध्ये आले. ती निवडणूक अनेकार्थांनी ऐतिहासिक होती. जनता प्रयोगांनंतर काँग्रेसची सत्ता येण्याची चिन्हे होती. राजीव गांधींचे सरकार केंद्रात येणार हे लोकांनी जवळपास ठरवले होते. पण नगरमध्ये विखेंना काँग्रेसचे तिकीट मिळू न देण्याचा चंग पवारसाहेबांनी बांधला होता. शंकरराव चव्हाणही त्यात काही करू शकले नाहीत. काँग्रेसचे तिकीट नगर दक्षिणमध्ये विखेंएवजी पवारांचे मित्र यशवंतराव गडाख पाटलांना गेले. सायकल चिन्ह घेऊन विखे अपक्ष उभे राहिले. त्या निवडणुकीचे दोन टप्पे पडले होते. एक होता राजीव गांधींच्या हत्त्येपूर्वी विपार पडलेले मतदान आणि दुसरा टप्पा राजीव हत्त्येनंतरच्या मतदानाचा टप्पा. नगरचे मतदान नेमके 23 मे रोजी होते आणि 21 मेच्या रात्री राजीव गांधींची हत्त्या पेरमबुद्दुरला तामिळनाडूच्या टोकावर झाली आणि देशाचे चित्रच बदलले. विखेंच्या मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलली गेली व ती 12 जून रोजी पार पडली. राजीव गांधींच्या हत्त्येनंतर जी सहानुभूतीची लाट देशभर उडाली, त्याचा प्रभाव अर्थातच नगरवरही होता. विखेंचा पराभव दहा हजार मतांनी झाला. पण विजयी उमेदवार गडाख पाटील व प्रचारक शरद पवार यांच्यावर त्यांनी निवडणूक खटला भरला. पवार व गडाख यांनी आपली बदनामी करणारा अपप्रचार केला असा विखेंचा आरोप होता आणि औरंगाबादेच्या न्यायलयात त्यांनी तो जिंकलाही!
उच्च न्ययालायाने गडाखांची निवडणूक प्रचारातील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर रद्दबातल ठरवली आणि विखेंना विजयी घोषित केले. त्यात पवारांवरही बालंट आले. पवारांना 1993 नंतरची सहा वर्षे निवडणुकीतून बाद ठरवणारा निर्णय त्यात निवडणूक आयोगाला घ्यावा लागला असता. जसे, निवडणूक प्रचारातील धार्मिक भावना भडकावणयाच्या, हिंदुत्त्वाच्या, मुद्दयावर बाळासाहेब ठाकरे व सुभाष देसाईंना सहा वर्षे मतदार म्हणूनच बाद ठरवले गेले तसाच निर्णय पावारांच्या बाबतीतही झालाच असता. पण सर्वोच्च न्यायालयात ते गेले व तिथे औरंगाबाद न्यायालयाचा निर्णय फिरवला गेला. गडाखांची खासदारकी व पवारांचे मत दोन्ही त्यामुळे वाचले. शरदरावांनी परवा बोलताना म्हटले होते की, आम्ही एकदा विखेंना पराभूत केले आहे ते असे अर्धसत्य होते. राजीव गांधींच्या हत्येच्या प्रभावात तिथे मतदान झाले आणि निवडणूक गैरव्यवहाराचे आरोप उच्च न्यायालयात वैधही ठरले होते हे विसरता येणार नाही.
त्या साऱ्या बाळासाहेबांच्या बंडांचा परिणाम सहाजिकच पुढे कायम राहिला. पवारांनी तसेच त्यांचे पुतणे अजितदादांनी सत्तेच्या कालावधीत विखेंच्या विरोधात शक्य त्या साऱ्या कारवाया केल्या. विखेंच्या प्रभावातील प्रवरा वीज वितरण कंपनीला ऊर्जा मंत्री अजितदादा पवार मदत करू शकले नाहीत! 1995 नंतरची पाच-सहा वर्षे विखे पितापुत्रांनी नवा राजकीय प्रयोग केला. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झाले. त्यात बाळासाहेब आधी सेनेचे खासदार झाले. पण राधाकृष्ण काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. नंतर राजीनामा देऊन सेनेत दाखल झाले आणि पोटनिवडणुकीतून शिवसेनेचे आमदार बनले. 1996 पासून पुढे चार वर्षे राधाकृष्ण राज्यात तर 1999 नंतर बाळासाहेब केंद्रात मंत्री राहिले. राधाकृष्ण कृषीमंत्री म्हणून गाजले. केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये बाळासाहेब विखे अर्थ राज्यमंत्री राहिले. त्यांचीही कामगिरी प्रभावी राहिली.
2004 मध्ये बाळासाहेब नगरमधून पुन्हा जिंकले. खासदार झाले. पण त्यांच्या पक्षाची सत्ता दिल्लीत उरली नाही. त्यानंतर राधाकृष्ण यांनीही शिवसेना सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते राज्यात पुन्हा मंत्रीपदी आरूढ झाले. त्यामुळे त्यांचा उल्लेख प्रवरा परिसरात नामदार असा केला जाऊ लागला. राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसमध्ये शंकररावांचे पुत्र अशोक चव्हाणांचे मित्र ही भूमिका निभावली. पण त्यांचा एक डोळा मुख्यमंत्रीपदावर होता व आहेही! 2004 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या सोबत लढले आणि त्या वाटपात नगरची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडे राहिली. नगरमधील दुसरा मतदारसंघ शिर्डी हा मात्र राखीव झाला होता. पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर बाळासाहेब विखे यांचे लोकसभेत जाण्याचे मार्ग बंदच झाले. राधाकृष्ण यांचा उच्च विद्याविभूषित मुलगा डॉ. सुजय राजकारणात सक्रीय झाल्यानंतर गेले वर्षभर नगरची लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी असा प्रयत्न सुरू होता. पण अशोक चव्हाणांनी पुरेसा प्रयत्न केला नसावा वा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी, विखेंवरील “प्रेमामुळे” त्या प्रयत्नांना दाद दिली नसावी!”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी