Details
पंतप्रधानांचे दौरे आणि मतदारांचा कौल!
01-Jan-2019
| 0
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून त्यांचे विदेशांतील दौरे नेहमीच चर्चेचा आणि विरोधकांच्या टीकेचा विषय राहिले आहेत. भारतासारख्या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या देशाच्या प्रमुखाने विदेश दौरे करावेत यात आश्चर्य काहीच नाही. आश्चर्य होते ते हे की मोदी विदेशात अधिक आणि देशात कमी अशी स्थिती विरोधी पक्षांना दिसत होती. त्यावर सडकून टीकाही झाली. पण मोदी यांनी देशाची बिघडलेली, खालावलेली प्रतिमा सावरण्यासाठीच, उंचावण्यासाठी, भारताला पुन्हा महत्त्व प्राप्त करून देण्यासाठीच मी विदेशांत जात असतो, असे सांगून विरोधी पक्षांची तोंडे बंद केली. आता त्यांच्या एकूण विदेश दौऱ्यांविषयी जी माहिती समोर आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. त्यांनी आपल्या आजवरच्या कार्यकाळात ८५ पेक्षा जास्त देशांचा दौरा केला आहे. प्रवासासाठी ८५० तास विमानात व्यतित केले आहेत. १६ व्या लोकसभेत १६ मे २०१४ रोजी मोदी यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून १६०० पेक्षा जास्त दिवसांच्या त्यांच्या कार्यकाळात १७० पेक्षा जास्त दिवस ते विदेशात होते. त्यांनी आतापर्यंत ४९ दौरे केले. ८५ देशांमध्ये ते गेले. यावरून मोदी यांच्यावर प्रचंड उलटसुलट टीका झाली. सोशल मीडियावरून शेरेबाजी झाली. व्यंगचित्रे आली. पण मोदी यांनी विदेश दौरे थांबवले नाहीत.
मध्यंतरी त्यांचे विदेश दौरे कमी झाले. जवळपास थांबले होते. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली. भारतीय जनता पार्टी संकटात आहे. मोदी यांचे नेतृत्त्व पणाला लागले आहे म्हणूनच मोदी देशात आहेत. नाहीतर कधीच एखाद्या देशाला रवाना झाले असते, असे शेरेही मारण्यात आले. विदेश दौरे करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पाच वर्षांत ५० देशांना भेट दिली होती. त्यासाठी ३७ दौरे केले होते. २०१४ मधील सहा महिन्यांत नरेंद्र मोदींनी ९ देशांना भेट दिली. पुढील वर्षी त्यांनी २६ विदेशी दौरे केले. सर्वात कमी विदेश दौरे त्यांनी २०१७ मध्ये केले. या वर्षी ते ९ देशांना भेट देऊन आले. यंदाच्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये मोदींनी २२ देशांना भेट दिली आहे. केवळ विदेश दौरे म्हणून त्यांच्या या भेटीगाठी दुर्लक्षिता येणार नाहीत. कारण त्यांच्या विदेश दौऱ्यात ३०० पेक्षा जास्त करार झाले आहेत. जगातील पहिल्या पाच देशांशी त्यांचे संबंध चांगले राहिले आहेत. मुत्सद्दीपणाचा परिचय देत रशिया, चीन यांना सांभाळतानाच त्यांनी अमेरिका, जपानशीही मैत्री राखली आहे. मोदी यांनी केलेले करार, त्यांच्या कल्पना, इतर राष्ट्रप्रमुखांशी असलेले त्यांचे औपचारिक संबंध, त्यांनी आणलेली विदेशी गुंतवणूक या सगळ्याबाबत विरोधी पक्षांनी नेहमी टीकेचा सूरच लावला आहे. यातून मोदी यांनी काय साध्य केले, देशासाठी काय मिळवले हे प्रश्न आताही विचारले जातात आणि यापुढेही विचारले जातील.
राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांवर जून २०१४ पासून आतापर्यंत १४८४ कोटी रूपये खर्च झाले आहेत. त्यात हॉटलाइनवरील संवादांसाठी ९ कोटींचा खर्च समाविष्ट आहे. भारताची अर्थव्यवस्था तोळामासा असताना काही विकसनशील देशांना मोदींनी दिलेल्या अर्थसहाय्यावरही नेहमी टीका होत असते. पण देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी केलेला हा खर्च आहे हेही समजून घ्यायला हवे. मोदींनी विदेश प्रवासावर केलेला एकूण खर्च मनमोहन सिंह यांच्या खर्चापेक्षा ६४ कोटींनी कमी असल्यामुळे भाजपाला खचितच हायसे वाटले असेल. मात्र निधीची चणचण असल्यामुळे या आर्थिक वर्षात १९.३२ कोटी रूपयांचे बिल अद्याप चुकते करण्यात आलेले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या माहितीचा योग्य तो उपयोग विरोधी पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात करून घेतील यात शंका नाही. जनतेला मात्र मोदी वा मनमोहन सिंह यांच्या दौऱ्यांतून भारताच्या हाती नेमके काय लागले, भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभावात किती वाढ झाली, हा प्रभाव पाकिस्तानप्रश्नी आंतरराष्ट्रीय मंचांवर दिसून आला का, अमेरिकेने भारतासाठी काय सवलती दिल्या, चीनने भारताशी संबंध कसे ठेवले, अशा प्रश्नांची उत्तरे अपेक्षित असतात. दौऱ्यांच्या आकडेवारीपेक्षा, खर्चापेक्षा या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे या सगळ्या खटाटोपातून काय साध्य झाले ते आणखी अचूकपणे समोर आणू शकतील. लोकांना, मतदारांना हे सर्व जाणून घेण्याचा अधिकार आहे. येथे कुणी मौन बाळगून या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. निवडणुकीआधी मतदारांचा कौल जाणून घ्यायचा असेल तर केवळ आरोप, प्रत्यारोप, दावे करण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणारा हा तपशील काँग्रेस आणि भाजपाला जनतेसमोर आणावाच लागेल.”

