Details
नाराजांचे बंड!
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
निवडणुका जाहीर झाल्या की लगोलग नाराजांचे थवेही फिरू लागतात. कुणी उमेदवारी डावलल्यामुळे नाराज, कुणी यंदाही तिकीट कापल्यामुळे नाराज, कुणी चर्चेत नावही नसल्यामुळे नाराज आणि काहीजण तर उमेदवारी मिळाली म्हणूनही नाराज होतात. उमेदवारी मिळूनही नाराज मंडळी मतदारसंघ बदलल्यामुळे नाराज असतात किंवा धोक्याच्या मतदारसंघात पराभवाला सामोरे जाण्यासाठीच पक्षाने तिकिट दिले या समजुतीने नाराज असतात. काही नाराज ठाण्यातील भाजपा नगरसेवकांसारखे असतात. त्यांच्या नाराजीची कारणे वेगळी असतात. ती सांगताही येत नाहीत आणि सहनही होत नाहीत अशा प्रकारची असतात. मग युती झाली तरी आम्ही नाही प्रचार करणार जा.. म्हणत हे नाराज बंडोबा शिवसेनेचे खासदार आणि युतीचे ठाणे मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांच्याकडे पाठ फिरवतात.
ठाण्यातील २३ भाजपा नगरसेवकांची नाराजी विलक्षण होती. विलक्षण अशी की आम्ही नाराज आहोत, राजन विचारे नकोत म्हणत नारायण पवार, अशोक राऊळ, मिलिंद पाटणकर यांच्यासह २३ बंडोबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दंड थोपटले होते. पण नंतर त्यांचे म्याऊं झाले, मेळाव्यात नारायण पवार यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानाला लागताना सर्वांनी पाहिले आणि विचारेंचा पुतण्या मंदार विचारे यांच्यामुळे नगरसेवकपद गमावलेले अशोक राऊळ दोन बोटे उंचावून नाईलाजाने विजयाची खूण करतानाही दिसले. अर्थात ते वरवरचे होते. कारण दुसऱ्याच दिवशी नारायण पवार यांनाच इतर बंडोबांनी धारेवर धरले. पक्षश्रेष्ठींसमोर मी काय बोलणार, पण मी तुमच्याबरोबरच आहे, असे सांगत त्यांनी बाजू सावरून घेतली आणि बंडोबांनी पुन्हा बाह्या सरसावल्या. तेही नाटक दोन दिवसच चालले. पाटणकर यांनी खासदार कसा उच्चशिक्षित असावा असे ज्ञानही फेसबुकवर दिले. पण तीही सुरसुरीच ठरली.
विचारे नकोतच म्हणणारे बंडोबा युतीच्या एकत्र मेळाव्याकडे पाठ फिरवताना दिसले, साक्षात चौकीदार मोदींची मै चौकीदार.. ही मन की बात ऐकायलाही बंडोबा फिरकले नाहीत तेव्हा वाटले होते, या नाराजांनी मुद्दा अगदी लावून धरलाय. सगळ्यांनी बातम्याही केल्या. पण यांचे युतीप्रमाणेच झाले. युतीसाठी जशी नाही नाही म्हणता म्हणता होय होय म्हणत शिवसेनेने पुन्हा पदराला गाठ मारून घेतली तसेच या नाराजांचेही कडबोळे झाले. वरिष्ठ म्हणजे प्रदेश भाजपाकडून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट कानऊघाडणी झाल्यावर या २३ नगरसेवकांनी सोमवारी अखेर नमते घेत, युतीच्या बैठकीला हजेरी लावली. या निवडणुकीत एकदिलाने काम करू अशी शपथही आता या बंडोबांनी घेतली आहे. म्हणजेच बंडोबांचे थंडोबा झाले आहेत. गटनेते नारायण पवार यांनीच नांगी टाकल्यामुळे माघार घेण्याशिवाय इतरांना काहीच पर्याय नव्हता.
खासदार विचारे यांना यामुळे जरा हायसे नक्कीच वाटले असणार. अर्थात ही नाराज मंडळी खरोखरीच किती एकदिलाने प्रचारात उतरतात आणि त्यांच्या प्रभागात काय संदेश देतात यावर विचारेंचे मतदान अवलंबून असेल. तिकडे विचारेंशी झुंजण्याचा विडा तोंडात कोंबले गेलेले आनंद परांजपे हे या नाराजांना पडद्याआडून भुलवण्याचा प्रयत्न करतील हेही उघड आहे. नाराजांचे बंड असे थंड झाले असताना तिकडे आगरी, कोळी भूमिपूत्र चवताळून उठले आहेत. कोळीवाडे, गावठाण सीमांकन, विकास, भूसंपादन मोबदला अशा अनेक प्रश्नांसंदर्भात सातत्याने तोंडाला पाने पुसली गेल्यामुळे त्यांच्या मनात नाराजी खदखदत आहे. हाच अन्यायग्रस्त आगरी, कोळी भूमिपूत्र आता ठाणे, कल्याण, भिवंडी, रायगडसह मुंबईत लोकसभेसाठी आगरी कोळी उमेदवार उभा करणार आहे. म्हणजे मतांसाठी जे आगरी कार्ड कल्याण, भिवंडीत वापरले गेले आहे ते इथे थेट समाजाकडूनच वापरले जाईल. गावठाण आणि कोळीवाड्यांचे सीमांकन, विकासाचे हक्क, क्लस्टर डेव्हलपमेंट, सक्तीचे भूसंपादन याबाबत हा भूमिपूत्र कमालीचा आक्रमक झाला आहे.
आजवर कुठल्याही सरकारने, लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागण्यांकडे निर्णायक लक्ष न दिल्यामुळे त्यांच्यात तोंडाला पाने पुसली गेल्याचीच भावना आहे. आता ठाणे, कल्याण, भिवंडी, रायगडसह मुंबईतील लोकसभेच्या आखाड्यात प्रस्थापितांना आगरी-कोळी महासंघाचे उमेदवार आवाज देणार आहेत. भिवंडी, कल्याण, ठाणे-बेलापूर, पालघर, रायगड, मुंबई-दक्षिण, मुंबई-उत्तर, मुंबई-ईशान्य या आठ लोकसभा मतदारसंघात भूमिपूत्रांची संख्या किमान चार लाखांच्या घरात वा पुढेच आहे. सागरी किनारी भागासह कोकण पट्टयात आगरी, कोळी, कुणबी, कराडी, भंडारी, तेली, तांबोळी आणि ख्रिस्ती व मुस्लिम बांधव यांची वस्ती आहे. या प्रत्येकाचे प्रश्न जगण्याच्या हक्काशी, कसण्याच्या गरजेशी निगडीत आहेत. शहरीकरणाच्या लाटेत उद्ध्वस्त होत चाललेला हा समाज आहे. यामुळेच त्यांनी आपल्या प्रश्नांसाठी इतर राजकीय पक्षांवर अवलंबून राहण्यापेक्षा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतःची राजकीय ताकद निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाराजांची धग भाजपामधील नाराजांपेक्षा वेगळी आहे. त्यांच्या एकूण मतांची संख्या लक्षात घेता महासंघाने हा निर्धार अंमलात आणला तर प्रमुख उमेदवारांची झोप उडू शकते. अर्थात या नाराजांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री, आशिष शेलार, एकनाथ शिंदे तसेच अन्य प्रमुख नेत्यांना मध्यस्थी करावी लागणार आहे. नपेक्षा भाजपामधील नाराजांपेक्षा या नाराजांच्या बंडाचे निखारे सर्वच पक्षाच्या उमेदवारांना मतदानात चांगलेच चटके देतील हे नक्की!”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान