महाराष्ट्राच्या राजकारणातील याआधीची पाच वर्षे ही अत्यंत नाट्यपूर्ण तर होतीच, पण त्याचे गूढ आजही पुरतेपणाने उलगडलेले नाही. 2019च्या नोव्हेंबर महिन्यानंतर राज्यात तोवर सत्तारूढ असणारी भाजपा-शिवसेना युती अचानक संपुष्टात आली. नंतर सुरु झाल्या चित्रविचित्र युत्या व आघाड्या. त्यानंतर स्थापन झालेली सरकारेही अल्पकाळासाठी सत्ता गाजवू शकली. त्या पाच वर्षांत राज्यातील दोन मोठे राजकीय पक्ष दुभंगले. खरा कोण हा वाद पेटला आणि त्यावर न्यायालयाचा अंतिम निकाल अजूनही आलेला नाही. जनतेने एका निवडणुकीत एका गटाला मोठे मानले तर पुढच्याच मतदानात त्या गटाला फेकून दिले. २०१९नंतर आलेले पहिले सरकार तर अल्पजीवीपणाची कमाल ठरले. अडीच दिवसांतच संपले! यामागचे खरे सूत्रधार होते फडणवीसांसाठी त्यावेळी असलेले ‘स्पाय हू लव्हड मी’ म्हणजेच ‘दगाबाज दिलबर’ शरद पवार!! दुसरे सरकार आले ते विळ्या-भोपळ्याची मोट बांधल्यासारखे होते. ते अडीच वर्षांत पडले. तिसरे सरकार पुन्हा एका नैसर्गिक म्हणता येईल अशा युतीचे होते आणि ते ऊर्वरीत काळासाठी टिकले.
खरेतर पहिले वर्षभरच नैसर्गिक म्हणावी अशा युतीची सत्ता दिसली. नंतर युतीचा विस्तार महायुती असा झाला. त्यात पहिल्या अडीच दिवसांच्या सरकारचे प्रतिबिंब दिसत होते. त्यानंतर दीड वर्षात निवडणुका झाल्या. त्यातही लोकसभेत जनतेने जो रंग दाखवला होता तो विधानसभेच्या निकालानंतर पूर्ण बदललेला दिसला. हे सगळे राजकीय चमत्कार, या सगळ्या पक्षीय कोलांटउड्या का व कशा मारल्या गेल्या यावर विद्यमान मुख्यमंत्री व 2019 ते 2024 या भरगच्च घटनाक्रमाचे करते-करविते देवेन्द्र फडणवीस यांनी आता एक निराळा प्रकाश टाकला असून तो राज्याच्या जनतेसाठीही महत्त्वाचा ठरणारा आहे. नोव्हेंबर 2019मध्ये शरद पवार आणि त्यांचा पुतण्या अजित पवार यांच्याशी चर्चा, विचारविनिमय होऊन मगच एकत्र सरकारचा प्रयोग झाला होता, असे फडणवीस यांनी आता पुन्हा संगितले आहे. ते म्हणाले की, पण नंतर काका अचानक मागे फिरले. ते का, हे कळले नाही. पण पुतण्या आमच्याकडे आले व त्यांनी सांगितले की, मी ठरल्यानुसार तुमच्याबरोबरच राहणार आहे. त्यावेळी पंधराव्या त्या विधानसभेतील पहिले सरकार देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात स्थापन झाले. ते अर्थातच अल्पजीवी ठरले. ते का आले हा घटनाक्रम फडणवीसांनी प्रथमच कथन केला आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. भाजपा व सेनेने एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या व त्या युतीचे स्पष्ट बहुमत निकालानंतर दिसत होते. पण सरकार स्थापनेच्या हालचालीत मातोश्रीचा प्रतिसाद येत नव्हता. फोन घेतले जात नव्हते. तेव्हा भाजपाच्या हे लक्षात आले की, उद्धव ठाकरेंनी निकालानंतर पाठीत खंजीर खुपसला आहे. फडणवीस सांगतात की, त्या टप्प्यावर आमच्याकडे शरद पवारांचे दूत आले व म्हणाले की आपण सरकार तयार करूया. आमच्या असे लक्षात आले की, आपल्याविरुद्ध घाणेरडं राजकारण करून निवडणुकीतील मित्र म्हणवणारा पक्ष सत्ता काढून घेण्याचे काम करत आहे. तेव्हा मग राजकारणात जिवंत राहण्यासाठी निराळी चाल खेळावीच लागेल. समोरून आलेल्या पवारांशी बोलणी केली. सर्व पवारांनीच ठरवले. खरेतर तेव्हा राष्ट्रपती राजवट लावण्याची गरजच नव्हती. आम्ही दोन्ही पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन पत्र दिले असते की लगेच शपथविधी झाला असता. पण शरद पवारांनीच आमच्यापुढे ही अट ठेवली की मी तुमच्यासोबत येतो. पण मी असा लगेच येऊ शकत नाही. मला लोकांत जाऊन भूमिका तयार करावी लागेल. तुम्ही राष्ट्रपतीशासन लावा. मी राज्यात फिरून जनतेला सांगेन की निकालच असे आले आहेत की आपल्याला भाजपाला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागेल. कारण लगेच पुन्हा निवडणुका घेणे राज्याला परवडणारे नाही.
पवारांच्या या बोलण्याला 2014मधील घटनांची पार्श्वभूमी होती. त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना व भाजपा हे चारही मोठे पक्ष एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढले होते. एकट्या भाजपाच्या आमदारांची संख्या 122 आलेली होती. निकाल जाहीर होत असतानाच प्रफुल्ल पटेल व शरद पवारांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल असे जाहीर करून टाकले होते. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंची चांगलीच गोची करून टाकली होती. 2019ला पवारांनी साधारणतः तशीच भूमिका घेत भाजपासोबत सरकार स्थापण्याची तयारी दाखवली. फरक इतकाच झाला की आता ते सत्तेत यायला तयार होते. भाजपा नेत्यांनी त्यांच्या देकारासाठी लगेचच होकार दिला. सत्तास्थापनेच्या वाटाघाटी झाल्या. कोणत्या जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे, खाती कोणाला ती मिळणार, किती मिळणार, वगैरे चर्चा होत असतानाच ठरल्यानुसार फडणवीसांनी काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. तो राजीनामा मिळताच रज्यपालांनी सरकारस्थापनेसाठी सर्व पक्षांकडे विचारणा केली. भाजपाने नकार दिला. शिवसेनेचाही नकार आला. राष्ट्रवादीने नकार कळवतानाच राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. फडणवीसांच्या ताज्या मुलाखतीत धक्कादायक गौप्यस्फोट हा आहे की, राष्ट्रवादीच्या नकाराचे जे पत्र राजभवनावर शरद पवारांच्या सहीने गेले ते टाईप झाले होते फडणवीसांच्या संगणकावर! कुणाही पक्षाची सरकार स्थापनेची तयारी नाही हे पाहून तेव्हाचे राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली व राष्ट्रपतींचे शासन राज्यात लागूही झाले.

पवारांनी नंतर गंमत सुरू केली. भाजपाबरोबर आपण सत्तेत जाऊ शकत नाही, असे ते म्हणू लागले. आता गोची भाजपाची झाली. पण अजित पवार अस्वस्थ झाले. आधी आपण हवे म्हणून साऱ्या तयाऱ्या केल्या. आता नाही म्हणून शब्द फिरवणे योग्य नाही, अशी दादांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झाली म्हणून मग ते वर्षावर मध्यरात्री पोहोचले. सरकारस्थापनेचा दावा करा हे फडणवीसांना त्यांनी सांगितले. त्यामुळेच तातडीने रातोरात राष्ट्रपती राजवट उठली आणि अगदी पहाटे नाही, पण सकाळी लवकर फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर दादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अर्थातच हे सरकार अल्पजीवी ठरले. ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सांगितले की आधी सरकारवरील विश्वास ठराव खुल्या मतदानाने घेतला पाहिजे. नंतरच मग विधानसभेचा अध्यक्ष निवडणे वगैरे कामकाज होईल. त्याचवेळी त्या सरकारचे भवितव्य ठरले. विधानसभेला सामोरे न जाताच फडणवीसांनी व दादांनी राजीनामा देऊन टाकला. पुढे काय काय झाले हे आपण पाहिलेच. त्या अडीच दिवसांच्या अथवा 80 तासांच्या फडणवीस-दादा सरकारची स्थापनेची तयारी थोरल्या पवारांच्या पुढाकाराने झाली होती, हे आता पाच-सहा वर्षांनंतर फडणवीस थेटपणाने सांगत आहेत आणि त्यांनी सांगून चार-सहा दिवस उलटून गेल्यानंतरही थोरल्या पवारांनी काहीही खुलासा केलेला नाही ही बाब अधोरेखित करावी लागेल. या मुलाखतीमधील आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे फडणवीसांनी सांगितलेली सध्याच्या सरकारच्या स्थापनेची हकीकत. 2022 जुलैपासून एकनाथ शिंदे सरकारचे नेतृत्त्व करत होते आणि निवडणुकीनंतरच्या सरकारचेही नेतृत्त्व शिंदेच करणार असे सांगितले जात असे. त्यांच्या कार्यकर्त्यांची, आमदारांची भावना तशीच होती. फडणवीस सांगतात की, निकालानंतर राष्ट्रवादीचे दादा, शिवसेनेचे शिंदे व भाजपाचे नेते एकत्र बसले तेव्हा शिंदेंनी पहिल्याच बैठकीत हे स्पष्ट केले की मुख्यमंत्री भाजपाचा होणार. कारण संख्या तुमची अधिक आहे. हे मला मान्यच आहे व ते योग्यही आहे. फडणवीस असेही स्पष्ट करतात की, या सरकारमध्ये शिंदे नाराज वगैरे काही नाहीत. राज्यातील सर्व वादळे आम्ही शांत केली आहेत. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सध्याचेच सरकार पुढची पाच वर्षे कायम राहणार असून यात उद्धव ठाकरेंना कोणतीही जागा शिल्लकच नाही. “आता चौथ्या भिडूला युतीत जागा नाही” हे फडणवीसांनी मागेही राज ठाकरेंच्या संदर्भात म्हटलेच होते. आता त्यांनी उबाठाबरोबरच्या कथित समझोत्याच्या सर्व चर्चांनाही पूर्ण विराम देऊन टाकला आहे.