Details
तिरंगी लढतीत कोणाचा जय?
16-Apr-2019
| 0
”
अतुल माने
atulm2001@gmail.com
हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने सुभाष वानखेडे हे तगडे उमेदवार काँग्रेसने रिगणात उतरविले तर सेनेने तेवढ्याच ताकदीचा हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्याने चुरस निर्माण झाली. वंचित बहुजन आघाडीच्या मोहन राठोड यांच्या प्रवेशामुळे येथे आता तिरंगी लढत होणार आहे. राठोड हे कोणाची मते खातात ते महत्त्वाचे आहे.
हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. 2014 च्या मोदी सुनामीतसुद्धा येथून राजीव सातव विजयी झाले होते. संपूर्ण राज्यात त्यावेळी काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्यामध्ये नांदेडमधून अशोक चव्हाण तर हिंगोलीतून राजीव सातव. सातव यांनी त्यावेळी सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. आता वानखेडे हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत. त्यामुळे यावेळी खरी लढत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात होईल.
या मतदारसंघात कोणत्याही पक्षाचे कधीच वर्चस्व राहिले नाही. त्यामुळे कधी काँग्रेस तर कधी शिवसेना, राष्ट्रवादी असे उमेदवार विजयी झाले आहेत. या मतदारसंघात नेहमी तिरंगी लढती झाल्या आहेत आणि प्रत्येकवेळी बहुजन पक्ष तर कधी आरपीआयचे उमेदवार जय-पराजयाचे गणित मांडत असतात. यावेळीसुद्धा हेच होणार आहे. यावेळी शिवसेना आणि कांग्रेस यांच्यात लढत होणार आहे. 2014 मध्ये काँग्रेसचे राजीव सातव विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांचा केवळ 1600 मतांनी पराजय केला होता तर 2009 मध्ये सुभाष वानखेडे विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील यांना हरवले होते. त्यावेळीसुद्धा बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारामुळे निकाल वेगळा लागला
या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1977 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्त्वात आला. त्यावेळी जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते. त्यानंतर 1980 च्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उत्तम राठोड विजयी झाले. त्यानंतर ते सलग 1984 आणि 1989 मध्ये विजयी झाले. पण 1991 च्या लोकसभा निवडणुकीत विलासराव गुंडेवार हे शिवसेनेचे उमेदवार खासदार झाले. त्यानंतरसुद्धा शिवसेनेचे शिवाजी माने 1996 मध्ये निवडून आले तर 1998 मध्ये काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील येथून विजयी झाल्या. पण त्यानंतर एक वर्षात झालेल्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचे शिवाजी माने निवडून आले. हा मतदारसंघ सातत्याने वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून देत असल्याने मतदारांची मानसिकता कोणाच्याच लक्षात येत नाही.
या मतदारसंघात मराठा तसेच दलित जातीचे मोठे प्राबल्य आहे. मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे आणि सरकारने केलेली आरक्षण देण्यासाठी केलेली घोषणा हे शिवसेनेच्या उमेदवाराला फायद्याचे ठरते का पाहणे महत्त्वाचे आहे. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात हदगाव वसमतमध्ये शिवसेना तर कळमनुरीमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे मताची बेगमी करणे हे सर्व उमेदवारांसाठी आव्हान आहे.”

