HomeArchiveजागतिक आव्हानांवरील तोडगा...

जागतिक आव्हानांवरील तोडगा बुद्धांच्याच आदर्शातून!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
आज संपूर्ण जग अतिशय विलक्षण आव्हानांचा सामना करीत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा भगवान बुद्धांच्याच आदर्शातून निघू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
 
केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज, 4 जुलै 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आषाढ पौर्णिमा – धर्म चक्र दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संबोधन केले. आजच्या दिवशीच भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पाच तपस्वी शिष्यांना पहिल्यांदा उपदेश दिला होता. उत्तर प्रदेशातल्या वाराणसीजवळ सारनाथमध्ये रसिपाटणा येथे, सध्या ज्या स्थानी ‘डीअर पार्क’ आहे, त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिल्यांदा उपदेश केला होता. हा दिवस जगभरातले बौद्ध अनुयायी ‘धर्म चक्र परिवर्तन दिन’ म्हणून साजरा करतात. यालाच बौद्ध ‘धर्म चक्राचे परिवर्तन’ असेही म्हणतात.
 
देशभरात सर्वत्र आषाढ पौर्णिमा ‘गुरू पौर्णिमा’ म्हणूनही साजरी केली जाते. यानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा देऊन भगवान बुद्धांना आदरांजली वाहिली. मंगोलिया सरकारला आषाढ पौर्णिमेनिमित्त सादर केलेल्या विशेष संदेशाचे- ‘मंगोलियन कंजूर’च्या प्रतींविषयी पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
 

 
 
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी दाखवलेले आठ मार्ग यांचे स्मरण केले. बुद्धांची शिकवणूक अनेक समाज आणि राष्ट्रांना कल्याणाचा मार्ग दाखवते. बौद्ध धर्म महिला, गरीब, तसेच सर्व लोकांचा आदर करणे, शांतता आणि अहिंसेची शिकवण देतो. ही शिकवण या भूमीवर शाश्वत आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
 
भगवान बुद्धांनी आशा आणि उद्देश यांच्याबद्दलही विचार मांडले आहेत आणि या दोन्हींमध्ये असलेला अतिशय मजबूत धागा आपल्याला दिसून येतो. एकविसाव्या शतकामध्ये आपण कशाप्रकारे आशावादी आहोत आणि ही आशा युवावर्गाकडून प्रफुल्लित व्हावी, असेही आपल्याला वाटते. भारत सर्वात मोठी ‘स्टार्ट-अप’ अर्थव्यवस्था आहे. आपल्या देशातले प्रतिभावान तरूण, तडफदार युवा नागरिक वैश्विक समस्यांवर तोडगा शोधून काढू शकतील, अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
बौद्ध वारसा स्थानांशी अधिकाधिक लोकांनी जोडले जाण्याची गरज आहे, याविषयावरही पंतप्रधान यावेळी बोलले. उत्तर प्रदेशातले कुशीनगर विमानतळ ‘आंतरराष्ट्रीय विमानतळ’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामुळे आता भगवान बुद्धांच्या स्थानांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरू आणि पर्यटकांचा प्रवास सुलभ होऊ शकणार आहे. तसेच या भागात अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे मोदी यांनी सांगितले.
 “

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content