HomeArchive.. कापलेल्या तिकिटांची...

.. कापलेल्या तिकिटांची कहाणी!

Details
 
 
 
अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com   
 
 
भारतीय जनता पक्षाने २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळावा, यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी आधी त्यांनी शिवसेनेला शांत व थंड केले. लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह थेट मातोश्रीवर गेले. त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणाही केली. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सभेत ठाकरे स्वतः मोदी साहेबांच्या सभेत हजर होते. या गाठीभेटींमुळे आधीच्या चार वर्षांतील सेनेबरोबर असलेला दुरावा कमी झाला व कटुताही संपुष्टात आली. नंतरही शिवसेनेला चुचकारण्याचे सर्व प्रयोग भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार पाडले. सेनेला चांगल्या मूडमध्ये ठेवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणजे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सर्वार्थाने सुरक्षित करण्याचा चंग भाजपाने बांधला. भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना मुंबईच्या बोरिवलीमधून उमेदवारी न देणे आणि ठाकरेंची वरळीची उमेदवारी यांचा काही प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात, अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, सुरू होती.
 
खरेतर तावडे काही एकनाथ खडसेंप्रमाणे शिवसनेने ज्यांचा राग धरला असे भाजपा नेते नव्हते. ते सेनेच्या अजिबात विरोधात वागत नव्हते. सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली तावडेंच्या भेटीसाठी येणाऱ्या शिष्टमंडळांना, मोर्चांना प्रेमाने तावडे भेटले. शक्य तिथे प्रश्नही सोडवले. मुंबई विद्यापीठासंदर्भातले असतील वा विद्यार्थ्यांच्या संदर्भात असतील आदित्य यांची बरीच कामे गेल्या चार वर्षांत तावडेंनी राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून मार्गी लावली असावीत. पण याच आदित्य यांच्या राजकारणातील पुढच्या वाटचालीमध्ये भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्याच्या उमेदवारीवर कुऱ्हाड चालवली गेली असे दिसते. विनोद तावडे २०१४ मध्ये बोरिवली मतदारसंघामधून निवडून आले होते. विधानसभेचा बोरिवली मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्लाच आहे. तिथूनच वर्षानुवर्षे राम नाईक निवडून येत होते. नंतर ती जागा गोपाळ शेट्टींनी राखली. पण यावेळी बोरिवलीमधून तावडेंऐवजी सुनील राणे यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.
  
 
कोण आहेत हे सुनील राणे? त्यांना तावडेंच्या जागी कशी काय संधी मिळाली? याचेच आश्चर्य बोरिवलीकर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. सुनील राणे हे भाजपाचे जुनेजाणते नेते व १९९५च्या सेना-भाजपा सरकारमधील कामगार मंत्री दत्ता राणे यांचे चिरंजीव. त्यांचा व बोरिवलीचा तसा संबंध नाही. ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवडी, वरळीमधूनच काम करत होते. सुनील मागील दोन विधानसभा निवडणुका लढले व पडले. २०१४च्या निवडणुकीत शिवसेना, भाजपा एकमेकांच्या विरोधात उतरले होते तेव्हाही भाजपाचे वरळीतील उमेदवार होते सुनील राणे हेच. राणेंचे वरळीमधील काम चांगले आहे. पण विजयाने त्यांना सतत हुलकावणी दिली आहे. २०१४च्या निवडणुकीत वरळी मतदारसंघ शिवसेनेचे जिंकला. सुनील शिंदे तिथले सेनेचे आमदार आहेत. त्यांच्याऐवजी आपल्याला संधी मिळावी असा राणेंचा प्रयत्न असल्यास नवल नव्हते. पण तिथे अचानक आदित्य ठाकरे यांचे नाव आले. २०१४ मध्ये सुनील शिंदे यांनी सचिन अहीर यांचा पराभव केला होता. सुनील यांना ६७ हजार, अहीर यांना ३७ हजार तर राणेंना ३० हजार मते मिळाली होती. याचा अर्थ तिथली भाजपाची व राणेंची ताकदही कमी नव्हती. जर त्यांचे बंड झाले तर ते आदित्य यांना महागातही पडू शकले असते. शिवेसनेने या वेळेस आदित्य यांना विधानसभेत आणायचेच असा चंग बऱ्याच आधीपासून बांधला होता आणि त्यांची सारी रणनीती त्या दिशेने काम करत होती. आदित्य यांनी वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले. तिथले राष्ट्रवादीचे मोठे नेते सचिन अहिर यांनाच सेनेत घेऊन टाकले. आदित्य यांना अधिक सुरक्षित कऱण्यासाठी तिथले भाजपाचे संभाव्य बंड संपवणे गरजेचे होते व ते काम भाजपच्या नेतृत्त्वाने केले. राणे यांना भाजपाचा सर्वात सुरक्षित असा बोरिवली मतदारसंघ बहाल करून भाजपाचे राज्यातील नेते मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी एकाच वेळी उद्धव, आदित्य आणि शिवसेनेलाही आपल्या खिशात टाकले असेही म्हणता येईल.
 
 
बोरिवली हा भाजपाचा किती पक्का गड आहे हे गेल्या तीन निवडणुकांचे तिथले मतांचे आकडे पाहिले तरी सहजच लक्षात येते. तावडेंनी मागील वेळी विजय मिळवताना एक लाख आठ हजार मते घेतली होती. तिथले शिवसेनेचे त्यांचे प्रतिस्पर्धी होते उत्तम अगरवाल. त्यांना पडली होती एकोणतीस हजार मते. मनसेने तिथे 21 हजार मतांची कमाई केली होती. त्याआधीच्या २००९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युती घट्ट होती. त्यावेळी गोपाळ शेट्टी हे ६८ हजार मते घेऊन विधानसभेत पोहोचले होते तर प्रतिस्पर्धी मनसे उमेदवाराने त्यांच्या निम्मी म्हणजे ३८ हजार मते घेतली होती. बोरिवली मतदारसंघावरील भाजपाची ही पकड मागील लोकसभा निवडणुकीतही पुन्हा दिसून आली. शिवसेना युतीसोबत लढलेल्या भाजपाच्या गोपाळ शेट्टींना खासदारकीसाठी बोरिवली मतदारसंघाने तब्बल दीड लाख मते दिलेली आहेत. सुनील राणेंसाठी यापेक्षा अधिक सुरक्षित मतदारसंघ मिळणे कठीण होते. खरेतर राम नाईकांची मुलगी विशाखा कुलकर्णी याही बोरिवलीसाठी उत्सुक होत्या. त्या अनेक वर्षे रामभाऊंसाठी मतदारसंघात कामही करतच होत्या. पण वरळीतील राणेंच्यापुढे कुणाचा निभाव लागलेला नाही. कारण त्यांच्यापाठी आदित्यास्त्र उभे होते!
 
 
वरळीत आदित्य यांना अतिसुरक्षित करण्यासाठीच बोरिवलीमधून तावडेंना बसवण्यात आले हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. विनोद तावडे खरेतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील अ. भा. विद्यार्थी परिषदेचे चांगले व बिनीचे कार्यकर्ते आहेत. त्यांना अर्थातच पक्षाने योग्यवेळीच कल्पना दिलेली असेल. त्यांचे पुनर्वसनही पक्षात व सरकारमध्ये चांगले केले जाईल यातही शंका नाही. ते कसे काय करणार हे मात्र पक्षाने अद्याप सांगितलेले दिसत नाही. त्यामुळे तावडे अस्वस्थ असल्यास नवल नाही. पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही वेळ पक्षाबरोबर वाद घालण्याची नाही हे कार्यकर्त्यांना समजावले आहे. आता एकच लक्ष्य आहे ते दोन तृतियांश बहुमताने पुन्हा भाजपा शिवसेनेचे महायुतीचे सरकार आणणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
अशीच भूमिका खानदेशातील एकनाथ खडसेंनी घेतली आहे. पण खडसे चिडले होते. रागावले होते. उमेदवारांच्या दोन-दोन याद्या जाहीर होतानाही त्यांचे नाव नव्हते. पहिल्या यादीत नाव नाही हे पाहताच आक्रमक नेते खडसे सरळ उठले आणि त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखलही करून टाकला. हे सरळ सरळ बंडाचे पाऊल होते. खडसेंच्या मागे लेवा पाटील समाजाची मोठी ताकद आहे. त्यांनी जळगाव खानदेशात पक्ष उभारणीचे कामही मोठे केले आहे. पण देवेन्द्र फडणवीस सरकारमध्ये मात्र त्यांचे सूत जमले नाही. अत्यंत आक्रमक अशा खडसेंना समजावणे, सांभाळणे मुख्यमंत्र्यांना जड जात होते. अखेरीस आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा घेतला गेला आणि तीन महिन्यातच पुन्हा मंत्रीपदी परत येऊ ही खडसेंची अपेक्षा पुढच्या चार वर्षांत काही पूर्ण झाली नाही. आता तर आमदारकीही काढून घेतली गेली आहे. पण मुलीला उमेदवारी दिल्यामुळे ते थोडे शांत झाले आहेत. अन्यथा शरद पवारांपासून सारे नेते खडसेंना आपलेसे करण्यासाठी तत्पर बसलेलेच होते.
 
 
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांनी सांगितलेच होते की खडसे माझ्या सपंर्कात गेले तीन महिने आहेत. दुसरे राष्ट्रवादीचे मोठे नेते अजित पवार यांनी खडसेंची वाट पाहत मुंबईतच ठाण मांडले होते. बीडमध्ये पक्षाचे दुसऱ्या फळीचे नेते असणारे धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दादा जाणार होते. पण ते गेले नाहीत. ते खडसेंची वाट पाहत होते. पण अखेरीस भाजपाच्या स्थापनेपासूनचे नेते व संघाच्या मुशीत तयार झालेले खडसे पक्ष सोडू शकले नाहीत हे भाजपाच्या पथ्यावरच पडले. चंद्रसेखर बावनकुळे, राज पुरोहित आणि प्रकाश महेता यांचीही नावे भाजपाच्या उमेदवारांच्या अंतिम यादीत दिसत नव्हती. बावनकुळेंची कहाणी थोडी निराळी आहे. भाजपाचे विदर्भातील दोन दिग्गज नेते नितीन गडकरी व देवेन्द्र फडणवीस यांच्यातील सुप्त संघर्षात बावनकुळेंचा बळी जात होता. या दोघांपैकी बावनकुळेंचा सहवास गडकरींना अधिक लाभत होता. ऊर्जा मंत्रालयही त्यांनी नीट चालवले होते. पण तरीही त्यांच्या उमेदवारीचा विषय मात्र शेवटपर्यंत लटकता होता.
 
  
प्रकाश महेता नारज आहेत व बंडाच्या पवित्र्यातही आहेत. त्यांची समजूत भाजपावाले कशी काढणार? त्यांचा घाटकोपर पूर्व हा मतदारसंघही भाजपाचा बालेकिल्लाच आहे. तिथून महेता सलग पाच वेळा आमदार आणि त्याआधी तीन वेळा मुंबई मनपामध्ये नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून केलेली कामगिरी ही मुख्यमंत्री फडणवीस यांना रूचणारी नव्हती. उलट अडचणीतच आणणारी होती. महेतांवर न्यायालयाचेही ताशेरे आले आणि त्यांच्याविरूद्धच्या तक्रारींची दखल लोकायुक्तांनीही घेतली होती. महेता यांनी २०१९च्या निवडणुकीत माझ्याऐवजी मुलाला उमेदवारी द्या अशी मागणी केली होती. मात्र पक्षाने तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट दिले. तेव्हा मेहता खवळलेले आहेत. या सर्व नाराज मोठ्या नेत्यांच्या समजुती मतदानापर्यंत काढण्याची कामगिरी भाजपाच्या नेत्यांना पार पाडावी लागणार आहे. प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील उमेदवारी हीच मुळी वादात होती. तिथल्या लोकप्रिय आमदार मेधा कुलकर्णींना डावलून पाटील यांची उमेदवारी आली हा तिथे अन्याय वाटत होता. पण तावडे व खडसेंप्रमाणेच कुलकर्णी यांनीही पक्ष म्हणेल तीच पूर्वदिशा हे तत्त्व मान्य केल्याने तो प्रश्न मिटला. पण मदानापर्यंत सारे किल्ले बुरूज सांभळण्याची कसरत पाटील, फडणवीसांना करायची आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content