Details
आढळरावांच्या एकाधिकारशाहीला मावळ्यांचा सुरूंग!
06-Jun-2019
| 0
”
विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
राज्यात शिवसेनेच्या दृष्टीने शिरूर लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा होता. सलग तीनवेळा विजयी पताका फडकविणारे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना चौथ्यांदा शिवसेनेने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचा नवखा उमेदवार आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव यांना चारीमुंड्या चित करून त्यांची हवा काढून घेतली. त्यामुळे या विजयालाही महाराष्ट्रात एक वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. आढळराव पाटील यांना शिरूरमधल्या जनतेने सलग तीनवेळा निवडून दिले. मात्र, निवडून दिलेल्या जनतेबद्दल आपण किती प्रामाणिकपणा आणि आत्मियता दाखवली याचा अंतर्मुखाने विचार केल्यास आढळरावांना त्याचे उत्तर निश्चित मिळेल. बर्याुच वेळा नेतेमंडळी धुंदीत असतात. मतदार आणि कार्यकर्ते हे आपले वेठबिगारच आहेत, अशा हेतूने पाहत असतात आणि याचे योग्यवेळी मतपेटीतून उत्तर दिले जाते. म्हणूनच आजही आपल्या लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व आहे.
गेल्या काही वर्षांपासून ’ईव्हीएम’व्दारे मतदान सुरू झाल्यामुळे मतदार व राजकीय पक्षांमध्येदेखील शंकेची कुजबूज वाढू लागली आहे. कारण, शिरूर मतदारसंघात कोल्हे यांच्या प्रचाराचा झंझावत आणि त्यांना मिळालेला मतदारांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर किमान ते अडीच ते तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, अशी प्रत्येकालाच शाश्वती होती. मात्र, प्रत्यक्षात 58 हजार 483 मताधिक्य मिळाले. ठिक आहे. ’जो जिता वही सिंकदर’ या म्हणीप्रमाणे विजय आणि पराजय मान्य करायला हवा. या निवडणुकीत आढळराव पाटलांचा तोल सुटला. कोल्हे माळी समाजाचे असल्याने त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. हा जातीचा उल्लेख त्यांना एवढा महागात पडला की सर्वपक्षीय माळी समाजाचे नेते एकत्र आले आणि त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कोल्हे यांचे काम केले. त्याचबरोबर कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेतून मराठ्यांचा खरा इतिहास समाजासमोर आणल्यामुळे मराठा समाजदेखील त्यांच्यामागे एकदिलाने राहिला. एकंदरीत शिरूरची लढाई ही आढळरावांच्या एकाधिकारशाहीविरूध्द असलेली लढाई म्हणावी लागेल. ही लढाई मावळ्यांनी जिंकून सार्थ ठरवली. मात्र, खर्याण अर्थाने आढळरावांच्या एकाधिकारशाहीला मावळ्यांनी सुरूंग लावला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पहिली लोकसभा निवडणूक 1999 मध्ये झाली. यावेळी खेड मतदारसंघातून अशोक मोहोळ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यावेळी ते निवडून आले. 2004 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेने शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते मोहोळ यांचा पराभव करून निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा पराभव करून आढळराव पाटील निवडून आले. 2014 साली हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदार संघ म्हणून नव्याने अस्तित्त्वात आला. या मतदारसंघात जुन्नर, खेड-आळंदी, आंबेगाव, शिरूर, भोसरी, हडपसर या सहा विधानसभांचा समावेश झाल्याने शहरी-ग्रामीण असा भाग समाविष्ट झाला. 2014 मध्ये राष्ट्रवादीतर्फे देवदत्त निकम यांना मैदानात उतरविण्या आले. आढळराव पाटलांनी त्यांना तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने चितपट केले. शिरूर, हडपसर आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांमुळे राष्ट्रवादीला सलग पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळेस मात्र, खुद्द शरद पवार यांनी आढळरावांच्याच मतदारसंघातील मावळ्याला म्हणजे डॉ. कोल्हे यांना मैदानात उतरवून कुस्तीत आढळरावांना चितपट केले.
हा पराभव आढळरावांना जिव्हारी लागला आहे. या पराभवाची कारणेदेखील जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. चाकणला विमानतळ होणार म्हणून अनेक शेतकर्यांतनी आपल्या जमिनी म्हणून विकल्या नाहीत. काही मोठ्या व्यापारी-उद्योजकांनीदेखील शेकडो एकर जमीनी घेऊन ठेवल्या होत्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार असल्यामुळे आजूबाजूच्या भागात असणार्याो उद्योगनगरीला एक मोठी चालना मिळणार होती. त्याचबरोबर चाकणपासून पुढे आंबेगाव या परिसरातदेखील मोठ्या नागरी वसाहती निर्माण झाल्या असत्या. अनेकांना रोजगार, व्यवसायाच्या संधी मिळाल्या असत्या. मात्र, आढळराव पाटलांनी याचे केवळ भांडवल केले आणि शेवटी येथील विमानतळ पुरंदरला गेले. अनेकांच्या स्वप्नाचा चुराडा झाल्यामुळे स्थानिकांच्या मनामध्ये मोठा रोष आणि चीड होती. ती चीड त्यांनी मतपेटीतून दाखविली. याशिवाय शेतकर्यांनचा जिव्हाळयाचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीवरून त्यांनी केवळ राजकारण करून वेळकाढूपणा केला. त्याचा रागही शेतकर्यांानी मतपेटीतून दाखविला. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा प्रश्न सुटला असता तर शेतकर्यां च्या दळणवळणाचा त्याचबरोबर प्रवाशांच्या नाशिक प्रवासाचा मार्ग सुकर झाला असता. त्याचा निश्चितच आढळरावांनादेखील फायदा झाला असता. मात्र, या कामातदेखील त्यांनी उदासीनत्ता का दाखवली, याचे कोडे मात्र उलगडले नाही. सलग तीनवेळा मिळालेल्या विजयानंतरही शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यात आलेले अपयश, मतदारसंघातील सामाजिक समीकरण भेदण्यात आलेले अपयश, शहरी मतदारांनी अपेक्षित साथ न देणे, स्वतःच्या हक्काच्या आंबेगाव मतदारसंघात मोठी आघाडी मिळाली नाही, हे कशाचे लक्षण आहे याचे आढळरावांनी आत्मपरीक्षण करावे.
डॉ. कोल्हे यांना जुन्नर विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 13 हजार 182, खेड-आळंदीतून 99 हजार 583, आंबेगाव 1 लाख 7 हजार 781, शिरूर 1 लाख 20 हजार 37, भोसरीतून 88 हजार 259 तर हडपसरमधून 1 लाख 5 हजार 712 मते मिळाली. जुन्नरमधून तब्बल 41 हजार 551, खेड-आळंदीतून 7 हजार 446, आंबेगावातून 25 हजार 697 तर शिरूरमधून 26 हजार 305 मतांची आघाडी मिळाली. या चार विधानसभा मतदारसंघांनी कोल्हे यांना साथ देत तब्बल 1 लाख 999 हजार मताधिक्य दिले. शिवाजीराव आढळराव-पाटील यांना जुन्नरमधून 71 हजार 631, खेड-आळंदीतून 92 हजार 137, आंबेगावतून 82 हजार 84, शिरूरमधून 93 हजार 732 मते मिळाली. आढळराव यांना भोसरीतून 37 हजार 77 तर हडपसरमधून 5 हजार 370 मतांचे मताधिक्य मिळाले. मात्र, स्वतःच्या हक्काच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातूनही कोल्हे यांना चांगले मताधिक्य मिळाल्याने आढळराव यांना पराभवाचा सामना करावा लागला. भोसरीतून आढळरावांना चांगले मताधिक्य मिळाले. याचा अर्थ आमदार महेश लांडगे यांनी आढळराव यांना दिलेला शब्द पाळला. भोसरीमध्ये नाराजी असतानादेखील चौथ्यांदा येथील मतदारांनी आढळरावांच्या झोळीत अधिक मतदान केले. हडपसरमध्ये म्हणावे तितके मताधिक्य मिळाले नाही. याचे कारण, या परिसरात माळी समाज मोठा असल्याने सर्वपक्षीय माळी समाज एकवटल्यामुळेच शहरी भाग असूनदेखील आढळरावांना निव्वळ 5 हजारांचे मताधिक्य मिळाले.
1995 मध्ये जुन्नरचे निवृत्तीशेठ शेरकर काँग्रेसच्या तिकीटावर खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. सुमारे 23 वर्षांनंतर कोल्हे यांच्या रूपाने येथील खासदार मिळणार या भावनेने या मतदारसंघातील जनता कोल्हे यांच्या मागे जाणार याची खात्री झाल्याने आढळराव पाटलांनी मनसेचे आमदार शरद सोनवणे यांना आपल्या गळाला लावले. मात्र, या गळाचा काहीच उपयोग झाला नाही. या मतदारसंघातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके या आक्रमक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. अनेकवेळा त्यांनी जिल्हा परिषद गाजवली आहे. येणार्याण विधानसभा निवडणुकीसाठी बुचके इच्छूक आहेत. त्यादृष्टीने त्यांचे काम सुरू होते. त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले होते. मात्र, अचानक आढळराव पाटलांनी मनसेच्या सोनवणे यांना पक्षात आणून आपल्याच हाताने आपल्या पायावर कुर्हानड मारून घेतली. जुन्नरच्या जनतेने तन-मन-धनाने कोल्हे यांचे काम करून त्यांना सर्वाधिक म्हणजे तब्बल 41 हजार 551 मतांची आघाडी मिळवून दिली.
खेड-आळंदी, आंबेगाव, जुन्नर या तीन विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांना आघाडी मिळाली. त्या आघाडीमागे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे मोठे योगदान आहे. यावेळेस त्यांनी पूर्णपणे आपली ताकत लावली होती. त्यामुळे त्यांचे नाव घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार विलास लांडे यांनीदेखील कोल्हे यांना अधिकाधिक मतदान कसे होईल, यासाठी परीश्रम घेतले. अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळमधून निवडणूक लढवत असतानादेखील त्यांचे लक्ष हे शिरूर लोकसभा मतदारसंघावर होतेच. त्यांनी वेळोवेळी बैठका, सभा घेतल्या. सत्ताधारी भाजप-सेनेच्या नगरसेवक-पदाधिकार्यां ना व्यक्तीगत संपर्क साधून कोल्हे यांना सहकार्य करा, अशी विनंती करण्यात आली होती. एकंदरीत या लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक राजकीय नेत्यांची नव्हती तर जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती. शिरूरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील, रायगडमधून अनंत गिते, अमरावतीतून आनंदराव अडसूळ, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे या विद्यमान चार खासदारांना उमेदवारी देऊ नये, असे भारतीय जनत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अवगत केले होते, असे भाजपच्या गोटात बोलले जात आहे. यावरून भाजपच्या नेत्यांना नेमके या मतदारसंघातच पराभव कसा काय जाणवत होता? दुसर्याप बाजूला शरद पवारांनी बारामतीत पराभव झाला तर निवडणूक यंत्रणेवर विश्वास बसणार नाही, असे वक्तव्य केल्याने बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होतात.
राज्यात अनेक मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला वातावरण चांगले असतानादेखील केवळ चार जागा मिळतात. निवडणुकी अगोदर भाजपचे नेते आणि वृत्तवाहिन्या या 42 जागा मिळतील, हे ठामपणे सांगतात. याचा अर्थ काय? जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना त्यांच्या गावात त्यांच्या नात्यातील सुमारे 300 मतदान असताना त्यांना केवळ 3 मते मिळाली. याची दखल राष्ट्रवादीने घेतली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. असे अनेक प्रकार विविध मतदारसंघात घडले आहेत. खुद्द शरद पवार यांनीही पुन्हा एकदा ’कुछ तो गडबड है’ म्हणत निवडणूक यंत्रणेवर शंका घेतली आहे. एकंदरीतच देशात भाजपला मोठा विजय मिळाला असलातरी देशातील मतदारांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात शंका व्यक्त केली जात आहे. आजही सोशल मीडियावर या मतदान यंत्रणेवर आक्षेप घेतल्याची रोज नवनवीन माहिती येत आहे. जनतेने हा विजय मान्य केला असला तरी ईव्हीएमव्दारे मतदान घेऊ नये, यासाठी सर्व राजकीय पक्ष रस्त्यावर उतरण्याची गरज आहेच. याचीच ठिणगी म्हणून पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. पाहूया येणार्याि काळात कोणती राजकीय समीकरणे बदलणार?”

