HomeArchiveअखेर अडवाणी बोलले!

अखेर अडवाणी बोलले!

Details
अखेर अडवाणी बोलले!

    09-Apr-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
गेल्या पाच वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर सध्या काँग्रेस नेत्यांनी कडक व कडवट टीका सुरू केलेली आहे. मोदींच्या जोडीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेही टीकेचे धनी होत आहेत. राहूल गांधींनी जे अनेक आरोप केले त्यातील सर्वात चिकटणारा, जनतेला पटणारा एक आरोप आहे तो, “अडवाणींचा अनादर या दुक्कलीने केला”, हाच. अडवाणींना मोदींनी त्यांच्या व्यासपीठावरून जोडे मारून खाली उतरवले असे गांधी म्हणाले, ते मात्र खरे नाही. इतका प्रकार अजूनही झालेला नाही. पण मोदी कुठेतरी येत असताना अनेक नेते रांगेत उभे आहेत, त्यात अडवाणींचे हात मोदींसाठी जोडलेले आहेत, पण मोदी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत, असे एक छायाचित्र झळकल्याचे अनेकांना स्मरत असेल. मोदींनी अडवाणींना पुरेसा मान-सन्मान दिलेला नाही असे म्हणता येईल.

भारतीय जनता पक्षाच्या अनेक घोषणांपैकी एकेकाळी गाजलेली घोषणा होती की, “भाजपाके तीन धरोहर, अटल, अडवाणी और मुरली मनोहर!” या यादीतील तीन मोठ्या नेत्यांनीच खरेतर भारतीय जनता पक्षाची स्थापना केली होती व पक्ष वाढवण्यासाठी सर्व प्रकारच्या खस्ताही खाल्या होत्या. भाजपाच्या आधी जनसंघाची स्थापनाही या तीन नेत्यांनी संस्थापक सदस्य म्हणून केलेली होती. या तिघांपैकी एकतर काळाच्या पडद्याआडच गेले व अन्य दोघांना त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षामधून विजनवास स्वीकारावा लागलेला आहे. अडवाणी व मुरली मनोहर जोशी दोघांनाही लोकसभा निडणुकीचे तिकीट पक्षाने देऊच केले नाही. अडवाणी यांनी त्याविषयी चकार शब्दही काढला नव्हता.

खरेतर भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते वक्तृत्त्वाने कार्यकर्त्यांना प्रेरित करणारे, उत्साहित करणारे असे आहेत. त्यातील प्रमुख वक्त्यांच्या यादीत अडवाणी हे सहजच समाविष्ट होतात. वय ९१ असले तरी प्रकृती अतिशय खणखणित व बुद्धी तल्लख. त्यांनी गेल्या पाचही लोकसभा गाजवलेल्या होत्या. १९९९ पासून ते देशाचे उपपंतप्रधान होते. त्या नात्याने त्यांनी २००४ पर्यंत लोकसभेत अनेक विषयांवर चर्चांमध्ये, वाद-विवादांमध्ये भाग घेतला. अनेक चर्चांचे नेतृत्त्वही केले. २००४ ते २००९ ते लोकसभेतील विरोधी पक्षनेता होते. त्यामुळे त्या नात्याने त्यांचा कामकाजातील सहभाग मोठाच राहिला. पुढच्या पाच वर्षांत ते विरोधी पक्षनेता नव्हते. पण विरोधी बाकांवरचे प्रमुख नेता होते. २००९ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झालेले आडवाणी हे पक्षाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत. त्या अर्थाने ते पराभूत झाले. तेव्हा संघ व भाजपाने लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद अडवाणींऐवजी सुषमा स्वराज यांच्याकडे सोपवले होते. पण तरी लोकसभेच्या कमकाजात त्यांचा सहभाग लक्षणीय होता.

डॉ. मनमोहन सिंह सरकारने आणलेल्या वादग्रस्त नागरिकत्व विधेयकाच्या मुद्द्यावर आसाममधील जनतेच्या बाजूने ते भांडले होते. त्यांनी त्या मुद्द्यावर सरकारच्या विरोधात स्थगन प्रस्ताव आणला होता. २०१२ मधील त्या चर्चेत त्यांनी जोरदार भाषण केले तेव्हा सत्तारूढ संयुक्त पुरोगामी आघाडीने त्यांच्या भाषणात अनेकदा, तब्ब्ल पन्नास वेळा, अडथळे आणले. पण तरी त्यांनी नेटाने भाषण केले व तब्ब्ल चार हजार शब्दांत आपले म्हणणे सभेपुढे ठेवले. तेच अडवाणी गेल्या पाच वर्षांच्या सोळाव्या लोकसभेच्या कार्यकाळात मात्र पूर्णतः मूक झाले होते. ज्या लोकसभा वेबसाईटवरून अडवाणींच्या पंधराव्या व चौदाव्या लोकसभेतील सहभागाचे तपशील मिळतात, त्याच वेबसाईटवरून सोळाव्या म्हणजे मावळत्या लोकसभेतील अडवाणींच्या अत्यल्प सहभागाच अंदाज येतो. २००९ मध्ये लोकसभेच्या स्थापनेवेळी अध्यक्ष मीरा कुमार यांच्या अभिनंदनाचा जो ठराव झाला त्यातील अडवाणींचे भाषण होते सुमारे चारशे शब्दांचे, तर मावळत्या, सोळाव्या लोकसभेत अडवाणींनी पूर्ण पाच वर्षांत उच्चारलेले शब्द त्या भाषणापेक्षाही कमी होते. पाच वर्षांत फक्त ३६० शब्द! म्हणजे त्यांनी पाच वर्षांत कोणतेही मोठे भाषण केलेच नाही. कोणत्याही विषयावर आपले मत नोंदवले नाही. पक्षाने सत्तेतील कोणतीच जबाबदारी दिली नाही याचा हा मूक निषेधच असावा. त्यांनी जे शब्द उच्चारले तेही होते ते काही समित्यांचे अहवाल सभागृहापुढे मांडताना, अमुक अमुक विषयावरील अहवाल मी मांडतो, इतपतच.. लोकसभा एकट्यानेच गाजवणारे असे अडवाणी गेल्या पाच वर्षांत अचानक गप्प झाले.

तेच लालकृष्ण अडवाणी आता बऱ्याच दिवसांनी बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत ब्लॉग लिहिला आहे. निमित्त साधले आहे ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनाचे. भारतीय नववर्षं साजरे होत असतानाच भाजपाचा स्थापना दिवसही आला हा निव्वळ योगायोग. ६ एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिवस. देशभरात विशेषतः महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने गुढीपाडवा साजरा होत असतानाच भाजपाने आपला स्थापनादिनही साजरा केला. याचदिवशी नवी दिल्लीत १९८० साली भाजपाची स्थापना झाली होती. अटल बिहारी वाजपेयी अध्यक्ष होते तर अडवाणी पक्षातील वाजपेयींच्याच इतके महत्त्वाचे नेते होते. या दोन्ही नेत्यांची मैत्री ही सख्या भावांना लाजवेल अशी होती. वाजपेयी निवर्तल्यानंतरच्या पहिल्याच स्थापनादिनाचे निमित्त साधत अडवाणी यांनी लिहिलेल्या ब्लॉगमुळे पक्षासाठी काही नवे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. पक्षात लोकशाही जिवंत आहे का? विरोधी पक्षातील नेत्यांवर सरसकट राष्ट्रद्रोही, राष्ट्रविरोधी असल्याचा शिक्का मारणे हेही भाजपाच्या पंरपरेत बसणारे आहे का? देशातील लोकशाही व स्वातंत्र्य जपणाऱ्या संस्थांचे स्वातंत्र्य, स्वायत्तता आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी, सत्तारूढ भाजपाने पार पाडली आहे का? असे काही सवाल त्यांच्या या लिखाणातून तयार झाल्याचा कांगावा काही वर्तुळातून लगेचच सुरू झाला. पण अडवाणी यांना नेमके काय म्हणायचे आहे ते समजून न घेताच असा कांगावा करणे हेही लोकशाहीच्या दृष्टीने योग्य ठरणारे नाही.

खरेतर लालकृष्ण अडवाणींचा ब्लॉग आत्ता सतराव्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना यावा हेही लक्षणीय आहे. कारण गेल्या काही वर्षांत त्यांनी ब्लॉग लेखन जवळपास लोकसभेतील बोलण्याप्रमाणेच थांबवले आहे. ते २०१४ पर्यंत नियमित ब्लॉग लिहित असत. दर महिन्यात किमान तीन वेळा तरी त्यांचे हे लिखाण नेटकऱ्यांना वाचायला मिळत असे. २०१४ एप्रिलनंतर त्यांचा ब्लॉग आताच २०१९ मध्ये आलेला आहे. त्यात त्यांनी सुरूवातीलाच अहमदाबादच्या गांधीनगरच्या जनतेचे आभार मानले आहेत. इथल्या जनतेने १९९१ पासून सतत लोकसभेत पाठवले याबद्द्ल त्यांनी आभार मानले आहेत. पण आता आपण उमेदवार का नाही राहिलो असा कोणताच उल्लेख त्यांनी केलेला नाही. तसेच आपल्या बदल्यात भाजपाने तिथे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहंना जी उमेदवारी दिली त्याबद्दलही अडवाणी काहीच बोललेले नाहीत. आपल्या वैचारिक व राजकीय जीवनाची सुरूवात वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सहभाग घेतला तेथेपासून गेल्या सत्तर वर्षांपासून आपले राजकीय जीवन आधी जनसंघ व नंतर भाजपा यांनीच व्यापलेले होते. राष्ट्रसेवा हाच ध्यास सतत राहिला, असे नमूद करून अडवाणी ब्लॉगमध्ये लिहितात की, दीनदयाळ उपाध्याय व अटल बिहारी वाजपेयी तसेच अनेक महान नेत्यांचा सहवास लाभला हे माझे भाग्य आहे.

प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी स्वतः हेच माझ्या आयुष्याचे ब्रीद राहिल्याचे नमूद करून अडवाणी म्हणतात भारतीय लोकशाहीचे सार हेच आहे की इथे विविधतेचा सन्मान आहे व विचारांचे स्वातंत्र्यही आहे. आपल्याशी जे राजकीयदृष्ट्या सहमत नाहीत अशांना भाजपाने कधीच शत्रू मानलले नाही, ते फक्त आमचे प्रतिस्पर्धी आहेत इतकेच. आमच्या भारतीय राष्ट्रवादाच्या संकल्पनेशी सहमत नसणाऱ्यांनाही आम्ही कधी देशाचे शत्रू मानलेले नाही. प्रत्येक नागरिकाच्या व्यक्तीगत तसचे राजकीय निवडीच्या स्वातंत्र्याची बांधिलकी भाजपाने नेहमीच मान्य केलेली आहे. पक्षामधील तसेच राष्ट्रीय स्तरावरच्याही, लोकशाही आणि लोकशाही परंपरा यांचे रक्षण, हेच भाजपचे ब्रीद आहे. देशातील छापील व इल्क्ट्रॉनिक माध्यमांसह सर्व लोकशाही संस्थांचे स्वातंत्र्य, पारदर्शकता, प्रामाणिकपणा यांच्या रक्षणासाठी भाजपा नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. भ्रष्टाचार मुक्ततेसाठी निवडणूक पद्धतींमधील सुधारणा तसेच राजकीय पक्षांच्या निधी उभारणीमधील पारदर्शकता यावरही भजपाने भर दिलेला आहे. थोडक्यात सत्य, राष्ट्र निष्ठा आणि पक्षांतर्गत तसेच देशातलीही लोकशाही ही त्रिसूत्रीच माझ्या पक्षाच्या संघर्षमय उभारणीत मार्गदर्शक ठरली आहे, असेही अडवाणींनी शेवटी नमूद केले आहे. त्यांनी टीकेसाठी कोणाचेही नाव जसे घेतलेले नाही तसेच पक्षाच्या विद्यमान नेतृत्त्वाचाही उल्लेख केलेला नाही. “पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांच्या प्रती तसेच देशाच्या जनतेच्या प्रती असणाऱ्या बांधिलकीचे भान, हीच या लेखनाची प्रेरणा व निमित्त” असल्याचे अडवाणी सुरूवातीलाच म्हणतात तेही विचारात टाकणारे आहे!”
 

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content