Homeमुंबई स्पेशलआता मुंबईत मिळणार...

आता मुंबईत मिळणार विवाह नोंदणीच्याच दिवशी प्रमाणपत्र

हिंदू धर्मानुसार होत असलेला महालयाचा पंधरवडा सध्या सुरू आहे. त्यानंतर नवरात्रौत्सवाला प्रारंभ होणार आहे. आणि लगेचच लग्नाचे बार उडण्यास सुरूवात होईल. लग्नसराईच्या या मोसमात मुंबईकरांना सुखद धक्का देताना मुंबई महापालिकेने आता दर शनिवारी-रविवारीदेखील विवाह नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर आठवड्यातल्या इतर दिवशी म्हणजे सोमवार ते शुक्रवारमध्ये दररोज ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ सुरू करण्यात येणार आहे. त्याबरोबरच या दोन्ही सेवांमध्ये नोंदणीच्याच दिवशी संबंधितांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा वेगवान तसेच सुलभ करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये ही एक महत्त्वाची भर पडली आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा आता शनिवार व रविवार, असे आठवडाअखेरीचे दोन्ही दिवस (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) होईल. एवढेच नव्हे तर, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत रोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून राखीव राहणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणी केली त्याचदिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

विवाह

विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असते. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, मुंबई महापालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते. वर्षभरात होणारे विवाह पाहता ही आकडेवारी नक्कीच कमी आहे. याची कारणे प्रशासनाने शोधली असता लक्षात आले की, मुंबईतल्या नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोयी जाणवतात. या अडचणी कमी व्हाव्यात, विवाह नोंदणीप्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी पालिकेमार्फत या दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क रुपये २,५००/- इतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे. दोन्ही सेवांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तपासणी व शुल्कभरणा ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित दाम्पत्याला प्रदान करण्यात येईल.

मुंबईतील धावपळीचे, धकाधकीचे आयुष्य लक्षात घेता, नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिकांनादेखील कामकाजाच्या दिवसांमध्ये अतिरिक्त सुट्टी घेवून विवाह नोंदणीसाठी पालिकेकडे यावे लागते. कारण, सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कार्यकाळात, विवाह नोंदणीसाठी नवदाम्पत्य व साक्षीदारांना विवाह निबंधकासमोर (विभागीय आरोग्य अधिकारी) यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सबब, नोकरदार असो किंवा व्यावसायिक, पती-पत्नी किंवा त्यांचे साक्षीदार यांना आपल्या कामकाजाच्या दिवशी सुट्टी घ्यावी लागते. यामुळे संबंधितांची गैरसोय होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. ही अडचण दूर करण्यासाठी पालिकेने या नवीन सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये, दर शनिवारी पालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी – ए, सी, ई, एफ दक्षिण, जी दक्षिण, एच पूर्व, के पूर्व, पी दक्षिण, पी उत्तर, आर मध्य, एल, एम पश्चिम, एस या तेरा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल. दर रविवारी बी, डी, एफ उत्तर, जी उत्तर, एच पश्चिम, के पश्चिम, पी पूर्व, आर दक्षिण, आर उत्तर, एन, एम पूर्व, टी या बारा विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी करता येईल, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली. तथापि, या दोन्ही विवाह नोंदणी सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (पब्लिक हॉलिडे) उपलब्ध नसतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मिझोराम, मणिपूर आणि आसामच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 13 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरदरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. या भेटींदरम्यान पंतप्रधान 71,850 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी करणार आहेत. आज ते मिझोराम, मणिपूर तसेच आसामचा दौरा करणार...

दादर-माटुंगा केंद्रातर्फे ऑक्टोबरमध्ये तबलावादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५, यादिवशी सकाळी ९.३० वाजता तबलावादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. स्पर्धा १६ ते २५ वर्षे या मोठ्या वयोगटासाठी ९.३० वाजता तर १० ते १५ वर्षे,...

सी.पी. राधाकृष्णन भारताचे १५वे उपराष्ट्रपती!

महाराष्ट्राचे कालपर्यंतचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दिल्लीत भारताचे १५वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अधिकारपदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी महात्मा गांधींच्या समाधीला...
Skip to content