योग ही भारताकडून जगाला अनमोल देणगी आहे. योगाच्या अमूर्त ठेव्याचे रक्षण करणे व त्याचा प्रचार-प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य उत्तम राखण्याबरोबरच विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी योग आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईत केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजभवनात येथील दरबार हॉल येथे राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. योगसत्राचे आयोजन ‘कैवल्यधाम’ व श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर योग या संस्थांतर्फे संयुक्तपणे करण्यात आले. भारतीय तटरक्षक दल, सूचना प्रसारण कार्यालय व राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी राज्यपालांसह योगासने केली.
भारत जगातील सर्वाधिक युवा राष्ट्र आहे. योग देशातील युवाशक्तीच्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक सशक्तीकरणात मदत करू शकते. आपण स्वतः नियमित योगासने करतो व प्रत्येक दिवस आपल्यासाठी योग दिवस असतो, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेचे विश्वस्त आत्मप्रीत रक्षित, रतन लुणावत व अल्पा गांधी तसेच कैवल्यधाम योग संस्थेचे रवी दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. रवी दीक्षित व देवकी देसाई यांनी योगसत्राचे संचलन केले.
रोज करा योग, नियमित राहा निरोगी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यातूनच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करा आणि निरोगी राहा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई पोर्ट आणि इतर केंद्रीय संस्था, योग संस्थातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगा कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पवन बायेकर, जी. बी. मोरे यांच्यासह होमगार्ड, एनसीसी कॅडेट, अधिकारी, कर्मचारी, योग संस्थांचे योग गुरू उपस्थित होते.
आज सर्व जगभर योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व ओळखून संपूर्ण जगाला योगाची ओळख करून दिली. योगगुरू रामदेव बाबा यांनी योग जगभर पोहोचविण्याचे काम केले. योगावर आपली प्राचीन संस्कृती आधारित असून त्यांनी योगाला घराघरात पोहोचविले. उत्तम आरोग्याचा नवा मंत्र योग आणि आयुर्वेद जडीबुटी आहे. पंतप्रधान मोदी कधीच योग विसरत नाहीत. म्हणूनच ते तंदुरूस्त आहेत. भारताला पुढे नेण्यात ते अग्रेसर असून महाराष्ट्र त्यांच्या विकासकामाला नेहमी साथ देत राहणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
आजच्या जीवनपद्धतीत योगसाधना उपयुक्त
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम होत आहे, हा आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये योगासनाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून दिले. सध्या जगातील १५०हून अधिक देशात योगसाधना केली जात आहे. प्राचीन उपचारपद्धती जी आरोग्यदायी जीवनपद्धतीला सहाय्य करते, ही पद्धती जगाने स्वीकारली. आजच्या जीवनपद्धतीला योगसाधना उपयुक्त असून सर्वांनी नियमित योगसाधना करायला हवी.