मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा केली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी, येत्या २५ नोव्हेंबरला चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मनोहर यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. मनोहर यांनी मराठी साहित्यात सातत्याने कसदार लेखन केले आहे. समाजातील नाकारलेल्या माणसांच्या जगण्यातला उद्वेग, आशय-अभिव्यक्ती मांडणारे संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या १९७७ साली प्रकाशित झालेल्या ‘उत्थान गुंफा’ या पहिल्याच कवितासंग्रहाची वाङ्मय जगतामध्ये विशेष दखल घेतली गेली. त्यांच्या साहित्यातून मानवतावादी दृष्टीकोन आणि संविधानातील मूल्यजागर स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो.
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी, येत्या २५ नोव्हेंबरला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात १९९० सालापासून झाली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके, ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर, प्रा. एन. डी. पाटील, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आदी मान्यवर साहित्यिक आणि संस्थांना या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.