Homeबॅक पेजविम्बल्डन टेनिस स्पर्धेत...

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत यानिक व इगाने रचला इतिहास!

यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेवर आपल्या जेतेपदाच्या विजयाची मोहोर उमटवत इटलीच्या २३ वर्षीय यानिक सिनर‌ आणि पोलंडच्या २४ वर्षीय इगा स्वियातेकने इतिहास रचला. ही स्पर्धा जिंकणारे हे दोघे त्या-त्या देशाचे पहिले टेनिसपटू ठरले आहेत. या दोघांच्या विजयामुळे यंदा या स्पर्धेत दोन्ही, पुरुष तसेच महिला गटाला नवे विजेते मिळाले. महिला गटात सलग आठव्या वर्षी स्पर्धेला नवा विजेता लाभला. आपल्या कारकिर्दीतील चौथे ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद मिळवताना जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सिनरने विश्व क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझचा चुरशीच्या लढतीत चार सेटमध्ये पराभव केला. याअगोदर यानिकने दोन वेळा ऑस्ट्रेलियन आणि एकदा अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. पहिला सेट गमावूनदेखील पुढचे तीन सेट जिंकून सिनरने कार्लोसवर बाजी उलटवली. या विजयाबरोबर यानिकने‌ आपल्या फ्रेंच स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. फ्रेंच स्पर्धेत पहिले दोन सेट जिंकूनदेखील सिनरला पराभव पत्करायला लागला होता. या विजयाबरोबर यानिकने सलग पाच पराभवांची अल्कराझविरुद्धची मालिका अखेर मोडीत काढली. तसेच अल्कराझचे सलग तिसरी विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले, सलग २४ विजयांची कार्लोसची मालिका खंडीत केली.

आतापर्यंत उभय खेळाडूंत झालेल्या एकूण १२ सामन्यांत कार्लोसने आठ तर यानिकने चार सामने जिंकले आहेत. विम्बल्डन स्पर्धेत निर्णायक सामन्यात कार्लोसने पहिला सेट जिंकून जोरदार सुरूवात केली. पण पुढील सेटमध्ये तोच जोम, जोश कार्लोस कायम ठेवू शकला नाही. त्याचा फायदा घेत पुढील सेटमध्ये यानिकने वेगवान खेळ करुन सामन्यावर नियंत्रण मिळवले. तुफानी सर्विस करुन त्याने कार्लोसला जेरीस आणले. खासकरुन बेसलाईनवरुन यानिकने सुरेख खेळ केला तर, कार्लोसची पहिली सर्विस फार चालली नाही. ती यानिक सहज परतवत होता. तिथेच कार्लोसची सामन्यावरील पकड सुटली. गेल्या सात ग्रॅन्डस्लॅम स्पर्धांत याच दोघांमध्ये अंतिम फेरीचे सामने होत आहेत. फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धेत अव्वल दोन क्रमांकाच्या खेळाडूंत निर्णायक सामना होण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. याअगोदर फेडरर, नादाल यांच्यात २००६ आणि २००८मध्ये याच दोन स्पर्धांत जेतेपदासाठी सामने झाले होते. उपांत्य फेरीत अल्कराझने अमेरिकन टेलर फिट्झचा चार सेटमध्ये पराभव केला. यानिकने नोवाक जोकोविचला सरळ तीन सेटमध्ये नमवले. त्यामुळे विक्रमी २५व्या ग्रॅन्डस्लॅम विजेतेपदाचे जोकोविचचे स्वप्न धुळीस मिळाले. वाढत्या वयाचा परिणाम जोकोविचच्या खेळावर आता दिसू लागलाय हे मात्र नक्की.

जोकोने या स्पर्धेत सर्वात जास्त सामने जिंकण्याचा नवा विक्रम केला. तसेच विक्रमी १४व्यांदा उपांत्य फेरी गाठून फेडररचा तेरा वेळा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा अगोदरचा विक्रम मोडला. याअगोदर उपांत्य फेरी गाठताना यानिकने अमेरिकन बेन होस्टनचा, कार्लोसने ब्रिटनच्या नारीचा, जोकोविचने इटालीच्या कोबालीचा आणि टेलरने रशियाच्या करेन खाचानोवरचा पराभव केला. गतवर्षी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या सातवे मांनाकन देण्यात आलेला मुसेती आणि नववे मांनाकन देण्यात आलेला दानिल हे दोघे पहिल्या फेरीत गारद झाले. मुसेतीला निकोलोझने तर दानिलला बेंजामिनने नमवले. निकोलोझने पात्रता फेऱ्या खेळून मुख्य स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळवला होता. बेंजामिनने थरारक लढतीत दानिलविरुध्द पाच सेटमध्ये बाजी मारली. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत बेंजामिनला गवती कोर्टवर एकही विजय मिळवता आला नव्हता. तिसरे मानांकनप्राप्त झ्वेरेव्हला दुसऱ्या फेरीत हार पत्करावी लागली. त्याला रिंदनेशने पाच सेटमध्ये पराभूत केले. माजी अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा विजेता ३६ वर्षीय मरिन सिलीचने २०२१नंतर या स्पर्धेत जोरदार कमबॅक केले. त्याच्या दोन्ही गुडघ्यावर ऑपरेशन झाल्यामुळे गेली तीन वर्षं तो कोर्टपासून‌ दूर होता. या स्पर्धेतपण त्याने पात्रता फेरीचे सामने ‌खेळून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवले. त्याने दुसऱ्या फेरीत इंग्लंडच्या तिसरे मांनाकन देण्यात आलेला जॅक ड्रेॅपरला नमवून स्पर्धेत खळबळ माजवली. पण चिलीचचे आव्हान तिसऱ्या फेरीत संपले. अनुभवी ३८ वर्षीय फॅबियो फाॅग्निनीने सलामीच्या सामन्यात‌ कार्लोसला जेरीस आणले. पाच सेटमध्ये अखेर कार्लोसने बाजी मारली. थोडी नशिबाची साथ फाॅबियाला मिळाली असती तर स्पर्धेतील सर्वात मोठ्या धक्कादायक विजयाची नोंद त्याच्या नावावर झाली असती. पण ते होणे नव्हते.

महिला विभागात जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या २४ वर्षीय पोलंडच्या इगा‌ स्वियातेकने या स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठून जेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला. ही स्पर्धा जिंकून तिने पोलंडसाठी नवा इतिहास रचला. ही स्पर्धा जिंकणारी ती पोलंडची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. याअगोदर चार फ्रेंच स्पर्धा आणि एक अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या इगाची विम्बल्डन स्पर्धेत मजल‌ उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे कधी गेली नव्हती. त्यामुळे प्रथमच अंतिम फेरी गाठून‌ जेतेपदाला गवसणी घालून तिने कमालच केली असेच म्हणावे लागेल. तिचा ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील रेकाॅर्ड शंभर टक्के सरस आहे. सहाही ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील तिची जेतेपदे अशीच आहे. प्रथमच अंतिम फेरी गाठून तिने त्या सामन्यात कधी हार खाली नाही. त्यामुळेच स्वियातेकच्या सहाही ग्रॅन्डस्लॅम विजेतेपदाला एक वेगळी किनार आहे. अंतिम फेरी गाठून सहा ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकणारी इगा टेनिस विश्वातील केवळ तिसरी खेळाडू ठरली आहे. निर्णायक सामन्यात तिने लंडनमध्ये अमेरिकेच्या जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या अमांडा अनिसिमोव्हाचा सरळ दोन सेटमध्ये अवघ्या ५७ मिनिटांत सहज पराभव केला. टेनिसप्रेमींना हा सामना बघून प्रश्न पडला की हा अंतिम फेरीचा सामना होता का पहिल्या फेरीचा. इगाच्या तुफानी खेळाला अमांडाकडे उत्तरच नव्हते. तिचा झझांवात अमांडा रोखू शकली नाही.

सुरूवातीपासूनच इगाने जबरदस्त खेळ करुन सामन्यावरील आपली पकड अधिकच घट्ट केली. तिने अमांडाला विजयाची बिलकुल संधीच दिली नाही. तिने अमांडाला एकही गेम जिंकून दिला नाही. आपल्या वेगवान सर्विसला फोरहॅन्ड, बकहॅन्ड फटक्यांची चांगली जोड देत ‌इगाने अमांडावर सहज बाजी उलटवली. १९११नंतर अंतिम सामन्यात असा योग या स्पर्धेत परत आला. संपूर्ण स्पर्धेत इगाने अवघा एक सेट गमावला. त्यामुळे यंदा जेतेपदाची तिच खरी दावेदार होती असे म्हटले तर वावगे ठरू नये. ब्रिटनचा बुजूर्ग खेळाडू एन्डी मरेनंतर आपला कारकिर्दीतील शंभरावा सामना ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारी इगा टेनिस विश्वातील केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे. महिला विभागात सलग आठव्यांदा नवा विजेता या स्पर्धेत मिळाला आहे. २०१६नंतर या स्पर्धेत आतापर्यंत कुठल्याही खेळाडूला आपले जेतेपद राखता आलेले नाही. २०१५-१६मध्ये अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यमसने सलग दोन वर्षं ही स्पर्धा जिंकली. पण त्यानंतर गेल्या आठ वर्षांत तिच्या कामगिरीची पुनरावृत्ती कुठल्याच महिला खेळाडूला करता आलेली नाही.

लाल मातीच्या कोर्टवरील फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा संपली की थोड्याच दिवसांत लगेचच विम्बल्डन स्पर्धा सुरू होते. त्यामुळे विम्बल्डन स्पर्धेची तयारी करण्यास खेळाडूला पुरेसा अवधी मिळत नाही. विम्बल्डन स्पर्धा गवती कोर्टवर रंगते. दोन्ही कोर्ट एकदम भिन्न आहेत. त्यामुळे बदलाशी जुळवून घेणे आणि त्याप्रमाणे आपल्या खेळात बदल करणे बऱ्याच महिला खेळाडूंना जड जाते. त्यामुळेच अलिकडे महिला विभागात विम्बल्डन स्पर्धेत नवनवे विजेते उदयास येत आहेत. त्याअगोदर उपांत्य फेरीच्या सामन्यात इगाने बेलिंडा बेंचिचचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. अमांडाने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सबलेंकाचा रंगतदार लढतीत तीन सेटमध्ये पराभव करून स्पर्धेत खळबळ माजवली. अडीच तास हा सामना चालला. त्यात शेवटच्या निर्णायक सेटमध्ये संबलेकानै बऱ्याच चुका केल्या. त्याचा फायदा घेत अमांडाने शानदार विजय मिळवला. सबलेंकाने सलग तिसऱ्या वर्षी उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत प्रवेश करताना इगाने लिउडमिलाचा, अमांडाने अनास्तासियाचा, सबालेंकाने सिएगेमंडचा आणि बेलिंडाने आंद्रेवाचा पराभव केला होता. इगाने आपली लढत सरळ दोन सेटमध्ये जिंकली. पण अमांडा, सबालेंका आणि बेलिंडाला विजय मिळवण्यासाठी चांगला संघर्ष‌ करावा लागला. या तिघींनी आपले उपांत्यपूर्व फेरीचे हे सामने तीन सेटमध्ये जिंकले.

या स्पर्धेअगोदरची फ्रेंच स्पर्धा जिंकणाऱ्या कोको गाॅफ, माजी विजेती पेत्रा क्वितोव्हाला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. माजी ऑस्ट्रेलियन, अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा विजेती जपानची नाओमी ओसाका तिसऱ्या फेरीत पराभूत झाली. सहावे मानांकन दिलेल्या मेडिसीन किजला जर्मनीच्या सिगमंडने तिसऱ्याच फेरीत नमवून गतवर्षीचा पराभवाचा बदला घेतला. सिगमंड जागतिक क्रमवारीत १०४व्या स्थानावर आहे. इगाने ही स्पर्धा जिंकून आपला लढाऊबाणा आणि कणखरपणा दाखवून दिला. तिने प्रशिक्षक बदले. तिच्या आजोबांचे निधन झाले होते. डोपिंग प्रकरणात इगा अडकली होती. त्यामुळे एक महिना तिच्यावर बंदीदेखील घातली होती. विजेतेपदाचा दुष्काळ संपत नव्हता. हा सारा काळ इगासाठी आव्हानात्मक होता. पण या सर्वावर ती अखेर मात करण्यात यशस्वी ठरली. यंदा स्पर्धेदरम्यान कडक उन्हाचा फटका खेळाडू, टेनिसप्रेमींना बसला. त्यामुळे खेळाडूना तर चक्क आईसपॅक देण्यात आले. त्यामुळे स्पर्धेत कधी नव्हे ते तीन ग्रॅन्डस्लॅम उपविजेते आणि मांनाकनप्राप्त एकूण तेवीस खेळाडूंना पहिल्या फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. त्यामध्ये १० पुरुष आणि १३ महिला खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेतील‌ चेंडू आणि स्लो कोर्ट याबाबत‌देखील खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. यंदा प्रथमच आयोजकांनी लाईन जजची सेवा रद्द करुन नवी इलेक्ट्रॉनिक लाईन काॅलिंगची व्यवस्था आणली. पण प्रेक्षकांना ती फारशी आवडली नाही. विजेत्या सिनर आणि इगाला प्रत्येकी ३५ करोड‌ रुपयांची घसघशीत रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. आता हे ‌दोघे पुढील महिन्यात होणाऱ्या यंदाच्या वर्षातील शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेतदेखील जेतेपदाचा चषक उंचावतात का ते बघयाचे…

1 COMMENT

  1. छान विश्लेषण…… सिनर व इगा या नवोदित विजेत्यांचे अभिनंदन, पुढील कारकिर्दीसाठी उत्तम यश प्राप्त होवो अशी प्रार्थना. आपण देशी खेळाचेही छान विश्लेषण करता त्यामुळे तेही विश्लेषण प्रसंगानुरूप विश्लेषण करावे ही विनंती.

Comments are closed.

Continue reading

बुद्धिबळाच्या पटावर युवा दिव्याचा दिव्य पराक्रम!

बातुमी, जाॅर्जिया येथे झालेल्या महिलांच्या वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या, मूळच्या नागपूरच्या असलेल्या अवघ्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने जेतेपदला गवसणी घालून आपल्या दिव्य पराक्रमाची प्रचिती महिला बुद्धिबळ जगताला दाखवून दिली. हे विजेतेपद मिळवताना दिव्याने अनेक नवनव्या विक्रमाला गवसणी घातली....

पुन्हा आपटला वेस्टइंडीज क्रिकेट संघ!

एका जमान्यात क्रिकेटविश्वावर एखाद्या‌ सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या, बलाढ्य वेस्टइंडीज क्रिकेट संघाची सध्या चांगलीच दाणादाण उडाली आहे. या संघाची कामगिरी दिवसेंदिवस‌ अधिकच खालावत चालली आहे. त्यामुळे‌ या संघाचे चाहते चिंताग्रस्त आहेत. एका जमान्यात वेस्टइंडीज क्रिकेट संघाचा सुवर्णकाळ होता. याच संघाने...

भारतीय हॉकी संघाचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’!

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाने सलग दोन कांस्यपदकं जिंकून भारतीय हॉकीसाठी पुन्हा अच्छे दिन आणले. त्यामुळे सहाजिकच भारतीय हाॅकीला एक नवी झळाळी मिळाली. भारतीय हाॅकीप्रेमींच्या भारतीय हाॅकी संघाकडून पुन्हा मोठ्या अपेक्षा बाळगल्या जाऊ लागल्या. पण नुकत्याच झालेल्या मानाच्या एफ.आय.ई.एच....
Skip to content