मुंबईतल्या गिरगावच्या ठाकुरद्वार परिसरातील वैद्यवाडी येथील प्राचीन विठ्ठल-रखुमाई मंदिराचा तिढा आता थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. हे मंदिर वाचवावं आणि या मंदिरात पूर्वीप्रमाणेच पूजाअर्चा करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी स्थानिकांनी शिवसेना प्रवक्त्या व महिला सेनेच्या मुंबई समन्वयक अॅड. सुशीबेन शाह यांची भेट घेतली. त्यांनी या विषयात लक्ष घातले असून लोकसभा निवडणुकीनंतर मार्ग काढण्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले.
ठाकुरद्वार येथील वैद्यवाडीतील हे मंदिर १८५१ साली उभारण्यात आलेलं १७३ वर्षं जुनं आहे. गिरगावच्या, मुंबईच्या आणि देशाच्या इतिहासातही त्याला मोलाचं स्थान आहे. रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्त्या करणारे क्रांतिकारक चाफेकर बंधू यांच्या अनेक गुप्त बैठका याच मंदिरात झाल्या होत्या. त्याशिवाय येथील स्थानिकांसाठी हे मंदिर म्हणजे श्रद्धेचा प्रश्न आहे.

२०१०च्या सुमारास वैद्यवाडीतील बैठ्या चाळी पाडून तिथे इमारती उभारण्याचं काम कोठारी बिल्डरने हाती घेतलं. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी बांधकामाला सुरुवात केली. एकूण ८७ कुटुंबांची वस्ती असलेली ही जागा कोठारी बिल्डरने २१ मजल्याची टोलेजंग इमारत बांधून विकसित केली. पण जेव्हा मंदिर हटवण्याचा प्रश्न आला, तेव्हा काही स्थानिकांनी याला विरोध सुरू केला. त्यानंतर बिल्डरकडून मंदिराच्या प्रवेशद्वाराला टाळं लावण्यात आलं. कोरोना महामारीच्या आधी दरदिवशी सकाळी आणि संध्याकाळी दोन तास मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात होता. तसंच देवांची पूजाही होत होती. एकादशीला शेकडो भाविक विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी येथे येत होते. मात्र कोरोना काळात पुन्हा एकदा हे मंदिर बंद करण्यात आलं ते आजतागायत उघडण्यात आलं नाही. त्यामुळे भाविकांना बंद दाराआडूनच देवाला नमस्कार करावा लागतो.

येथील स्थानिकांनी सुशीबेन शाह यांची भेट घेत हे प्रकरण त्यांच्यासमोर मांडलं. सुशीबेन शाह यांनीही या स्थानिकांसह परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग यांची भेट घेत या प्रश्नावर चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत मंदिर तोडलं जाऊ नये. मंदिराची डागडुजी होऊन तेथे पुन्हा भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा, हा आमचा प्रयत्न आहे. विकासकाने मंदिराला टाळं ठोकत पूजाअर्चा करण्याचा भाविकांचा हक्क हिरावून घेतला आहे. पोलिसांनी यात हस्तक्षेप करून पूजाअर्चा सुरू करून द्यावी, अशी मागणी त्यांनी उपायुक्त गर्ग यांच्याकडे केली.
आचारसंहितेनंतर मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार
सध्या आचारसंहिता असल्याने मंदिर प्रवेशासारख्या संवेदनशील विषयांवर आंदोलन उभारणं योग्य नाही. मात्र आचारसंहिता हटल्यावर याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हे प्रकरण मी घालणार आहे. आमचं सरकार हिंदू देवदेवतांचा यथोचित आदर करणारं सरकार आहे. आम्हाला सश्रद्ध भाविकांच्या भावना समजतात. कोणत्याही परिस्थितीत भाविकांचा पूजाअर्चेचा हक्क डावलला जाणार नाही, ही शिवसेनेची गॅरेंटी आहे, असं सुशीबेन शाह म्हणाल्या.