माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीतल्या महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह धरतात का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या याच षण्मुखानंद सभागृहात नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद्चंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते. पहिलेच भाषण करताना ठाकरे यांनी पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा नामोल्लेख करत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली. पवार आणि चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, मी इथल्या इथे पाठिंबा जाहीर करतो, असे ते म्हणाले. पण, ठाकरे यांच्या मागणीला कोणीही प्रतिसाद दिला नाही.
आजच्या या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आजच्या या मेळाव्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी येणार होते. पण, ऐनवेळी त्यांनी आपला मुंबई दौरा रद्द केला.