मुंबईतल्या गिरगाव/दक्षिण मुंबईतील हिंदू मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे, गिरगावचा सांस्कृतिक वारसा जतन केला जावा यासाठी मुंबई हिंदू मंदिर, जतन, संरक्षण, संवर्धन अभियान, गिरगाव सांस्कृतिक वारसा जतन अभियान, मुंबई विकास परिषद, मुंबई भाडेकरू संघर्ष समितीचे निमंत्रक व संयोजक राघवेंद्र कौलगी यांनी काल मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी त्यांच्या दालनात चर्चा केली.
या बैठकीला दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त, व्हि. पी. रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्डचे

सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या उपसचिव, पर्यटन विभागाचे उपसचिव, महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक, महालक्ष्मी देवस्थानच्या व्यवस्थापक व आमदार डॉ. मनीषा कायंदे उपस्थित होते.
या बैठकीत गिरगाव, दक्षिण मुंबईतील प्राचीन देवळांचे संरक्षण होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या विषयांतर्गत श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, वैद्यवाडी, ठाकूरद्वार, या मंदिराचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा तसेच या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष असलेल्या व गायब झालेल्या शिलालेखाचा पोलीस तपास करण्यात यावा अशी मागणी कौलगी यांनी या बैठकीत केली. ती मान्य करण्यात आली. सर्व कायदेशीर बाजू तपासून व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गिरगाव/दक्षिण मुंबईतील सर्व मंदिरांचे जतन, संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सर्व विभागांनी सकारात्मक प्रयत्न करावेत, असे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.