यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होत असताना एक महत्त्वाचा विषय चर्चेला आला आहे. माणसाची क्षमता वाढवण्यासाठी ‘स्मार्ट घड्याळे’ आली आणि त्यात रोज नवीन काहीतरी उपलब्ध होत आहे. हा ‘तंत्रज्ञान डोपिंग’ म्हणजेच ‘टेक्निकल डोपिंग’चा मान्य प्रकार म्हणावा. पण खेळांच्या स्पर्धांमध्ये असे होऊ लागले तर..
शरीराची तग धरून राहण्याची शक्ती वाढविण्यासाठी आपण उत्तम आहारावर आणि व्यायामावर भर देतो. परंतु घोड्यांच्या शर्यतीमध्ये त्यांना ‘डोप’ म्हणजे उत्तेजक पदार्थ देऊन त्यांची शी तग धरून राहण्याची शक्ती वाढवली जाते असे ऐकले आहे. आजच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेत खेळाडूचा सहभाग हा त्याची अथवा तिची ‘डोपिंग’ चाचणी केल्याशिवाय नोंदवला जात नाही. तसेच याविषयी स्पर्धा आयोजकांनी अतिशय कठोर तरतुदी केल्या आहेत.
इतके असले तरी आज आपण खेळ स्पर्धकांच्या आणि त्यातल्यात्यात धावपटू यांच्या बाबतीतील ‘डोपिंग’च्या एका नव्या प्रकाराविषयी माहिती घेणार आहोत. ‘डोपिंग’च्या इतर प्रकारात काही पदार्थांचा वापर केला जात असला तरी या नव्या प्रकारात मात्र साधारणपणे शरीरात कोणताही पदार्थ सोडला जात नाही हे विशेष. या प्रकाराला आपण “तंत्रज्ञान डोपिंग” असे म्हणू शकतो. आंतरदेशीय अथवा जागतिक पातळीवरच्या कोणत्याही स्पर्धेत खेळाडूला अशा चाचणीला सामोरे जावे लागते. काही वेळा मिळालेले यश बाजूला राहून सन्मान परत करण्याची नामुष्कीही येऊ शकते असेही दिसले आहे.
खेळाडूंना अगोदर आवश्यक पात्रतेसाठीची स्पर्धा पार करावी लागते. त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होतात तेव्हा स्पर्धकाला नव्या वातावरणात, तापमानात आणि इतर परिस्थितीत आपली क्षमता दाखवून अगोदर पात्रतेत आणि नंतर प्रत्यक्ष स्पर्धेत यश कमवायचे असते. धावपटू स्पर्धकांचेच उदाहरण घ्यायचे तर त्यांच्यासाठी प्रत्येक मिलिसेकंद आणि प्रत्येक सेंटीमीटर महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्वत: स्पर्धक तर आपल्या परीने तयारी करीत असतोच पण प्रशिक्षकदेखील स्पर्धकाची विविध बाबतीत क्षमता कशी वाढवता येईल यासंबंधी विचार करीत असतात. आणि येथेच “तंत्रज्ञान डोपिंग”चा विषय सुरू झाला आहे. या प्रकारात सर्वसाधारणपणे तंत्रज्ञानामुळे खेळाडूची नैसर्गिक कामगिरी प्रभावित करून खेळाडूला इतर स्पर्धकांच्या तुलनेत अयोग्य फायदा कसा करून देता येईल याचा विचार असतो.
उदाहरण द्यायचे झाले तर २००८मधील एका महत्त्वाच्या स्पर्धेत १३ प्रकारचे जागतिक विक्रम तोडले गेले. साहजिकच वाद निर्माण झाले आणि त्यात असे दिसले की विजयी स्पर्धकांनी एका विशिष्ट प्रकारचे पोहण्याचे पोशाख घातले होते. त्यावर व्यावसायिक स्पर्धांमध्ये लगेच प्रतिबंध घातले गेले. परंतु एखादा पोशाख किंवा एखाद्या प्रकारचे ‘शूज’ किंवा इतर काही तंत्रज्ञान आधारित साहित्य हे खरोखरच नैसर्गिक आहेत की नाहीत हे ठरवणे सोपे नाही. परंतु असे काही असेल तर ते स्पर्धकाची क्षमता किंवा कामगिरी वाढवू शकतात का? हाही प्रश्न आहे. आज जगातील किमान ५० कोटी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान डोपिंग उपयोगात आणतो आहे असे म्हणायला हवे. याचे सर्वात सोपे उदाहरण म्हणजे स्मार्ट मनगटी घड्याळ दाखवता येईल. कारण हे घड्याळ आपल्याला आपल्या शरीराबद्दलची महत्त्वाची माहिती देऊ शकते.
आता आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा विचार केला तर खेळाडूला तयार करण्याची म्हणजेच त्याचे सर्व दृष्टींनी क्षमता वाढविण्याची तयारी फार अगोदरपासून करावी लागते आणि त्यासाठी शरीराचे, सरावाचे आणि कामगिरीचे सगळे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. आपण किती जलद धावू शकतो याची नेमकी माहिती कळण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब पायाचा जमिनीला स्पर्श होण्याचा आणि तो हवेत असण्याचा कालावधी ही असते. त्यासाठी तंत्रज्ञान आहे तसेच ते पाऊल किती लांब पडते आणि त्याला वेळ किती लागतो यासाठीही आहे. एका धावपटूने विशिष्ट शूज वापरले आणि धावल्यानंतर असे दिसले की धावण्याची गती वाढली आहे. याचा अर्थ जमीन स्पर्शाचा वेळ कमी झालाय आणि त्यामुळे गती वाढली आहे. पण हा ‘शूज’चा परिणाम असू शकेल का? हेही सांगणे कठीण आहे. कदाचित मनात सकारात्मकता तयार झाल्यामुळे गती वाढली असेल आणि त्याचे श्रेय ‘शूज’ना मिळाले असेल.
मग हे तंत्रज्ञान डोपिंग ओळखायचे कसे?
यासाठी ‘शूज’ बनवण्यासाठी उपयोगात आणलेल्या पदार्थांची तपासणी करावी लागेल. त्यात एखादी विशिष्ट प्रकारची ‘स्प्रिंग’ असेल तर धावपटू प्रत्येक पावलासाठी कमी वेळ घेईल. म्हणजेच गती वाढलेली दिसेल. परंतु अगदी वैज्ञानिक तपासणी केली गेली तरी तिचे निष्कर्ष कायम असू शकणार नाहीत. मग केवळ या ‘शूज’मुळे धावपटूची गती वाढली म्हाणून हे ‘शूज’ प्रतिबंधित करता येणार नाहीत. याचेही एक उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी एका धावपटूने एका विशिष्ट प्रकारचे ‘शूज’ वापरून दूर अंतर धावण्याच्या एका स्पर्धेत विक्रमी नोंद केली. परंतु त्यावर निर्णय घेण्यापूर्वी केलेल्या तपासणीत या ‘शूज’मुळे गती वाढली असली तरी ते सिद्ध करता आले नाही. कारण, ही गती व्यक्तीअनुसार बदलत होती. परिणामी धावण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांसाठी ‘शूज’संबंधी नवीन नियम केले गेले.
अशा या “तंत्रज्ञान डोपिंग”च्या खेळांमधील संशयास्पद कामगिरीसाठी भविष्यात काही ठोस पावले उचलावी लागणार आहेत. खेळाडू आणि त्याचे प्रायोजक यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे म्हणून असे डोपिंग केले गेले जाऊ शकेल. परंतु त्यात खेळाचे खरे स्वरूपच हरवून बसेल. तंत्रज्ञानाने खेळात किंवा खेळाडूंना मदत करू नये असे मुळीच नाही. परंतु त्यातून वैयक्तिक खेळाडू नव्हे तर संपूर्ण खेळाचा फायदा व्हायला हवा. त्यासाठी सखोल चाचणी आणि सक्षम तपासणी यंत्रणेसोबतच विविध देशांच्या खेळ व्यवस्थापनाला विशेष काळजी घ्यावी लागेल.
संपर्क: ९९२०८५९२०८