तंबाखू मंडळातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे तसेच शेतकऱ्यांनी यावर्षी उत्पादित केलेल्या अतिरिक्त तंबाखूवरील दंड माफ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिले.
शनिवारी गोयल यांनी हैदराबादमधील शमशाबाद येथील नोवोटेल येथे तंबाखू उत्पादक शेतकरी, उत्पादन निर्यातदारांसोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी संबोधित करताना गोयल यांनी, फ्ल्यू क्युअर्ड व्हर्जिनिया तंबाखूसाठी शेतकऱ्यांना विक्रमी उच्च किंमत मिळाल्याबद्दल तसेच आर्थिक वर्ष 2023-24मध्ये भारतीय तंबाखूच्या विक्रमी निर्यातीबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी उपस्थित तंबाखू उत्पादकांनी तंबाखू उत्पादनात भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला. मजुरांचा तुटवडा, शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी मदतीचा अभाव, सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी) खताची जास्त किंमत, अतिरिक्त तंबाखू उत्पादनासाठी दंड, तंबाखूच्या कोठारांसाठी वाढीव इंधन खर्च यासारख्या समस्यांची समस्यांची त्यांनी माहिती दिली आणि सरकारकडून आवश्यक तांत्रिक तसेच आर्थिक सहाय्याची मागणी केली.
तंबाखू निर्यातदारांना निर्यात प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही योजनेत समाविष्ट केले जात नाही. तंबाखू व्यापाऱ्यांनी तंबाखू निर्यातदारांना निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि करमाफी योजनेत समाविष्ट करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान करत असलेल्या भारतातील तंबाखूचे अनधिकृत उत्पादनावर नियंत्रणा आणावे, अशी मागणीही त्यांनी केली.
पियुष गोयल यांनी तंबाखू उत्पादक शेतकरी आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेतली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून तंबाखू उत्पादक शेतकरी आणि उद्योग यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.
तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी 7 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसह बिनव्याजी कर्जाची व्यवस्था करण्याचा सल्लाही त्यांनी तंबाखू मंडळाला दिला. तंबाखू मंडळाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात वाढीव आर्थिक मदत द्यावी, असेही त्यांनी सुचवले.