अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आज सादर होणाऱ्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे समस्त देशवासियांचे डोळे लागले आहेत. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने यंदाच्या पूर्ण अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांना निश्चितच काही दिलासा देतील, अशी अनेकांची अटकळ आहे. त्यातही, मीही मध्यमवर्गीयच असल्याने मला त्यांच्या समस्यांची जाणीव आहे.
सीतारामन यांच्या अलीकडील वक्तव्याने मध्यमवर्गीयांच्या आशा पल्लवित होणे साहजिक आहे. आपणास कोणत्या करसवलती मिळणार किंवा नव्या गुंतवणूक संधी किती मिळणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष असले तरी संपूर्ण अर्थसंकल्पात त्याला फार थोडे स्थान असते. अर्थमंत्र्यांपुढे वित्तीय तूट कमी करून विकासवाढीला चालना देण्यासाठी सरकारी भांडवली खर्च वाढविण्याचे मोठे आव्हान उभे आहे. जागतिक मंदीचे वारे वाहत असताना आपल्या देशाला त्याची झळ लागणार नाही, अशा पद्धतीने विकासवाढीला कशी चालना द्यायची याचा अर्थमंत्र्यांना विचार करावा लागणार आहे.
त्यातच मोदी सरकारचा वरदहस्त लाभलेल्या अडाणी उद्योग समूहाला भेडसावणाऱ्या विश्वासार्हतेच्या गंभीर समस्येची प्रचंड झळ केंद्र सरकारकलाही लागणे अटळ आहे. अडाणीप्रकरणी विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला नसता तरच नवल. अशा या पार्श्वभूमीवर सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प समजून घेण्याची सर्वसामान्य नागरिकांना उत्सुकता असते हे लक्षात घेऊन रमा प्रकाशनाने यंदा, गुरूवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी ‘मतितार्थ केंद्रीय अर्थसंकल्पाचा’ हा अर्थसंकल्प विश्लेषणाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्येष्ठ संपादक प्रकाश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गेली काही वर्षे अर्थसंकल्प-विश्लेषणाचा कार्यक्रम आयोजिण्यात येत आहे. अच्युत गोडबोले, डॉ. अभिजीत फडणीस, वाय. एम. देवस्थळी, तृप्ती राणे, संग्राम गायकवाड, पूर्वेश शेलटकर, श्रीकांत कुवळेकर आदी नामवंत अर्थतज्ज्ञांच्या सहभागामुळे रमा प्रकाशनाच्या अर्थसंकल्प-विश्लेषण कार्यक्रमाला एक वेगळीच प्रतिष्ठा लाभली आहे.
येत्या गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात श्रोत्यांना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर आणि व्यासंगी शेअर बाजार विश्लेषक अजय वाळिंबे यांच्याकडून अर्थसंकल्पाचा मतितार्थ जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. मुंबईतल्या विलेपार्ले (पूर्व) येथील साठ्ये कॉलेज सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क खुला असून इच्छुकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पं. जवाहरलाल नेहरू यांनी 1947 साली अर्थसंकल्प मांडताना 72 मिनिटांचे भाषण केले होते. सर्वाधिक, म्हणजे 18,650 शब्दांचा अर्थसंकल्प मांडण्याचा तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचा 1991 सालचा विक्रम नंतरच्या कोणत्याच अर्थमंत्र्याला मोडता आलेला नाही. त्या वर्षापासून देशाने आर्थिक उदारीकरण स्वीकारले. 2018 साली अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प 18,604 शब्दांचा होता. जनता पक्षाच्या राजवटीत, 1977 साली अर्थमंत्री एच. एम. पटेल यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अवघ्या 700 शब्दांचा होता.
दोन वर्षांपूर्वी अच्युत गोडबोले यांनी अर्थसंकल्पाचे केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. रमा प्रकाशनच्या अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020 साली अर्थसंकल्प मांडताना तब्बल 2 तास 42 मिनिटांचे भाषण केले होते. अर्थसंकल्पाची शेवटची दोन पाने वाचावयाची राहिली असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी पुढचा तो प्रयत्न सोडून दिला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ती दोन पाने वाचून अर्थसंकल्प मांडणीची औपचारिकता पूर्ण केली. अर्थसंकल्प मांडतानाचे सर्वाधिक वेळ भाषण करण्याचा आजवरचा हा विक्रम मानला जातो. यंदा त्या आपलाच विक्रम मोडतील किंवा कसे हे उद्बोधक ठरेल.