शिवसेनेचे नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने ते लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे १२ खासदार सहभागी झाल्यानंतरही गजानन कीर्तिकर त्यात सहभागी झाले नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः कीर्तिकर यांची गोरेगावातल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तेव्हापासून कीर्तिकर शिंदे यांच्याजवळ जात असल्याची चर्चा सुरू होती. काल श्री गणेशाच्या दर्शनाच्या निमित्ताने कीर्तिकर यांनी वर्षा बंगला गाठला. तेथे त्यांनी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे यांच्याशी काही मिनिटांची चर्चाही केली. त्यामुळे तेही आता लवकरच शिंदे यांच्या गटात अधिकृतपणे सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गजानन कीर्तिकर शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कीर्तिकर शिंदेंबरोबर गेल्यास शिवसेनेची महत्त्वाची संघटना असलेली स्थानीय लोकाधिकार समितीदेखील शिंदे गटाबरोबर जाऊ शकते. त्याचा मोठा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. त्याशिवाय, गजानन कीर्तिकर हे जुन्या पिढीतील शिवसैनिक आहेत. तेदेखील शिंदे यांच्यासोबत गेल्यास जुन्या शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वातावरण निर्माण होऊ शकते.
कीर्तिकर पक्षाच्या नेतेपदीही असल्याने शिवसेना कार्यकारणीत फूट पडली असल्याचे समोर येईल. त्याचा फायदा शिंदे गटाला निवडणूक आयोगासमोरील आपलाच पक्ष खरा असल्याचे सिद्ध करण्यास होऊ शकतो, असे जाणकार सांगतात.