यंदा अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकर बंद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम साधारणतः मार्चअखेरीस बंद व्हायला सुरुवात होते. काही कारखाने मात्र ऊसाच्या उपलब्धतेनुसार उशिरापर्यंत सुरू राहतात. यंदा मात्र फेब्रुवारी मध्यातच 20-25 कारखान्यांना गाळप हंगाम बंद करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर्षी ऊस लागवड उशिरा सुरू झाल्याने साखर उत्पादनावर परिणाम होण्याच्या शक्यतेला “श्री रेणुका शुगर्स”चे चेअरमन अतुल चतुर्वेदी यांनीही दुजोरा दिला आहे.
2023-2024 गाळप हंगामामध्ये 319 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. 2024-2025 म्हणजे यंदाच्या हंगामात मात्र साखरेचे उत्पादन 270 ते 280 लाख टन राहण्याचा इस्मा
![साखर](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2023/08/6.-Farm-Worker.jpg)
अन् नॅशनल शुगर फेडरेशनचा अंदाज आहे. दुसरीकडे, गेल्या काही काळात ऊसाच्या उपलब्धतेबरोबरच गुणवत्ताही खालावत चालली आहे. त्यामुळे सरासरी साखर उतारा 9.37%वरून 8.81%पर्यंत खालावला आहे.
यंदा गेल्या 8 वर्षांत प्रथमच देशांतर्गत मागणीपेक्षा साखर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच साखर कारखानदारांच्या दबावामुळे मोदी सरकारने दहा लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे बफर स्टॉक गृहीत धरला तरीही दिवाळीनंतरच्या काही महिन्यांत खुल्या बाजारात साखरेचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. “श्री रेणुका”चे चतुर्वेदी यांनी मात्र साखरेची टंचाई तसेच दरवाढीची शक्यता फेटाळून लावली आहे. भारतात अगोदरच साखरेचे दर खालावलेले होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर निर्यातीचा केंद्राने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.