Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्राला पाऊस पुन्हा...

महाराष्ट्राला पाऊस पुन्हा झोडपणार?

बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असतानाच आता गुजरातजवळ अरबी समुद्रातही आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची तीव्रताही वाढत असल्याने वादळाची शक्यता दिसत आहे. येत्या 24 तासांत त्यामुळे हवामानात मोठे बदल दिसून येऊ शकतात. हा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. बंगालची खाडी आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे पट्टे तीव्र होत आहेत. त्यामुळे आजपासून, 4 ते 7 ऑक्टोबरदरम्यान हवामान अस्थिर राहणार असून महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ दिसेल. राज्यातून मान्सून माघारी फिरण्याची 5 ऑक्टोबर ही सामान्य तारीख आहे. मात्र, गुजरातमधील वादळामुळे राज्यावरील पावसाचे संकट आणखी काही काळ कायम राहू शकते.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तीव्र

उत्तर पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा 4 ऑक्टोबर रोजी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान पश्चिमी विक्षोभाचा परिणाम अधिक जाणवेल. त्यामुळे हवामानात मोठे बदल होऊन 6 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातही या बदलाचा परिणाम होत असून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. पाऊस सुरूच राहणार असल्याने यंदा राज्यात ऑक्टोबर हिट कमी प्रमाणात जाणवणार असून रात्री मात्र दमट वातावरणामुळे उकाडा वाढणार आहे. यंदा “ला निना”मुळे कडाक्याची थंडी पडेल, असा प्राथमिक अंदाज “आयएमडी”कडून व्यक्त करण्यात आला आहे.

10-12 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम

राज्यातून परतीचा पाऊस सुरू झाल्याचे हवामान विभागाने अजूनही स्पष्ट केलेले नाही. गेल्या आठवडाभरापासून मान्सूनचा परतीचा प्रवास अडकलेला आहे. आता विदर्भ आणि मराठवाड्यात 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस राहील, असा अंदाज आहे. गुजरातमधील हवामान प्रणालीच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

75 किमी वेगाने वारे; सावधानतेचा इशारा

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात हवामान अस्थिर आहे. किनारी भागात ताशी 65 ते 75 किमी वेगाने वारे वाहत आहेत. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. बंगालच्या खाडीतील चक्रीवादळ किनारपट्टीवरील ओदीशा आणि आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ओदिशा, छत्तीसगड, झारखंड, बिहारसह मध्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुजरात आणि महाराष्ट्रावरही या वादळाचा परिणाम होणार असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे.

“पाऊसफुल्ल” सप्टेंबर ठरला विक्रमी

विक्रमी पाऊसफुल्ल सप्टेंबरनंतर ऑक्टोबर महिन्यातही देशात अधिक पावसाचा अंदाज आहे. 1 जून ते 30 सप्टेंबरमध्ये या चार महिन्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यातील हा गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे. राज्यात यंदा 120 टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून जून ते सप्टेंबरमध्ये राज्यात 1189.4 मिमी पावसाची नोंद झाल्याचा हवामान विभागाने सांगितलंय. गेल्यावर्षी राज्यात 1252.1 मिमी पावसाची नोंद झाली असून 26 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्यांदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक 39 टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर उत्तर-मध्य, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात 20 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

अरबी समुद्रावर ‘शक्ति’ चक्रीवादळाचे सावट

ईशान्य अरबी समुद्रावर तीव्र झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळ ‘शक्ति’मध्ये रूपांतर झाले आहे. सध्या ते गुजरातमधील द्वारकेच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 250 किमी अंतरावर आहे. येत्या 24 तासांत ते पश्चिम-नैऋत्येकडे सरकून तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. त्यानंतर, ते पश्चिम-नैऋत्येकडे सरकत राहण्याची आणि 5 ऑक्टोबरपर्यंत उत्तर आणि लगतच्या मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. ओदिशाच्या अंतर्गत भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा 3 ऑक्टोबर रोजी वायव्य-वायव्येकडे सरकला. आता तो ओदिशातील संबलपूरपासून 50 किमी नैऋत्येस असलेल्या अंतर्गत ओदिशा आणि लगतच्या छत्तीसगडवर केंद्रित झाला आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content