महाराष्ट्रातल्या सर्व मुलींना पदव्यत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून कधीही याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत नुकतेच शासनाचे धोरण जाहीर केले आहे. त्यात याचा समावेश आहे.
या प्रस्तावित निर्णयाची माहिती मिळताच राज्यसभेच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने विधान भवनात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणामध्ये मोलाची भर पडणार आहे, असे त्या म्हणाल्या.
आज विधानभवनात यानिमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. या ऐतिहासिक निर्णयासाठी त्यांचे तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभारही त्यांनी मानले. यावेळी राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंत्री शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रताप चिखलीकर,आमदार भरत गोगावले, प्रसाद लाड, विप्लव बजोरिया, माजी आमदार अमर राजुरकर, राम रातोळीकर, संजय शिरसाट, बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह आदी हजर होते.