Homeन्यूज अँड व्ह्यूजऑस्ट्रेलियातले ब्रिस्बेन आणि...

ऑस्ट्रेलियातले ब्रिस्बेन आणि पर्थ मुंबईशी थेट विमानसेवेने जोडले जाणार?

ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व  संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी काल दिली. पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी ब्रिस्बेन व पर्थ ही शहरेदेखील मुंबईशी थेट विमानसेवेने जोडण्यावर सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पॉल मर्फी यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईतल्या राजभवनमध्ये सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत असल्याची माहिती त्यांनी दिली.

भारतीय विद्यापीठांसोबत पदवी अभ्यासक्रमात सहकार्य, विद्यार्थी आदानप्रदान, परस्पर देशांमधील पदव्यांना मान्यता, ‘कमवा, शिका आणि पर्यटन करा’ आदी योजनांबद्दल विचार विनिमय सुरू असल्याचेही मर्फी यांनी राज्यपालांना सांगितले.

क्रिकेट उभय देशांना जोडणारा दुवा: राज्यपाल

क्रिकेट हा भारत व ऑस्ट्रेलियाला जोडणारा सशक्त दुवा असून मर्फी यांच्या न्यू साऊथ वेल्स राज्याने क्रिकेट विश्वाला डॉन ब्रॅडमन, अॅलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीव्ह वॉ यासारखे महान खेळाडू दिले आहेत, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. भारतातील तीन लाखांच्यावर पर्यटकांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला भेट दिली. आपल्या कार्यकाळात उभय देशांमधील पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येत असून ऑस्ट्रेलियाने भारतीय विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा राज्यपाल बैस यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीला ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील उपवाणिज्य दूत क्रिश्चन जॅक व आर्थिक राजनीतिक अधिकारी गरिमा शेवकानी उपस्थित होते.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content