ठाणे शहराच्या (प) कोर्टनाका परिसर व टेम्भी नाका परिसराच्या आसपास धोबी आळी नावाची अगदी चिंचोळी गल्ली असल्याचे नवीन ठाणेकरांना माहीतच नसते. अगदी जुन्या म्हणजे ज्यांची वये पन्नासच्या वर आहेत त्यांना मात्र धोबी आळी आणि तेथील वेगळ्या प्रकारचा दंगा नक्की माहीतच असणार! जुन्या जमान्यातल्या ‘भाई’ लोकांना मात्र ही आळी नक्कीच ओळखीची वाटणार यात शंका नाही. भाईगिरी सोडून व्हाईट कॉलरवाले बनून काहींनी खाऊ गल्लीत टपऱ्या तर काहींना नशिबाने साथ दिली म्हणून बिल्डिंग लाईनमध्ये हात मारला आहे. (बिल्डिंग लाईनमध्ये आता हात मारणारे पूर्वीच्या भाईंकडे हरकाम्या होते हे सांगायला नकोच.) मात्र या बिल्डिंग लाईनला पैसा कोण पुरवतात हे मात्र उघड गुपित आहे.
तर अशा या चिंचोळ्या गल्लीत अगदी चिंचोळे उद्यान आहे आणि हे उद्यान ठाणे महापालिकेचे आहे. या उद्यानात जाण्यासाठी आळीच्या आकारमानाच्या दृष्टीने विचार केल्यास रस्ताही अगदीच बारकूडा आहे. उद्यानाची अवस्था अत्यन्त खराब आहे. खराब कसली दुर्दशाच आहे. अनेक ठिकाणी कचरा आहे. उद्यानात माती तर गेल्या अनेक वर्षांत टाकलेली नाही, असे एका नजरेतच समजते. मात्र, मातीचे भरमसाठ बिल दीड वर्षांनी नियमित अदा केले जाते असे समजले. संताप आणणारी गोष्ट पुढेच आहे. या उद्यानात कुणीही जाऊ नये वा ते प्रवेशद्वार कुणाला दिसू नये म्हणून एका महाभागाने टोपडं घालून एक मोटारगाडीच येथे उभी करून ठेवलेली आहे. थोडीथोडकी नाही तर तब्बल दीड-दोन वर्षे ही गाडी येथेच पार्क करून ठेवलेली आहे.. या गाडीबाबत विचारणा केली असता कुणीही बोलायला तयार नव्हते. ही बेवारस गाडी असल्यास ती सरकार दरबारी जप्त करून टाकावी व ज्या खात्याकडे गाडयांची कमी असेल त्यांना ही गाडी वापरू द्यावी, असे सुचवावेसे वाटते.