Saturday, December 28, 2024
Homeएनसर्कलभारतावर काय होणार...

भारतावर काय होणार परिणाम सीरियातल्या सत्तापरिवर्तनाचा?

मध्य पूर्वेतील सीरियात क्रांती होऊन असद परिवाराची पाच दशकांहून अधिक काळ सुरु असलेली  राजवट मोडीत निघाली. राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर “हयात तहरीर अल शाम”चा अध्यक्ष आणि बंडखोरांचा नेता अबू मोहम्मद अल जोलानी याच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

29 नोव्हेंबरला “अलेप्पो”, 05 डिसेंबरला “हमा” आणि 07 डिसेंबरला “होम्स” या शहरांवर कब्जा करुन 8 डिसेंबरला राजधानी दमास्कसचा बंडखोरांनी ताबा घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन केले आणि सत्तापरिवर्तनाची नांदी झाली. आता पंतप्रधान मोहम्मद गाझी जलाली यांनी परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, असे आश्वासन देऊन सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. “सीरियन नॅशनल आर्मी” आणि “अहरार अल शाम” या बंडखोरांच्या संस्थादेखील “हयात तहरीर अल शाम” (एच.टी.एस)ला साथ देत आहेत. सीरियात मार्च 2011पासून गृहयुद्ध सुरु होते. या युद्धात राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या हुकूमशाहीमुळे 3.5 लाखाहून अधिक लोक मारले गेले आणि जवळजवळ 1.30 कोटी लोक विस्थापित झाले असा आरोप आहे.

बशर अल असद यांचे पिता हफिज अल असद यांनी 1963मध्ये बाथ पक्षाची स्थापना करुन सीरियाचा ताबा घेतला आणि नंतर 1971 ते 2000पर्यंत सीरियावर हुकूमत गाजवली. त्यांच्यानंतर आतापर्यंत बशर अल असद सर्वेसर्वा होते. या काळात नागरिकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन बशर अल असद यांनी आपली जुलमी राजवट सुरु ठेवली असे म्हटले जाते. 2006नंतरच्या काही वर्षांत पडलेल्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचे आणि इतरांचे फार हाल झाले. बेरोजगारी, मानवी हक्कांचे उल्लंघन, भ्रष्टाचार, नागरिकांचा छळ यात सीरिया देश होरपळून निघाला. 2007मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बशर अल असद फिरुन एकवार भरघोस मतांनी निवडून आले. पण त्यांनी दडपशाही सुरुच ठेवली. पत्रकारांना अटक करण्यात आली. 2007मध्ये फेसबुकवर बंदी घालण्यात आली आणि जवळजवळ 200 वेबसाईट्स बंद करण्यात आल्या. शिवाय लोकांवर इंटरनेट नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली गुन्हे नोंदविण्यात आले आणि नागरिकांच्या प्रवासावरदेखील बंदी घालण्यात आली, असे बशर अल असद यांच्याविरुध्द आरोप आहेत.

अबू मोहम्मद अल जोलानी

अबू मोहम्मद अल जोलानी आधी “अल कायदा”चा कमांडर होता. त्याने 2016मध्ये “अल कायदा”पासून फारकत घेऊन मध्य पूर्वेत भूमध्य महासागराजवळ असलेल्या शाम (जोर्डन, सीरिया, लेबेनॉन, इस्रायल, पॅलेस्टाईन यांचा उपप्रदेश)) या भागाला स्वतंत्र करण्यासाठी “जबात अल नुसरा” या संघटनेची स्थापना केली. नंतर 2011मध्ये या संघटनेचे “हयात तहरीर अल शाम” (एच.टी.एस) असे नामकरण करण्यात आले. एक दशकाहून अधिक काळ सुरु असलेल्या गृहयुद्धात “हयात तहरीर अल शाम”ने वाय़व्य सीरियाच्या काही भागाचा ताबा 2017मध्येच मिळविला होता.

पाठिंबा

रशिया व इराणचा सीरियाला पाठिंबा असला तरी युक्रेनबरोबर सुरु असलेल्या युद्धामुळे रशिया आणि इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देत असलेला इराण सध्यातरी या सत्तापरिवर्तन घडामोडीपासून दूर आहे. मात्र टर्की बंडखोराना खुले उत्तेजन देत आहे. मधल्या काळात “इस्लामिक स्टेट”, “हिजबुल्लाह”सारख्या इतर इस्लामिक कट्टरवादी संघटना बऱ्याच प्रमाणात निष्प्रभ झाल्या होत्या. त्या आता बदलत्या राजकीय परिस्थितीत डोके वर काढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे निर्बंध

2004मध्ये अमेरिकेने सीरियावर लादलेले आर्थिक निर्बंध आजही सुरुच असून आवश्यक खाद्यपदार्थ वगळता इतर वस्तूंच्या निर्यातीवर बंदी कायम आहे. याचबरोबर “इस्लामिक स्टेट”सारख्या कट्टरवादी संघटनेच्या सीरियामध्ये लपलेल्या अतिरेक्यांचे शिरकाण अमेरिकेने सुरु ठेवले आहे.

भारत-सिरिया राजनैतिक संबंध

भारत आणि सिरियाचे बऱ्याच वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. काश्मीर मुद्दयावर सीरिया नेहमीच भारताच्या बाजूने असतो. याशिवाय भारताचे सीरियाबरोबर मोठ्या प्रमाणात वाणिज्यिक व्यवहार आहेत. दरवर्षी सीरियाकडून भारत 20 ते 30 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढ्या किंमतीचे तेल आयात करतो. याचबरोबर सीरियाच्या तेल उत्खनन “ब्लॉक 24”मध्ये भारतीय “ओएनजीसी विदेश”ची 60 टक्के गुंतवणूक आहे. शिवाय औष्णिक उर्जानिर्मितीसह सीरियाच्या पायाभूत सेवा देणाऱ्या बऱ्याच प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांचा सहभाग आहे. यात “तिशरीन औष्णिक उर्जानिर्मिती प्रकल्पा”चा समावेश आहे. 43 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढ्या गुंतवणुकीने उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात भारताची 52 टक्के गुंतवणूक आहे. याशिवाय 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढ्या गुंतवणुकीचा “हमा आयर्न एण्ड स्टील प्लान्ट” भारतीय कंपनी “अपोलो इंटरनॅशनल लिमिटेड” आणि सीरियन कंपनी “गेकोस्टिल” यांच्या संयुक्त विद्यमाने 2017मध्ये उभारण्यात आला. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी 2003मध्ये आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 2010मध्ये सीरियाला भेट दिली होती तर सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद  2008मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. या परिस्थितीत सीरियात लवकरात लवकर शांती प्रस्थापित होणे भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचै आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

वैद्यकीय उपकरणांच्या देशांतर्गत निर्मितीसाठी नवी योजना

वैद्यकीय उपकरणांसाठी भारत इतर देशांवर अवलंबून असतानाच परकीय आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशाला वैद्यकीय उपकरण निर्मितीच्या केंद्रात रूपांतरित करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 500 कोटी रुपयांची योजना नुकतीच जाहीर केली आहे. यामुळे स्थानिक उत्पादनाला चालना मिळून जागतिक मेडटेक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढू शकते. सध्या...

चर्चला दिलेल्या संरक्षण खात्याच्या जमिनीवर टांच!

भारतीय संरक्षण खात्याने दक्षिण मुंबईतील “चर्च ऑफ नॉर्थ इंडिया”ला लीजवर दिलेली जमीन, नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली परत करण्यासाठी नोटीस बजावली असून कोर्टानेदेखील याबाबत संरक्षण दलाच्या बाजूने निर्णय दिला आहे. बॉम्बे जिमखानासमोरील हजारी सोमानीमल मार्गावर असलेला (4266 यार्ड /3566.92 चौरस मीटर्स...
Skip to content