Thursday, November 21, 2024
Homeमाय व्हॉईसजिव्हाळ्याची बेटं?

जिव्हाळ्याची बेटं?

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई गेल्यानंतर लिहिलेला माझा लेख खूप व्हायरल झाला. प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक ग्रुपमध्ये त्यावर चर्चा झाल्या. कोणी त्याचं अभिवाचन केलं व स्वतःच्या म्हणण्यासकट त्यांच्या त्यांच्या ग्रुप वर टाकलं…. एकूण यानिमित्ताने जे विचारमंथन झालं किंवा सुरू झालं त्याचा मला अर्थातच खूप आनंद झाला. मला हेच अपेक्षित होतं.

माझा लेख छान वाटला…. मन भरून आलं…. डोळे भरून आले…. अशाही प्रतिक्रिया आल्या. तशा प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

मात्र, त्यातल्या दोन प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणून मी येथे चर्चेला घेत आहे.

मी जिव्हाळ्याची बेटं असा विषय मांडला होता. आपला मित्र किंवा मैत्रीण पाकळी पाकळीने मिटत जात असताना त्याला फुलण्यासाठी मदत करूया, असं मी म्हटलं होतं. त्याचा अर्थ काहींनी सोयीस्करपणे त्यांची दुःखं मांडण्यासाठी केला.

आमची दुःखं जर आम्ही मैत्रिणींना सांगायला गेलो तर ‘बास झाली तुझी रडगाणी..’ असं म्हणून त्या टाळतात अशी एक प्रतिक्रिया आली.

हे स्वाभाविकच नाही का? 

‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ असे  रामदास स्वामींनी म्हटले आहे. तो अनुभव आपल्यापैकी प्रत्येक जण घेत आहे. कोणी ही रडगाणी गातं…. कुणी गात नाही. पण प्रत्येकाला दुःख आहेच. विवंचनाही आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी मित्र-मैत्रिणी लागतात. ही जिव्हाळ्याची बेटं असावी लागतात…. पण पुन्हा तिथेही ही रडगाणी गायली तर तिथले इतर जण जे सोसत आहेत त्यातच भर पडणार नाही का? स्वतःची दुःखं बाजूला ठेवून दुसऱ्याची दुःखं विकत घ्यायला कोण जाईल? त्यांना कंटाळाच येईल ना….

बेटं

त्यांनी फुलायला मदत करायची याचा अर्थ आपल्या दुःखांना गोंजारायला मदत करायची, असा नाही. काहींना स्वतःची दुःखं गोंजारायची आणि त्यानिमित्ताने स्वतःचं कौतुक करून घ्यायची सवय असते. ते दुसरे का करतील? कारण तेही कमीअधिक प्रमाणात दुःखं सोसत असतातच…. ते तुम्हाला मदतीचा हात देऊ शकतात…. सल्ला देऊ शकतात…. आधाराचा विश्वास देऊ शकतात…. वेगळ्या शब्दात सांगायचं तर घोड्याला पाण्यापर्यंत नेलं जाऊ शकतं, पण घोड्याला पाणी स्वतःलाच प्यावं लागतं…. हे जसं लक्षात घेतलं पाहिजे, तसंच आपल्या दुःखाच्या कोशातून बाहेर येण्याची धडपड आपल्याला स्वतःलाच करावी लागते, हेही मनावर कोरून ठेवलं पाहिजे. कोणाचीही दुःखं गोंजारून त्याला कमकुवत करावं, असा या जिव्हाळ्याच्या बेटांचा अर्थ नाही.

माझी आई म्हणायची प्रत्येक गोष्ट दिल्याने वाढते!

ज्ञान दिल्याने वाढते…. सुख दिल्याने वाढते…. आनंद दिल्याने वाढतो…. पैसे दिल्याने वाढतात…. तसंच दुःखही दिल्याने वाढतं…. त्रासही दिल्याने वाढतो….

म्हणूनच दुःख ठेवावं मनात आणि आनंद वाटावा जगात असं म्हटलं जातं. आपण तो आनंद वाटू तेव्हाच आपण दुसऱ्याचं दुःख हलकं करू…. आपल्यासाठी दुसऱ्याने जिव्हाळ्याचं बेट उभं करावं अशी अपेक्षा ठेवतानाच आपणही दुसऱ्यासाठी जिव्हाळ्याचं बेट उभं करणं अपेक्षित आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी म्हटलं तसं स्वतःच्या मनाची ताकद वाढवली, स्वतःच्या अंतर्मनाची ताकद समजून घेतली तर हे सहज शक्य आहे. जीवन म्हटलं की आघात आणि तब्येत म्हटलं की बिघाड येणारच आहे. प्रत्येकालाच येतात. त्याचा बाऊ करायची सवय आपण सोडून दिली पाहिजे. तेव्हाच आपण निराशेच्या…. वैफल्याच्या दुःखाच्या खाईतून बाहेर येऊ शकतो. केवळ दुसऱ्याने हात दिल्याने नाही. त्यासाठी स्वतःच्या मनाची तशी तयारी….  तसा निर्धारही आवश्यक आहे.

एका टोकाची ही प्रतिक्रिया होती तर दुसऱ्या टोकाची एक सुंदर प्रतिक्रिया माझी मैत्रीण चित्रा देवकुटे हिने दिली.

तिने असं म्हटलं की, अगदी खरं आहे…. आजचं आज…. उद्या नवीन दिवस! नवीन गोष्टी…. नवे विचार…. उदाहरणच द्यायचं तर आपण रोज ताजा स्वयंपाक करतो…. ताजं अन्न सेवन करतो…. मग तेच आपण जीवनाच्या बाबतीत का करत नाही? शिळ्या कढीला उकळी आणण्याचा खटाटोप आपण का करत बसतो? जुने हेवेदावे, जुने सल विसरून रोज नव्याने जगले पाहिजे…. हे आयुष्य सुंदर आहे!

आज दुर्दैवाने अनेक जण हेच विसरून गेले आहेत….

जिव्हाळ्याच्या बेटांची गरज आहे ती त्यासाठीच!

Continue reading

नमन लतादीदींना..

लतादीदींची आज जयंती! त्यांचा बारा वर्षांचा सहवास, स्नेह मला लाभला. या काळात अगदी त्यांच्या पलंगावर त्यांच्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा.. गप्पांमध्ये सहज ऐकलेलं त्यांचं गाणं.. त्यांच्याकडून ऐकलेल्या असंख्य आठवणी.. आईच्या मायेने त्यांनी केलेला आग्रह, त्यांचं आगत्य, त्यांचा ‘परफेक्शन’चा अट्टहास.....

वो भूली दास्तां.. लो फिर याद आ गयी…

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कालच वाढदिवस झाला. खरं तर दुर्दैवाने आता वाढदिवस म्हणता येणार नाही; कारण शरीराने त्या आपल्यात नाहीत. म्हणून जयंती म्हणायचं... बाकी त्यांच्या सुरांच्या / आठवणींच्या रूपात त्या आपल्याचबरोबर आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी रोजच मनात पिंगा घालतात....

सीमाताईंना अखेरचा निरोप!

काही मृत्यू विलक्षण पेचात टाकतात. ती व्यक्ती आपल्यातून निघून गेली याचं दुःख मानायचं की ती यातनाचक्रातून सुटली याचा आनंद मानायचा हेच कळत नाही. सीमा देव, सीमाताईंचा मृत्यू तसा आहे. २०१९ साली व्यास क्रिएशन्सच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाला त्या शेवटच्या भेटल्या. तेव्हाही...
Skip to content