Sunday, April 27, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटपाकिस्तान का मतलब...

पाकिस्तान का मतलब क्या?

पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्त्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण, पाकिस्तानला तो पडतोय. ‘पाकिस्तान का मतलब क्या?’ हा प्रश्न आजही तेथे विचारला जातो. उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो. मात्र तेथेही उत्तर मिळत नसल्याने कडवा भारतविरोध जोपासला जातो. धर्म आणि भारतविरोध यांच्या चौकटीतच आपले अस्तित्त्व टिकविण्याच्या नादात पाकिस्तानची फसगत झालीय. धार्मिक ओळख कमी करावी, तर वेगळेपण काय राहील याची भीती आणि भारतविरोधाची धार सौम्य करावी, तर मग भारतापासून वेगळे का झालो हा प्रश्न. आपल्या अस्तित्त्वाला या दोन घटकांभोवती केंद्रीत करण्याच्या नादात पाकिस्तान एका चक्रव्यूहात फसला आहे. अस्मितेच्या वावटळीत फसलेल्या पाकिस्तानच्या आजवरच्या प्रवासाचा वेध.

काय आहे या पुस्तकात?

हे पुस्तक म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासाचे पुस्तक नाही. हे आहे, ‘पाकिस्तान का मतलब क्या?’ या तिथे आजही उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाबद्दलचे; त्याच्या उत्तराबद्दलचे पुस्तक. इस्लामलाच राष्ट्रीयत्व मानून देशाची उभारणी करताना पाकिस्तान कसा फसत गेला आणि स्वतःच्या ओळखीचाच प्रश्न त्याला कसा भेडसावत गेला, याचा वेध या पुस्तकात घेतला आहे. या विषयाच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा धांडोळा यात घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या आजवरच्या वाटचालीचा धावता आढावाही यात आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात राजकीय संस्था का विकसित झाल्या नाहीत, तिथे लष्कराचे वर्चस्व का निर्माण झाले, तिथे मूलतत्त्ववादाचा प्रसार का होत गेला, आर्थिक आघाडीवर तो का अपयशी ठरला आणि मुख्य म्हणजे एक साधारण (नॉर्मल) देशासारखा तो का वागत नाही, या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्नही यामध्ये केला आहे.

देशाच्या उभारणीपेक्षा धर्मावरील अधिष्ठानावर भर देण्याच्या धोरणांमुळे आणि भारतविरोधी मानसिकतेमुळे पाकिस्तान गर्तेत सापडत गेला. दिवाळखोरीच्या आणि यादवीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. याबाबत तेथील सजग नागरी समाज काय विचार करतात आणि ते देशाची दिशा बदलू शकतात काय आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानचे भवितव्य काय, याबाबतचे विवेचनही या पुस्तकात आहे. या पुस्तकात, पाकिस्तानी शहरांची वा ठिकाणांची नावे, स्थानिक उच्चारानुसार केली आहेत. या पुस्तकात १५ प्रकरणांतून पाकिस्तानचा सद्य:स्थितीचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचावे, एवढे ते महत्त्वपूर्ण आहे.

या पुस्तकाची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्रीकांत परांजपे यांनी लिहिली आहे. ते लिहितात- आपण भारतात बसून पाकिस्तानबाबत विचार करतो. तेव्हा दोन घटकांवर लक्ष केंद्रित केले जाते. एक, हा इस्लामी देश असून, त्याची अस्मिता (आयडेंटिटी) धर्मावर आधारित आहे. दोन, हा दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य परिषदेचा (सार्क) सदस्य असलेला देश आहे. मात्र, त्याची अस्मिता त्याचा जागतिक दृष्टिकोन, राजकीय आणि संवैधानिक घटक, तेथील सामाजिक घडण, संरक्षणविषयक बाबी आदींबाबत पाकिस्तानी चष्म्यातून विचार केल्यास वेगळे चित्र दिसू शकते. दुर्दैव असे, की पाकिस्तानबाबत बहुतेक विवेचन पाश्चिमात्य अभ्यासकांनी केले असून, आपण तेच ग्राह्य मानून चालतो. ज्येष्ठ पत्रकार, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांनी या पुस्तकात पाकिस्तानी विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानचा अभ्यास केला आहे. पाकिस्तानचा इतिहास, संस्कृती, तेथील राजकीय व आर्थिक स्थिती आणि एकूण पाकिस्तानी मानसिकता समजून घेण्यासाठी त्यांनी केलेले हे एक प्रामाणिक लेखन आहे.

पाकिस्तानचे लष्कर हे तेथील राज्यव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. एखाद्या देशात लष्करी राजवट का येते? राज्यशासनव्यवस्थेत अनेक घटक आपले योगदान देत असतात. राज्यघटना, त्यातून निर्माण झालेल्या संसदेसारख्या संस्था, नोकरशाही, राजकीय पक्ष, नागरी समाज आदी घटक राज्यव्यवस्थेतील संघर्षाचे, कोणताही उद्रेक होऊ नये यासाठीचे व्यवस्थापन करीत असतात. जेव्हा हे घटक आपल्या कामात कमी पडतात, निष्प्रभ ठरतात, तेव्हा लष्कराचा हस्तक्षेप होतो. पाकिस्तानात पहिली लष्करी राजवट १९५८मध्ये आली. पुढे लष्कराची आर्थिक, राजकीय क्षेत्रावर पकड घट्ट होत गेली. आज तिथे लष्कराच्या मान्यतेशिवाय राज्यव्यवस्था चालू शकत नाही. लष्कराच्या या पकडीचे श्रीधर लोणी यांनी उत्तम विश्लेषण केले आहे.

श्रीधर लोणी यांचे हे अभ्यासपूर्ण पुस्तक पाकिस्तानचा इतिहास, संस्कृती, राज्यव्यवस्था, राजकारण, अर्थव्यवस्था, सामाजिक बांधणी या सर्व बाबी समजण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अशाप्रकारचे सखोल विवेचन मराठीत वाचायला क्वचितच मिळते. हे पुस्तक केवळ अभ्यासकांनाच नव्हे, तर सर्वसामान्य वाचकांनाही उपयुक्त ठरणार आहे. आपला शेजारी देश नीट समजून घेण्याची भारतीयांना खरोखरच गरज आहे.

पाकिस्तान का मतलब क्या?

लेखक: श्रीधर लोणी

प्रकाशक: राजहंस प्रकाशन

मूल्य- ४५० ₹. / पृष्ठे- ३२०

सवलतमूल्य- ४०० ₹.

टपालखर्च- ५० ₹.

पाकिस्तान

संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

झेब्बुन्निसा: औरंगजेबाच्या कन्येची पडद्यामागील कहाणी

झेब्बुन्निसा! औरंगजेबची मोठी आणि सर्वात लाडकी मुलगी! औरंगजेब जो अतिशय निष्ठुर, पाताळयंत्री, उलट्या काळजाचा, धर्मांध! तितकाच हिंसक आणि कोणावरही विश्वास न ठेवणारा पातशहा! आपल्या भावांचा पराभव करून पित्याला कैद करून तो मुघल बादशहा झाला. औरंगजेबची कथा अनेकांनी लिहिली आहे....

जिथे सागरा धरणी मिळते…

'जिथे सागरा धरणी मिळते.. तिथे तुझी मी वाट पाहाते...!' अशा अवीट गोडीच्या असंख्य सुंदर सुमधुर गाण्यांमधून, कथा-कादंबऱ्यांतून, चित्रांतून, सिनेमातील दृश्यांतून, अनादी अनंत काळापासून समुद्र मानवी मनाला साद घालीत आला आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन लाटांची निरंतर गाज ऐकत राहणे, पाण्याने चिंब भिजून...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहा सरसंघचालक!

स्वामी विवेकानंद यांनी प्रतिपादन केले होते की, "वेदांत आणि विज्ञान झोपडीझोपडीपर्यंत पोहोचविल्याशिवाय या देशातील दरिद्रीनारायणाचा नवकोट नारायण होणार नाही." त्यांचे हे स्वप्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साकार केले. २७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक...
Skip to content