Homeहेल्थ इज वेल्थलोकल रेल्वे व...

लोकल रेल्वे व बेस्टच्या बसने गेले आणि १० लाख देऊन परतले!

आज पावसामुळे मुंबईतली लोकल रेल्वेसेवा ठप्प आहे. मात्र चार दिवसांपूर्वी ती नेहमीप्रमाणे सुरू होती. अशातच २१ मे रोजी डोंबिवलीहून सदानंद करंदीकर नावाच्या वृद्धाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल पकडली. शेवटच्या स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या थांब्यावरून बेस्टची बस पकडली आणि थेट मंत्रालय गाठले. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या अवतीभवती असलेल्या कोणालाही पुसटशीही कल्पना नव्हती की, मंत्रालयात पोहोचलेले करंदीकर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाखांची देणगी देणार आहेत म्हणून.. पण, ही वस्तुस्थिती आहे. सदानंद करंदीकर यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी वनिता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी १० लाख रुपयांची देणगी दिली आहे. याखेरीज १० लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

करंदीकर मूळचे मालवण तालुक्यातील आचरा येथील रहिवासी. त्यांच्या पत्नी वनिता शासनाच्या जीवन प्राधिकरण विभागात कार्यरत होत्या. काही वर्षांपूर्वी मुंबईतील वृद्धाश्रमात वास्तव्यास असताना त्यांना कॅन्सर झाला आणि ३ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. पत्नीच्या आजारपणात करंदीकर यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी जवळून पाहिल्या. यातूनच त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमार्फत गरजू रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतला. बुधवार, २१ मे रोजी करंदीकर यांनी डोंबिवलीहून लोकल ट्रेन आणि बसने प्रवास करून मंत्रालय गाठले. सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात त्यांनी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेऊन देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली. कक्षप्रमुखांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना त्यांना विचारले.. येण्यास कष्ट पडले असतील ना? या प्रश्नावर करंदीकर फक्त हसले आणि हात जोडून म्हणाले की, माझं काही नाही.. पण ज्यांना ही मदत लागते, त्यांचं रोजचं दुःख मी पाहिलंय. ते कमी झालं पाहिजे.. त्यांच्या या उत्तराने कक्षप्रमुख नाईक भारावले. त्यांनी करंदीकर यांची भेट थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घडवली. करंदीकर यांनी, मुख्यमंत्री महोदयांकडे १० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सचिव श्रीकर परदेशी, कक्षप्रमुख रामेश्वर नाईक, प्रशासकीय सल्लागार दत्तात्रय विभूते आदी उपस्थित होते.

मदतीचा वाढता आलेख:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मदतकार्याचा आलेख सातत्याने वाढत आहे. खालील मदतीचे आकडे स्पष्टपणे दर्शवितात की, गरजू रुग्णांसाठी ही योजना किती परिणामकारक ठरते आहे ते..

  • डिसेंबर २०२४: १३९२ रुग्ण – १२ कोटी २१ लाख रुपये
  • जानेवारी २०२५: १७८८ रुग्ण – १५ कोटी ८१ लाख २७ हजार रुपये
  • फेब्रुवारी २०२५: २०७० रुग्ण – १८ कोटी ३४ लाख रुपये
  • मार्च २०२५: २५२१ रुग्ण – २२ कोटी २२ लाख ४९ हजार रुपये
  • एप्रिल २०२५: २४३० रुग्ण – २१ कोटी ३२ लाख रुपये.

मुंबई व उपनगरांतील ५२५ रुग्णांना ४.९५ कोटींची आर्थिक मदत

गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी दिलासादायक ठरत असून, जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत केवळ मुंबई व उपनगरांतील एकूण ५२५ रुग्णांना ४ कोटी ९५ लाख रुपये इतकी आर्थिक मदत या निधीतून प्रदान करण्यात आली आहे. या कालावधीत मुंबई शहरातील ३२८ व उपनगरांतील १९८ रुग्णांना लाभ मिळाला आहे. सर्वाधिक रुग्णांनी कॅन्सर शस्त्रक्रियेसाठी (९५ रुग्ण) निधीचा लाभ घेतला असून त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी ही योजना एक प्रकारचे वरदान ठरत आहे, अशी भावना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे.

सर्वाधिक मदत मिळालेल्या आजारांचे तपशील:

  • कॅन्सर– ९५
  • मेंदूच्या आजारांवरील उपचार– ४६
  • कॅन्सरवरील किमोथेरपी / रेडिएशन– ३९
  • हिप रिप्लेसमेंट– ३०
  • हृदयविकारावरील उपचार– २९

मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वाधिक रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये:

मुंबई शहर:

  • सैफी हॉस्पिटल– ९ रुग्ण
  • बॉम्बे हॉस्पिटल अँड खुबचंदानी कॅन्सर सेंटर–
  • हिंदुजा हॉस्पिटल–
  • रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल–
  • जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर–

मुंबई उपनगर:

  • साई मेडिकेअर अँड साई हॉस्पिटल, चेंबूर– ३०
  • आरएमएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कांदिवली– २९
  • स्पेशालिटी सर्जिकल ऑन्कोलॉजी, घाटकोपर– २६
  • होली स्पिरिट हॉस्पिटल, अंधेरी– २०
  • बेंझ मल्टीस्पेशालिटी, सांताक्रूझ– १६

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content