डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाईल. देशभरात दूरचित्रवाणी, रेडिओ, समाजमाध्यम यासारख्या विविध व्यासपीठांवरुन जनजागृती केली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी काल दिली.
पावसाळ्याची सुरुवात आणि जागतिक पातळीवर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील डेंग्यूविषयक स्थितीचा आणि या रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यासंदर्भात असलेल्या सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डेंग्यू प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी 24/7 कार्यरत असणारा तसेच आपत्कालीन परिस्थितीत लक्षणे, उपचार शिष्टाचार आणि मदत याविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देणारा केंद्रीय हेल्पलाइन क्रमांक तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राज्यांनाही असेच हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केंद्रित, समयोचित आणि सहयोगी उपक्रमांचा परिणाम म्हणून वर्ष 1996मध्ये 3.3% असलेल्या डेंग्यूचे रुग्ण दगावण्याचा दर आता 2024मध्ये 0.1% इतका कमी झाला आहे. तरी नुकताच सुरु झालेला पाऊस आणि पावसाळ्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढण्याचा धोका यामुळे निर्माण केलेली आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता या आजाराविरुद्ध सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.

केंद्र सरकारने 2024 मध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सज्जतेबाबत राज्यांना संवेदनशील करण्यासाठी 14 मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.