अखेर पुणेकरांसह महाराष्ट्रातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भावनिक खेळी नाकारत त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला.
या विधानसभा निवडणुकीत बहुतांश ठिकाणी या काका-पुतण्याच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमनेसामने होते. गेल्या दोन महिन्यांपासून शरद पवार यांच्या पक्षात इनकमिंगही जोरात होते. त्यामुळेच या निवडणुकीत शरद पवार बाजीगर ठरणार अशीच अटकळ बांधली जात होती. त्यातच पवारांनी बारामतीत अजितदादांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना अजितदादांविरूद्ध उतरवले होते. त्यामुळे अजितदादा त्यांच्या मतदारसंघातच अडकून पडले होते. अशातच थोरल्या पवारांनी भावनिक साद घालणाऱ्या अनेक क्लृप्त्या वापरल्या. त्यामुळे पवारांचे पारडे अधिक जड होईल, अशीच अटकळ बांधली जात होती.
या निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी बारामतीतल्या मतदारांना भावनिक साथ घातली होती. आपली ही शेवटची निवडणूक आहे. यापुढे निवडणुकीत आपण दिसणार नाही असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. सध्या ते राज्यसभा सदस्य आहेत आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष यापलीकडे त्यांचा काही संबंध नाही. तरीसुद्धा त्यांनी आपण आता राजकारणातून निवृत्त होत आहोत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर आपल्याला आपला नातू युगेंद्र याचा विजय पाहायचा आहे असे त्यांनी सूचित केले.
याच प्रचारात शरद पवार यांनी आपले आता वय झाले आहे आणि पुढची पिढी राजकारणात आली पाहिजे असे सांगत युगेंद्रचा प्रचार केला. अजित पवार यांची भूमिका तीच होती की आता तुमचं वय झालंय, तुम्ही पुढच्या पिढीकडे कारभार सोपवला पाहिजे आणि मार्गदर्शन करायला पाहिजे. त्यावेळी मी अजून म्हातारा झालो नाही असे सांगणारे शरद पवार या निवडणुकीच्या प्रचारात निवृत्तीची भाषा करू लागले होते. इतकेच नव्हे तर या निवडणुकीच्या प्रचारात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते फिरले. मी अजूनही म्हातारा झालेलो नाही. महाराष्ट्रात सत्ताबदल होईपर्यंत म्हातारा होणारही नाही, असे सांगतानाच आपला नाद कोणी करायचा नाही असा इशाराही त्यांनी अजित पवारांना दिला होता.
याच शरद पवारांनी पुण्यात आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात घेतलेल्या सभेत आपल्या पत्नी प्रतिभा पवार यांना वळसेंच्या भूमिकेमुळे कसे वाईट वाटले याचे कथन केले. इतकी वर्षं ज्यांना आपले मानले ते कसे विरोधात गेले हे ऐकून प्रतिभा पवार कशा विमनस्क अवस्थेत पोहोचल्या याचा आवेशपूर्ण किस्साच पवारांनी सांगितला आणि उपस्थितांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.
या प्रचारात बारामतीत शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार तसेच सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेही घरोघरी जाऊन प्रचार करत होत्या. युगेंद्रचे आई-वडील म्हणजेच अजितदादांचे बंधू आणि वहिनी श्रीनिवास पवार तसेच शर्मिला पवारही प्रचारात होत्या. स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारही बारामतीत प्रचाराला उतरले होते. बारामतीतल्या टेक्स्टाईल पार्कमध्ये शॉपिंगसाठी गेलेल्या प्रतिभाताईंना तसेच रेवतींना अर्धा तास कसे सोडले नाही, कसे ताटकळत ठेवले यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरवत त्याचे रसभरित वर्णन करणारी कथानके माध्यमांवर प्रसारित करण्यात आली. सुप्रिया सुळेंनीही यानिमित्ताने अजितदादांवर तोंडसुख घेतले. असे अनेक भावनिक खेळ शरद पवारांनी यावेळी खेळले. पण, बारामतीकरांनी तसेच राज्यात सर्वत्र मतदारांनी पवारांचा हा डाव उलटवून लावला असे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.