भारताची कुस्तीपटू विनेश फोगट, आपली आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेण्याची शक्यता असून ती आणखी दोन ऑलिम्पिक स्पर्धा खेळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम वजन वाढल्यामुळे अंतीम सामन्यातून बाद ठरल्यानंतर विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती घोषित केली होती. मात्र, आज तिने एक्सवर एक पोस्ट
टाकून ट्विट केले की, माझ्या शरीरात आजही कुस्ती जिवंत आहे आणि २०३२पर्यंत ती कधीही उफाळू शकेल. माझ्यातली कुस्ती जिवंत आहे आणि ती २०३२पर्यंत खेळू शकेल, असे तिने म्हटले आहे. तिच्या याच पोस्टमुळे ती आपल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीतून घेतलेली निवृत्ती मागे घेऊन पुन्हा नव्या स्पर्धेची तयारी करेल, असे जाणकारांना वाटते.
निवृत्ती जाहीर केल्यानंतरही विनेशने आपण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकेपर्यंत ५० किलो वजनी गटात बसलो होतो, त्यामुळे आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक द्यावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे केली होती. मात्र, तिचे अपिल लवादाने फेटाळले. त्यानंतर लगेचच विनेशने, अजून आपल्यातली कुस्ती जिवंत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कुस्तीशौकिनांना विनेश फोगटचा आंतरराष्ट्रीय संग्राम निश्चितच पाहयला मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.