यावेळी अनिल देशमुख, सुनील केदार, डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आदी नेते उपस्थित होते. निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा आपण दुसरीकडे घेत असतो. मात्र, आज सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी ती जागा घेतली. त्यामुळे आपण या ठिकाणी सभा घेत आहोत. मध्यंतरी कन्हेरीच्या सभेत एका कोपऱ्यात एक अनोळखी माणूस उभा होता. माझ्या लक्षात आले की ते पत्रकार असावेत. त्यांना मी बोलावून घेतले आणि विचारले तर ते म्हणाले, मी अमेरिकेतून आलो आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत भारताच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता असते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आज बारामतीच्या निवडणुकीबाबत अमेरिकेलाही चिंता आहे. एवढे महत्त्व तुमच्या निर्णयावर असणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत केले.
ही निवडणूक देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे. देशाला नवीन रस्ता दाखवण्याची गरज आहे. भाजपाच्या हातात देशाची सत्ता आहे. संपूर्ण देशाचे राज्य दिल्यानंतरदेखील ज्याप्रकारे ते निर्णय घेतात यावर देश नाराज आहे, असे शरद पवार म्हणाले.
रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे भाषण झाले. ते मीदेखील ऐकले. या तीनही भाषणामध्ये अनेक चांगले मुद्दे मांडले. तीनही उमेदवारांनी चांगले मुद्दे मांडली. आता जोपर्यंत आपण सर्वजण एक आहोत, तोपर्यंत बारामतीकरांना कोणीही धक्का लावू शकत नाही. प्रश्न खूप आहेत. महागाई, शेती, रोजगारासह अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनतेचा निर्णय हा बारामतीकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल असेही ते म्हणाले.
गेले काही दिवस मी महाराष्ट्रमध्ये फिरत आहे. माझा घसा बसला आहे. त्यामुळे सांभाळून घ्या. उन्हाळा आहे. सतत भाषणे याचा परिणाम घशावर झाला. त्याठिकाणी जाऊन भूमिका मांडली आणि मला आनंद आहे की, लोकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे, असेही पवार म्हणाले.