पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संस्कार बालवयातच मुलांच्या मनावर रुजावा यासाठी राज्यात येत्या ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागातर्फे ‘चिमुकल्यांची वसुंधरा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात काढलेली छायाचित्रे ‘चिमुकल्यांची वसुंधरा’ आणि केंद्र सरकार पुरस्कृत ‘एक पेड माँ के नाम’, या मोहिमेअंतर्गत मेरी लाइफ (Meri LiFe) पोर्टलवर (https://merilife.nic.in) अपलोड करावीत, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
चिमुकल्यांची वसुंधरा आणि केंद्र पुरस्कृत “एक पेड माँ के नाम” या मोहिमेअंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये प्रत्येक बालकाच्या नावे वृक्ष लागवड करून त्यावर त्या बालकाचे व त्यांच्या आईचे नाव लिहावे आणि त्या वृक्षाचे बालकाच्या पालकांकडून संवर्धन व जोपासना करण्यात यावी. झाडाच्या प्रजाती, स्थान आणि लागवड तारीख आदी माहितीचे अंगणवाडीस्तरावर जतन करण्यात यावे, अशा सूचना राज्यातील अंगणवाड्यांना दिल्या आहेत. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे फोटो मेरी लाइफ (Meri LiFe) पोर्टलवर अपलोड करावीत, असेही त्या म्हणाल्या.
या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांकडून वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवरच्या उपाययोजनांना चालना मिळेल आणि एक लोकचळवळ होऊन पर्यावरण रक्षणासाठी आपण स्वतः काय केले ही भावना लहान वयातच मुलांच्या मनामध्ये रुजेल, असेही तटकरे यांनी सांगितले.