जळगावमधून भारतीय जनता पार्टीचे खासदार उन्मेष पाटील यांचे लोकसभेचे तिकीट कापले गेल्यानंतर त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले खरे.. पण त्यांनी जळगावमधून लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे कट्टर समर्थक करण पवार यांची लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली.
भाजपाने यावेळी लोकसभेचे उमेदवार जाहीर करताना विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी डावलत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून उन्मेष पाटील अस्वस्थ होते. आज अखेर त्यांनी मुंबईत मातोश्री, या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते. यावेळी ठाकरे जळगावमधून उन्मेष पाटील यांची उमेदवारी जाहीर करतील, असा जाणकारांचा होरा होता. परंतु ठाकरे यांनी यावेळी करण पवार यांना जळगावची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे आता करण पवार महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याशी लढत देतील.
याचवेळी उद्धव ठाकरे यांनी पालघरमधून भारती कामडी, कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर-राणे तर हातकणंगलेमधून सत्यजीत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमध्ये उद्धव ठाकरेंकडे त्यांच्या उमेदवारीकरीता पाठिंबा मागितला होता. पण शेट्टी यांनी तेथे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या निशाणीवर निवडणूक लढविण्याची अट ठेवली. शेट्टी यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर आज ठाकरे यांनी तेथे त्यांच्या पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीतर्फे मैदानात उतरविला.

लोकसभेसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. ठाकरे यांनी आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात चार नावांचा समावेश आहे. त्याआधी त्यांनी 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आतापर्यंत ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
शिवसेनेच्या ठाकरे गटाची सध्याची यादी अशी-
- बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
- यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख
- मावळ- संजोग वाघेरे-पाटील
- सांगली- चंद्रहार पाटील
- हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
- छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
- उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर
- शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
- नाशिक- राजाभाई वाजे
- रायगड- अनंत गीते
- सिंधुदूर्ग-रत्नागिरी- विनायक राऊत
- ठाणे- राजन विचारे
- मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील
- मुंबई दक्षिण- अरविंद सावंत
- मुंबई वायव्य- अमोल कीर्तिकर
- परभणी- संजय जाधव
- मुंबई दक्षिण-मध्य- अनिल देसाई
- कल्याण-डोंबिवली- वैशाली दरेकर
- हातकणंगले- सत्यजित पाटील
- जळगाव- करण पवार
- पालघर- भारती कामडी