यंदाची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक विकासपुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी नरेंद्र मोदींच्या पारड्यात मोठ्या संख्येने मतांचे दान टाका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सोलापूर मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते व माढा मतदारसंघातील उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा उमेदवारीअर्ज दाखल करताना झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. बबन शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. संजय शिंदे, आ. समाधान अवताडे, आ. यशवंत माने, आ. शहाजीबापू पाटील, माजी आ. प्रशांत परिचारक आदी मंचावर उपस्थित होते.

एनडीए म्हणजे विकासाच्या गाडीचे पॉवरफुल इंजिन असून त्याला आमच्या घटक पक्षांचे डबे जोडले गेले आहेत. या प्रत्येक डब्यात दुर्बल, वंचित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, शेतकरी या सर्वांसाठी जागा आहे. मात्र याउलट विरोधकांकडे 26 पक्ष असून प्रत्येक नेताच स्वत:ला इंजिन समजतो. त्यामुळेच त्यांच्या इंजिनाला डबेच नसल्याने त्यात सर्वसामान्यांना जागाच नाही. त्या इंजिनात केवळ त्यांचा परिवार बसणार आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. कमळाचे बटन दाबले की मत उमेदवाराला नव्हे तर थेट मोदींना जाईल. विरोधकांचे मात्र प्रत्येक मत राहुल गांधींना जाणार आहे हेही फडणवीस यांनी अधोरेखित केले.
फडणवीस यांनी मोदी सरकारच्या मागच्या 10 वर्षांतील विकास योजनांची जंत्रीच यावेळी सादर केली. 25 कोटी जनता दारिद्र्य् रेषेच्या वर, 20 कोटी लोकांना पक्की घरे, 50 कोटी जनतेसाठी शौचालये, 55 कोटींना गॅस कनेक्शन्स, 60 कोटी लोकांच्या घरात पिण्याचे पाणी, 55 कोटी जनतेला आयुष्मान योजनेमुळे 5 लाखांपर्यंत मोफत उपचार हे सगळे स्वप्नवत वाटणारे कार्य मोदी सरकारने करून दाखवले. कोट्यवधी लाभार्थींचे आशीर्वाद आज मोदींच्या पाठीशी असल्याने मोदींच्या केसालाही धक्का लागणार नाही असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

मागच्या 10 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था मोदी सरकारमुळे जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनली आहे. अर्थव्यवस्था मजबूत असेल तरच पायाभूत सुविधा विकास आणि विशेषत्वाने गरीब कल्याणाचा अजेंडा प्रभावीपणे राबवता येतो. काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधांसाठी केवळ एक लाख कोटी खर्च व्हायचा. मात्र मोदी सरकारच्या काळात 13 लाख कोटी खर्च करून सर्वांगीण विकास साधला जात असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

