वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने उद्या, शनिवार दि. 16 मार्चला नाशिक येथे त्यांच्या जीवनावर आधारित “दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान” या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून यावेळी श्री साई फ्रेंड सर्कल आणि दर्शन थियटर निर्मित “गाढवाचं लग्न”, या विनोदी वगनाट्याचे सादरीकरण होणार आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागात विविध संस्कृतीचे दर्शन घडते. वस्त्र संस्कृती, खाद्य संस्कृती, वाद्य संस्कृती व लोकसंस्कृती विविध प्रदेशानुसार बदलत गेलेली दिसून येते. नमन, दशावतार, तमाशा शाहिरी, कलगीतुरा, जाखडी खेळे इत्यादी लोककला प्रकार अस्तित्त्वात आहेत. यापैकी तमाशा कलेतील वगनाट्याचा बादशाह म्हणजे दादू इंदुरीकर. महाराष्ट्राला लोककलावंतांची मोठी परंपरा आहे. आजवर
अनेक सोंगाडे झाले पण एकच गाजला आणि लोकांच्या गळ्यातला ताईत बनला असा महान विनोदसम्राट, वगसम्राट दादू इंदुरीकर. गावातला तमाशा शहरातल्या नाकं मुरडणाऱ्या पांढरपेशी लोकांना पाहायला भाग पाडणारा अवलिया म्हणजे दादू इंदुरीकर. याच दादू इंदुरीकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या सकाळी 11 वाजल्यापासून यू. एस. जी. जिमखाना हॉल, नाशिक रोड, नाशिक येथे सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, प्रभाकर ओव्हाळ, प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे, सोपान खुडे, ज्ञानेश महाराव, एड. रंजना भोसले, ज्येष्ठ पत्रकार व लोककलेचे अभ्यासक खंडुराज गायकवाड सहभागी होणार आहेत.
यावेळी श्री साई फ्रेडं सर्कल व दर्शन थियटर निर्मित दादू इंदुरीकर यांचे अजरामर “गाढवाचं लग्न”, या वगनाट्याचे सादरीकरण होणार आहे. नव्या पिढीसाठी असणारे हे वगनाट्य निर्माता / दिगदर्शक संजय चव्हाण, सुरेश धोत्रे, राजेंद्र (सरोदे) इंदुरीकर यांनी बसवले असून त्याची निर्मिती सकंलन वसंत अवसरीकर यांनी केले आहे. रसिक प्रेक्षकानी शासनाच्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.